
वित्त मंत्रालयांच्या आर्थिक कार्य समितीने (CCEA) पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली आणि लॉजिस्टिक क्षेत्राच्या विकासाचा नवीन अध्याय भारतात सुरू झाला.
न्यू नॉर्मल : लॉजिस्टिक : ‘पीएम गतिशक्ती’
वित्त मंत्रालयांच्या आर्थिक कार्य समितीने (CCEA) पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली आणि लॉजिस्टिक क्षेत्राच्या विकासाचा नवीन अध्याय भारतात सुरू झाला. हा आर्थिक विकासाकडे बघण्याचा महत्त्वाकांक्षी असा परिवर्तनकारी दृष्टिकोन आहे. या रथाचे सात अश्व म्हणजे रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, मास ट्रान्स्पोर्ट आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा). यांच्या मजबुतीसाठी ऊर्जा प्रसारण, आयटी कम्युनिकेशन, जलव्यवस्था आणि सामाजिक पायाभूत सुविधापूरक काम करतील. पायाभूत सुविधांची कार्यक्षमता सुधारण्यात पीएम गतिशक्ती मोठी भूमिका बजावेल. यामध्ये सहा मंत्रालयांच्या २४ डिजिटल प्रणाली ‘युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म’द्वारे एकत्रित केल्या जात आहेत आणि यामुळे एक नॅशनल सिंगल विंडो लॉजिस्टिक पोर्टल तयार होईल. ते लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात मदत करेल.
या लॉजिस्टिक क्षेत्राची ओळख आपण करून घेणार आहोत. एप्रिल २०००ची रणरणती दुपार... आम्ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग कसा बनतोय हे पाहायला गेलो होतो. ‘एम.एस.आर.डी.सी’चा आयपीओ काढून मांडलेला हा पहिलाच प्रयोग. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वर्णन स्वप्नवत वाटत होते. आपल्या देशात असे तंत्रज्ञान वापरून विकास होणार हे नवलाईचे होते. देशात पहिल्यांदाच इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सार्वजनिक भागीदारीतून पैसे उभारले जाणार होते. रतन टाटांनी तेव्हा या योजनेचे मनापासून कौतुक केले होते. रस्ते बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान नवी मशिनरी, ग्रेडर सेपरेटर, खडी, डांबर, सगळ्यासह रस्ता तयार करणारे ते अवाढव्य मशिन मी पहिल्यांदाच पाहिले होते. नंतर अनेक प्रकल्प पाहिले, आता भारतातही नवतंत्रज्ञान ज्या आत्मविश्वासाने वापरले जाते.
रस्त्यावरचे बोगदे आणि आता श्रीनगर-लेह जोडणारा १४.२ किलोमीटर लांबीचा झोजिला टनेल (बोगदा) तयार करताना असणारी आपली दळणवळण क्षमता, सक्षमता वेगळ्या ताकदीची आहे हे कळतंय! हे आठवण्याचं कारण की आता आपण ज्या क्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत, ते किती प्राथमिक अवस्थेत होतो व आता कुठे आहे हे पाहणे विकासाची खरी गती दाखवणारे आहे.
आपण रस्ता पाण्याखाली गेल्याने बंद, वाहतूक थांबली, रेल्वेचे फाटक उघडे राहिले, पूल वाहून गेला, गोदामात माल सडून गेला, फळे-भाज्या ताज्या राहिल्या नाही, भाव पडले या बातम्यांपासून आपण पुढे आलो आहोत. आपल्या सक्षम दळणवळण, गोदामे, पॅकेजिंग तंत्रज्ञान या साऱ्याचा एकत्र परिणाम आपण अनुभवत आहोत. कोकणातला हापूस गेला दिल्लीच्या बाजारात, केळशीच्या बचत गटाच्या शेवया गेल्या अमेरिकेला, कोरोनाच्या काळात रेल्वे बनली ऑक्सिजन एक्स्प्रेस आणि विमानांद्वारे औषध, लस आणि भाज्या देशांच्या कानाकोपऱ्यात पोहोचविल्या अशी असंख्य उदाहरणे. यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे लॉजिस्टिक्स. भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होत असताना देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यवसाय वाढवण्यासाठी लॉजिस्टिस्क्सची महत्त्वाची भूमिका आहे. कुठल्याही देशामध्ये परकीय गुंतवणूक करण्यासाठी तेथील व्यावसायिक सोयी-सुविधांबरोबरच एकूण दळणवळणाच्या व्यवस्था कशा आहेत हे प्रामुख्याने अभ्यासले जाते.
Web Title: Dr Prachi Javadekar Writes Logistic
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..