‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० गेम चेंजर’ ठरेल; डॉ. राजकुमार सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rajkumar Singh statement National Education Policy 2020 will be game changer Quality education and community development

‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० गेम चेंजर’ ठरेल; डॉ. राजकुमार सिंग

पुणे : समाजाच्या विकासासाठी आणि गुणवत्तापुरक शिक्षण प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण महत्त्वाचे ठरत असते. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह समाजातील विविध समस्यांचे निराकरण, संशोधनातून विकास घडविता येईल. उच्च गुणवत्तापूर्ण संशोधनात्मक शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना मिळावे. ज्ञानाची उत्पत्ती आणि संशोधनाचे वातावरण निर्मितीसाठी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ गेम चेंजर ठरेल, असे मत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवारी लोणी-काळभोर येथे पार पाडला. यावेळी विद्यापीठाच्या चार हजार ५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सिंग बोलत होते. यावेळी इस्त्रोचे माजी अध्यक्ष व ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’चे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड हे होते. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरू प्रा. तपन पांडा, डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि परिक्षा नियंत्रक प्रा. गणेश पोकळे आदी उपस्थित होते. या समारंभात ‘बीटेक’मधील केवल पद्मवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल व बॅचलर ऑफ एज्युकेशनचे मिनू कलिता यांचा एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडलने गौरव करण्यात आला. तसेच विविध शाखांतील विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक देण्यात आले.