esakal | विशेष : लिबरल आर्ट्स : शिक्षणाचे पर्यायी व्यासपीठ!
sakal

बोलून बातमी शोधा

Liberal Arts Education

विशेष : लिबरल आर्ट्स : शिक्षणाचे पर्यायी व्यासपीठ!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारावीनंतरचे शिक्षण घेताना ठोकताळा असलेल्या अभ्यासक्रम निवडीला आता अनेकजण फाटा देत लिबरल आर्ट्ससारखे अभ्यासक्रम निवडत आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्सस्टाईन म्हणतात, लिबरल आर्ट्सचे शिक्षण घेणे म्हणजे अनेक गोष्टी एकत्र शिकणे असा नसून. पुस्तकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या अनेक बाबींचे शिक्षण घेण्यासाठी मनाला प्रशिक्षित करणे होय.

मागील काही वर्षांमध्ये लिबरल आर्ट्स या शाखेने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे व उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. या शाखेत सोशल सायन्सेस (सामाजिक शास्त्रे), आर्ट्स (कला) आणि ह्युमॅनिटीज (मानवी समाज व सांस्कृतिक पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र) यांचा समावेश होतो. त्यामुळे यामध्ये तुम्हाला आवड असलेल्या निवडक विषयांचा समावेश तुम्ही तुमच्या लिबरल आर्ट्सच्या अभ्यासक्रमामध्ये करू शकता.

तुम्हाला राज्यशास्त्र या विषयात रस असल्यास राज्यशास्त्राबरोबरच संगणक व स्टॅटेस्टिक्स या विषयांची निवड करीत तुम्ही निवडणूक व मतमोजणी विश्लेषक अर्थात Psephologist म्हणून अधिक प्रभावीपणे काम करू शकता. तुम्हाला साहित्य या विषयात रस असल्यास साहित्य या विषयाबरोबर तुम्ही त्याला मॅनेजरिअल स्टडिजची जोड देऊन पब्लिशिंग (प्रकाशन) व्यवसायात स्वत:चा वेगळा ठसा उमटवू शकता.

याशिवाय लिबरल आर्ट्स या पदवीमध्ये पारंपरिक विषयांबरोबरच समकालीन विषयांच्या जोडीने तुम्ही अधिकाधिक नव्या गोष्टी देखील शिकू शकता. या विषयामध्ये मानसशास्त्र, माध्यमे, मास मिडिया, पत्रकारिता, फाईन आर्ट्स, वैदिक विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स या विषयांचा प्रामुख्याने समावेश होतो.

एकूणच काय, तर लिबरल आर्ट्सच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शास्त्रांच्या मर्यादेमधून बाहेर पडत तुम्ही प्रभावी व मुक्तपणे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांचे शिक्षण घेऊ शकता आणि त्याचा उपयोग तुमच्या करिअर बांधणीसाठी करू शकता.

बी. ए. ऑनर्स करा!

याबरोबरच लिबरल आर्ट्सखेरीज बी. ए ऑनर्स या पर्यायाचाही विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इंग्रजी अशा ठराविक विषयांमध्येच आवड आहे आणि त्यामध्येच करिअर करावयाचे आहे, तर सुरुवातीपासून तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करण्याची संधी बी. ए ऑनर्स या पदवीमध्ये मिळू शकते. या उलट ज्यांना एकापेक्षा जास्त विषयांमध्ये रस आहे व या सर्व विषयांचे एकत्रित ज्ञान घेऊन करिअर करण्याची इच्छा असलेल्यांसाठी लिबरल आर्ट्स हा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त पर्याय आहे. स्वत:च्या इच्छेने वेगवेगळे विषय निवडण्याच्या संधी लिबरल आर्ट्स या विषयातील पदवी तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे स्वत:च्या प्रतिभेला आकार देण्याबरोबरच पारंपरिक प्रवाहाच्या विरुद्ध पोहत नवी आव्हाने पादाक्रांत करायची असल्यास, एका रोमांचकारी अनुभवाबरोबरच विविध विषयातील ज्ञानाचे भांडार म्हणून हे क्षेत्र तुम्हाला सदैव मदत करेल, हे नक्की !

लिबरल आर्टस् अभ्यासकर्माचे शिक्षण पुणे शहरात अनेक ठिकाणी दिले जाते. उच्च शिक्षणाच्या जगात नावाजलेल्या अनेक संस्थांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या.

- डॉ. प्रीती जोशी