‘अ’ ऑनलाइनचा : शिक्षण पद्धतीत नवा पर्याय

शिकवण्याच्या ऑनलाइन या नव्या पर्यायाला स्वीकारताना आवश्यक असणाऱ्या जाणिवा कोणत्या हे अभ्यासावे लागेल.
Education Process
Education ProcessSakal

शिकवण्याच्या ऑनलाइन या नव्या पर्यायाला स्वीकारताना आवश्यक असणाऱ्या जाणिवा कोणत्या हे अभ्यासावे लागेल. केवळ या प्रकाराला नावे ठेऊन, त्यातल्या अडचणी, समस्या उगाळत बसून काय होणार? यापेक्षा उपाय, उत्तरे शोधणेच जास्त उपयुक्त. प्राथमिक, माध्यमिक आणि त्यावरचे वर्ग सगळ्यांच्या समस्या वेगळ्या. आता या पद्धतीला काही पर्याय नाही, हे ध्यानात घेतले आणि त्याच्या सकारात्मक बाजूकडे पाहिल्यास जास्त फायद्याचे, उपयोगाचे. पारंपरिक पद्धतीत शक्य नव्हते ते या पद्धतीच्या वापराने सहज शक्य होणार आहे, याची जाणीव करून घेतली म्हणजे झाले. जगभर ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याला अगोदरच सुरुवात झालेली होती. आपल्याकडे मात्र परिस्थितीने त्याच्या वापराकडे अक्षरशः ढकललेले आहे. अर्थात, या प्रकाराकडे आपण कशा पद्धतीने पाहता यावरच हे अवलंबून आहे. काय ती कटकट म्हणायचे, का संधी तुम्हीच ठरवा! तेव्हा आपण बी पॉझिटिव्ह.

आनंदी शिक्षणाचा मार्ग

शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन हे समजून घेतले, तर या अपरिहार्यतेचे रूपांतर एक सहज, सोपा आणि आनंददायी शिक्षणाचा मार्ग म्हणून सहर्ष स्वागतात होईल. ऑनलाइन शिकण्या-शिकवण्याची यशस्विता ते तंत्र त्यातील सामर्थ्य ओळखण्यात आहे हे नक्की. त्यामुळे आता ऑनलाइनच्या सकारात्मक बाजूकडे पाहूया. त्यात काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

  • शिक्षकाने त्याच्या ऑनलाइन अध्यापनात व्हिडिओचा वापर केला, कुठेतरी ऑडिओ ऐकण्याचा अनुभव दिला, तंत्रातील विविध सुविधांचा वापर केला, तर तासात जिवंतपणा येऊन जातो. पाठ मनोरंजक होऊन जातो. असा पाठ अनुभवणे मुले कधीच टाळत नाहीत.

  • पाठ्यपुस्तकातील एका चित्रापेक्षा अनेक जिवंत गोष्टींचा अनुभव ऑनलाइनमधून शक्य असतो, जे प्रत्यक्ष अध्यापनात शक्य असूनही टाळले जात होते. एका जिवंत अनुभवापासून मुले दूर जात होती ते आता घडतेय. पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यापलीकडचा अनुभव द्यायला शिक्षक तयार होत आहेत. तोच तोचपणा टाळून नावीन्याचा शोध घेत अनुभवात वैविध्य आणले जात आहे. ज्यात पॉवर पॉइंटचा वापर, प्रात्यक्षिके, ॲनिमेटेड शॉर्ट्स हे सगळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला खिळवून ठेवणारे आहे. एकापेक्षा जास्त स्रोतांचा वापर शिकवताना केला जात असल्याने वैविध्य मिळते, त्यामुळे हा अभ्यास तणावरहित आणि आनंददायी करणारा आहे.

  • शिकण्या-शिकवण्यातले एकाग्रपणे केलेले प्रयत्न ऑनलाईनमुळे आवश्यक बनत चालले आहेत. आता इकडे-तिकडे भरकटण्याची सोयच नाही. वर्गातील टिवल्या बावल्या विसरा. जे शिकवले जात आहे, त्यावर पूर्ण लक्ष द्यावेच लागते. आता हे अवघड वाटत असेल, तर नाइलाज आहे. घरात बसून आपल्या आवडीने अन् सवडीने शिकण्याची सोय, जिथे असाल तिथून शिकण्याची संधी. ठराविक वेळेस शाळेत जाणे नको, तो प्रवास नको. सारे काही आपल्या सोईचे.

  • काही प्रमाणात परवडणारे शिक्षण म्हणूनही याकडे पाहायला हरकत नाही. शाळेत जाण्या-येण्याचा खर्च, इतर साहित्याचा खर्च, डबे असे अनेक छुपे खर्च कमी झाले. बरेच साहित्य ई-स्वरूपात उपलब्ध असल्याने कागद, पुस्तके, यांच्यात बचत झाली.

  • शिक्षकांचा तास रेकॉर्ड करून परत परत ऐकण्याची संधी असल्याने तेही सोईचे. म्हणजे आपल्या मनात येईल तेव्हाच अभ्यासाला बसायचे. त्यातून जास्त वैयक्तिक लक्ष देण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाइन दिले जाणारे अनुभव हे जास्त विद्यार्थी केंद्रित होत असल्याचे अनुभव आहेत. शिक्षकांना दर वेळेस विद्यार्थ्यांना संबोधूनच शिकवावे लागते.

  • विद्यार्थ्यांमध्ये ‘स्व’ची जाणीव निर्माण होण्यास मदतच झाली आहे. अभ्यासाची प्रेरणा ही मुलांनाच जाणवू लागली आहे. मला ऑनलाइन तासाला हजर राहिले पाहिजे, कारण मला शिकायचे आहे याची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्याला स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी घ्यायला या पद्धतीने प्रवृत्त केले आहे.

या सगळ्या सकारात्मक बाजूंचा विचार केला तरी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या शंका लक्षात घेऊन हे सर्व कसे सहजपणे घडेल याचा विचार करायलाच हवा. त्यासाठी शिक्षकाने स्वतःमध्ये काही कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे, तसेच पालकांनी जागृत राहून पुढे यायला हवे अन् विद्यार्थ्यांनी कार्यशील बनले म्हणजे झाले. ते कसे पुढील भागात पाहूया.

- डॉ. उमेश दे. प्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com