
स्वच्छता अभियानात इंदूर शहर पाचव्यांदा प्रथम क्रमांकावर निवडले गेले. ही यशोगाथा ऐकताना सर्वांत महत्त्वाचा वाटा ‘कचरावेचक’ यांचा आहे असं जाणवतं.
न्यू नॉर्मल : पॅकेजिंग : पुनर्वापर आणि नवे पर्याय
स्वच्छता अभियानात इंदूर शहर पाचव्यांदा प्रथम क्रमांकावर निवडले गेले. ही यशोगाथा ऐकताना सर्वांत महत्त्वाचा वाटा ‘कचरावेचक’ यांचा आहे असं जाणवतं. त्यांनाच कचरा वेचून सेग्रीगेशन करणाऱ्या छोट्या कंपनीत सहभागित्व देण्यात आलं. ही कहाणी पॅकेजिंगमध्ये अशासाठी महत्त्वाची आहे, की आपल्या कचऱ्यात असणारा ८० टक्के कचरा प्लास्टिक पॅकेट्सचा असतो. त्याचे विघटन करणे हे पर्यावरणपूरकतेसाठी आवश्यक असते. सरकारने याचा सखोल अभ्यास करून याचे नवे धोरण ठरवले. परंतु त्या धोरणाला सुसंगत असे वेस्टन बनवणे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. २०१८मध्ये एफएसएसएआयने (fssai) प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी अन्नपदार्थांसाठी उपयोग किंवा वर्तमानपत्राचा उपयोग करण्यावर बंदी घातली आणि १८ ऑगस्ट २०२१मध्ये २० प्रकारच्या सिंगल युज प्लास्टिकचे आवेस्टन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे..
भारतातील काच, ॲल्युमिनिअम, स्टीलसारख्या गोष्टी प्रक्रिया करून पुनर्वापरात आणल्या जातात. साधारणतः ७० टक्के एवढे त्याचे प्रमाण आहे. ६० टक्के प्लास्टिक वेष्टनचा पुनर्वापर होतो. कचरा गोळा करणारे, भंगारवाले ते गोळा करून पुनर्वापरासाठी देतात. त्यांच्या आरोग्याला बाधक गोष्टी लक्षात घेऊन प्लास्टिकचा पुनर्वापर अन्नधान्य, खाद्य वस्तूंसाठी बंद करण्यात आला. कचऱ्याची विल्हेवाट आणि पुनर्वापरासाठी विशिष्ट पद्धत वापरावे लागेल. त्यासाठी राज्य प्रदूषण निबंधक महामंडळाची परवानगी अनिवार्य केली. व्यवसायांना त्याचा प्रतिवर्षी अहवाल पाठवावा लागेल. या बदलांमुळे आपल्या दैनंदिन वापरातील पॅकेजिंग अधिक सुरक्षित होईल. अर्थात ते एकूण पर्यावरणासाठीही बाधक बनणार नाही हे पाहणे ग्राहकांच्या हातात आहे. पॅकेजिंगच्या मोठ्या व्यापाबरोबरच लेबलिंगचा असणारा नियमही ग्राहककेंद्रित आहे. वस्तूंच्या वेष्टनावर कंपनीचे नाव, प्लास्टिकचे आवरण किती जाडीचे आहे, हे लिहिणे बंधनकारक आहे.
या क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या संशोधनाने ज्यूट, पॅडी, केळीच्या पानांपासून तयार होणारे पॅकिंग मटेरिअल, कागद असे भक्कम पर्याय पुढे आले आहेत. यातील संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणजे ‘३६०’ पॅकिंग. यात पॅकेजिंगच्या सर्व सामानाचा पुरवठा केला जातो. विविध प्रकारचे कागद, फोम, खोके आदी वस्तू, प्रमाण, आकार याचे विश्लेषण करून योग्य पद्धतीचे पॅकेजिंग विकसित केले जाते. त्यात एकूण खर्च, टिकाऊपणा, हाताळायला सोपे व वाहतुकीला सुकर याचा विचार केला जातो. नवीन मटेरिअल तयार करताना पुनर्वापर, पर्यावरण, किंमत याचा विचार आता होताना दिसतो आहे. मेड टू ऑर्डर पद्धती वापरून पॅकेजिंग केले जाते.
मॉन्स्टर.कॉम, नोकरी.कॉम, लिंक्डइन हे नोकरीसाठी असलेले प्लॅटफॉर्म्स पॅकेजिंग क्षेत्रात वाढणाऱ्या नोकऱ्या आणि जगभरात वाढणारी त्याची मागणी अधोरेखित करत आहेत. जगभरात एन्ड लाईन ऑटोमेशन, इंटेलिजन्स पॅकेजिंग, रोबो पॅकेजिंग, स्मार्ट पॅकेजिंग हे नवीन तंत्र वापरात येत आहे. उद्योगातील तज्ञांच्या मते, देशातील महत्त्वाच्या क्षेत्रातील जवळपास २२,००० कंपन्याना पॅकेजिंग व्यावसायिकांची गरज आहे. क्षेत्रातील विशेष शैक्षणिक कार्यक्रमांच्या संख्याही वाढते आहे.
पॅकेजिंगमध्ये रस असलेल्या उमेदवारांसाठी सखोल ज्ञान मिळविण्यासाठी ही योग्य वेळ आहे.