परदेशी भाषा शिकताना...

डॉ. श्रीराम गीत
Thursday, 5 December 2019

मला भाषा शिकायच्या आहेत, हे वाक्‍य अक्षरशः १०० टक्के फक्त परदेशी भाषांसंदर्भात वापरले जाते. मात्र, आजवर तरी मला अन्य भारतीय भाषा शिकायची आहे, असे म्हणणारी व्यक्ती भेटलेली नाही. कारण उघडच आहे, त्यात पैसे नाहीत, पैसे नसतील तर करिअर कुठून करणार? आता प्रश्‍न येतो तो पैसे हवे असतील व तीव्र स्पर्धा नको असेल, तर कुठली परकीय भाषा शिकायची?

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक 
मला भाषा शिकायच्या आहेत, हे वाक्‍य अक्षरशः १०० टक्के फक्त परदेशी भाषांसंदर्भात वापरले जाते. मात्र, आजवर तरी मला अन्य भारतीय भाषा शिकायची आहे, असे म्हणणारी व्यक्ती भेटलेली नाही. कारण उघडच आहे, त्यात पैसे नाहीत, पैसे नसतील तर करिअर कुठून करणार? आता प्रश्‍न येतो तो पैसे हवे असतील व तीव्र स्पर्धा नको असेल, तर कुठली परकीय भाषा शिकायची? 

इयत्ता बारावीपर्यंत आपल्या देशात परकीय भाषा म्हणून तीनच शिकवल्या जातात. इंग्रजी, फ्रेंच व जर्मन. अर्थातच, या तीन भाषांतून काहीही करायचे म्हटले तर तीव्र स्पर्धेला तोंड दिल्याखेरीज पैसे किंवा करिअर दोन्ही हाती येत नाहीत. हे वास्तव समजेपर्यंत अनेकांनी या भाषा शिकण्यात भरपूर वेळ, पैसे व कष्ट घालवलेले असतात. याउलट अरेबिक, स्पॅनिश, ब्राझीलियन, कोरियन, मॅंडेरीन, जॅपनीज, ग्रीक यांसाठी शिकण्याचे कष्ट खूप. पण कामाच्या संधी नक्की. शिक्षणाच्या संधीसुद्धा उपलब्ध असे सध्याचे व येत्या दशकाचे वास्तव राहणार आहे. शिकण्याचे कष्ट हा शब्द मी ढोबळ मानाने आकड्यातून स्पष्ट करू इच्छितो. एक हजार जणांनी फ्रेंच वा जर्मन शिकायला सुरुवात केली, तर तिच्या सहा पातळ्या पूर्ण करणारे सहजपणे ६०० ते ७०० जण निघू शकतात. याउलट अन्य भाषांसंदर्भात हाच आकडा फारतर ५०-६० वर येऊन अडकतो. आता तुम्हीच स्वतःला एक प्रश्‍न विचारा. तुमच्या घरात फ्रेंच किंवा जर्मन वस्तू किती आहेत? खरेतर शोधाव्या लागतील. याउलट तुमचा फ्रिज चिनी, मोटार कोरियन, कॅमेरा जपानी असतो. स्पेन, ग्रीस, दुबई व ब्राझील तुमच्या पर्यटनाच्या यादीत आता वरचे क्रमांक पटकावू लागले आहेत. 

मध्यपूर्वेत नोकरीला जाण्याचे आकर्षण कमी झाले असले, तरी संपलेले नक्की नाही. आज सर्वाधिक संधी मध्यपूर्वेतील अनेक देशांत आहेत व तिथे लाखो भारतीय वास्तव्य करत आहेत. पैसे तर कमावतातच पण सुरेखशी करिअरसुद्धा करत आहेत. यामध्ये डॉक्‍टर्स, नर्सेस, आर्किटेक्‍ट, हॉटेलियर्स, इंजिनिअर्स, प्रोजेक्‍ट मॅनेजर्सची संख्या भरपूर आहे. अर्थातच, कोणत्या भाषेत शिकून संधी जास्त व स्पर्धा कमी याचे गणित सोडवण्याचा अभ्यास मी ‘सकाळ’च्या वाचकांवरच सोडून देतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr shriram git article on foreign language learning