
भारतीय रेल्वे आपल्या सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. केवळ प्रवासी रेल्वे नाही तर मालवाहतूक रेल्वे सेवांवर देखील काम केले जात आहे.
न्यू नॉर्मल : भारतीय रेल्वे : सक्षम आणि कार्यक्षम
हा लेख लिहिताना लहानपणी पाहिलेला चाळीसगावचा एकलहरे औष्णिक प्रकल्प डोळ्यासमोर आला. या प्रकल्पासाठी लागणारी विद्युत निर्मिती कोळसा वापरून होई. रेल्वे वसाहतीच्या मागून चाळीसगावचा रेल्वे ट्रॅक होता. कोळशाने काळ्या झालेल्या गाड्या, घरांच्या भिंती आणि काळा धुरळा हे दृश्य रोजचंच. कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे आणि तंत्र वर्षानुवर्षे तेच होते. कोळसा वाहून नेण्याचे बदलेल तंत्र पहिल्यांदा आंध्रप्रदेशमधील कृष्णपट्टणम पोर्टवर पाहिलं. कोळसा न सांडता, वाया जाता अथवा चोरी न होता थेट विद्युत निर्मिती प्रकल्पात जातो. बोटीतून आलेला कोळसा उतरवणे व तो रेल बोगीत चढवणे यासाठीही ऑटोमॅटिक व्हेईकल लोकेशन सिस्टीम आणि एंटरप्राइझ पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम वापरली जाते. विशेष म्हणजे कृष्णपट्टणम बंदरात मोठी जहाज लागतात तेथे आतपर्यंत खासगी रेल्वे ट्रॅक नेला आहे.
भारतीय रेल्वे आपल्या सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. केवळ प्रवासी रेल्वे नाही तर मालवाहतूक रेल्वे सेवांवर देखील काम केले जात आहे. मालवाहतूक गाड्यांना क्वचितच नावे दिली जातात. भारतातील मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग सुमारे २४ किमी/तास आहे. रेल्वे सुधारणांमध्ये मालवाहतूक गाड्यांची सक्षमता महत्त्वाचा घटक आहे. नवीन समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या खुर्जा-नवीन भाऊपूर मार्गावर मालवाहतूक गाड्यांनी ताशी ९० किमीपेक्षा जास्त वेग गाठण्यास सुरुवात केली आहे. जलद गतीमुळे मालाचे जलद वितरण होईल आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होईल.
याचा सकारात्मक परिणाम जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे स्पर्धात्मक मूल्य वाढण्यात दिसेल. रेल्वेच्या या प्रवासात कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच योगदान महत्त्वाचे आहे. १९८८मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुख्य काम रेल्वेने, मालवाहतुकीच्या कंटेनर्सची हाताळणी व वाहतूक करणे हे आहे. सध्या १४३४९ कंटेनर वॅगन्स आहेत. १२००८ हून अधिक अत्याधुनिक तंत्राच्या हाय-स्पीडबोगी, तसेच कमी उंचीच्या कंटेनर फ्लॅट-वॅगन्स सेवेत समाविष्ट केल्या आहेत.
उत्कृष्ट तांत्रिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज अशा या वॅगन्स १०० किमी/तास वेगाने धावण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. तसेच रेल्वे ट्रॅकमधील बिघाड काही मिनिटांत शोधण्यासाठी लाइट डिटेक्शन आणि रेंजिंग नावाचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहे. रुळांना येणारा गंज, त्यामुळे तुटणारे रूळ हे रेल्वेसाठी धोकादायक आहेत. यामध्ये रेल्वेचे प्रचंड आर्थिक नुकसान आहे. ही झीज रोखण्यासाठी आता जस्तचा (झिंक) वापर केला जातो. जागतिक उदाहरणाचे अनुकरण करून, भारतीय रेल्वे देखील नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत आहे. भारतीय रेल्वे विभाग लागणारे रूळ, सेल (SAIL)कंपनी बरोबरच, ‘जिंदाल स्टील आणि पॉवर सप्लाय’ कडूनही विकत घेत आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर गतिमान अशा हाय स्पीड कॉरिडॉरसाठी लागणारे हीट ट्रिटेड रूळ यशस्वीपणे विकसित करणारी पहिली आणि एकमेव भारतीय उत्पादक ठरली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या दूरदृष्टीपूर्ण योजना, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनची मार्गदर्शक तत्त्वे, तंत्रज्ञानातील जागतिक बदल याचा विचार करून भारतीय रेल्वे कात टाकत आहे. या सुधारणा देशाच्या विकासाची गती वाढवत आहेत. अशा अनेक महत्त्वाच्या बदलांचा आढावा घेऊया पुढच्या लेखात.
Web Title: Dr Prachi Javadekar Writes Indian Railway Competent And Efficient
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..