‘अ’ ऑनलाइनचा : निरीक्षणातून शिकू या

एज्युकेशन, करिअर सर्वप्रथम, नंतर बाकी सगळे. यात निरीक्षणातून शिकणे पहिले. निरिक्षण ही एक अनौपचारिक क्रिया आहे. ती सहजपणे घडत असतेच.
Learn
LearnSakal

एज्युकेशन, करिअर सर्वप्रथम, नंतर बाकी सगळे. यात निरीक्षणातून शिकणे पहिले. निरिक्षण ही एक अनौपचारिक क्रिया आहे. ती सहजपणे घडत असतेच. त्याला आपण अभ्यासात जाणीवपूर्वक असे स्थान दिल्यास त्याचा उपयोग अभ्यासाची एक पद्धती म्हणून नक्कीच होऊ शकतो. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असले. तरी निरीक्षणासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.

निरीक्षणाची उपयुक्तता

आपण पाहतो ते आपल्या चांगले लक्षात राहाते. अर्थात, शास्त्रज्ञानांच्या दृष्टीने आपली पाहून लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते. आपल्या अवती-भोवतीच्या अनेक गोष्टी सतत पाहात असतो. त्यामुळे वेगळे प्रयत्न न करता अनेक बाबी आपल्या मनात पक्क्या रुजलेल्या असतात. अमुक पोस्टर कोणाचे आहे, हे आपल्याला अभ्यासावे लागत नाही; तर पाहिल्या पाहिल्या आपण ते ओळखू शकतो. स्पेलिंग पाठ करायला, एखादी कृती समजून घ्यायला, तक्ते, नकाशा वाचनासाठी केवळ आपले निरीक्षणच उपयुक्त ठरते. त्यामुळे विज्ञानामधील प्रयोग, इंग्लिशमधील स्पेलिंग्ज लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विज्ञानातील एखादा प्रयोग व त्यातील कृतींचा क्रम लक्षात ठेवायचा असल्यास केवळ त्याची आकृती डोळ्यासमोर आणले की झाले. अभ्यासाचा आकृतीमय, चित्ररुपात भाग मांडला असल्यास त्यातील विचार आपल्या पक्का स्मरणात राहातो. त्यासाठी फार वाचत बसण्याची गरज पडत नाही. केवळ पाहात बसले, म्हणजे आपोआप काम होऊन जात.

निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकता येतात. दिसतं तसंच वास्तविक आहे का, हे मात्र अभ्यासणे, तपासून पाहाणे गरजेचे असते. यासाठीच निरीक्षणातील बारकावा महत्त्वाचा आहे. एखादी वस्तू, व्यक्ती, चित्र पाहताना आपण किती सूक्ष्म गोष्टींचे निरिक्षण करू शकतो, याचा सराव करणे आवश्यक आहे. या सर्वांमध्ये पाहण्यासारख्या, नोंद घेण्याजोग्या अनेक बाबी असतात. निरीक्षणात सातत्य असावे लागते. एकदाच पाहून चालत नाही, तर वारंवार पाहणे गरजेचे असते. सर्वांगाने पाहाणे आवश्यक असते. त्या वस्तूची, शब्दाची, प्रतिमा आपल्या डोक्यात साठवणे गरजेचे असते. लक्षपूर्वक निरिक्षण, सर्व दिशांनी, बाजूंनी पाहणे हे अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. अनेक कोनातून पाहाणे आवश्यक असते. शिवाय निरिक्षण करताना आपला हेतू डोक्यात ठेवून ते केलेले असावे लागते.

निरीक्षण क्षमता वाढण्यासाठी...

काय पाहायचे याचा पण विचार करणे आवश्यक असते. केवळ दिसत आहे, ते पाहणे याला निरिक्षण करणे म्हणता येत नाही. आपल्या लक्षात राहील अशाच बाबी हेरणे आवश्यक ठरत. अर्जुनाला झाडात लपलेल्या पक्ष्याचा केवळ डोळाच दिसत होता, त्याप्रमाणे अभ्यासताना आपले निरिक्षण हे ठराविक ठिकाणीच केंद्रित झालेले असणे आवश्यक आहे. असे निरिक्षण कायमचे स्मरणात राहाणारे ठरू शकते. शिवाय ते ताण तणावापासून मुक्त असते. असे म्हणतात, की सौंदर्य हे पाहणाऱ्‍याच्या नजरेत असते. म्हणजेच निरिक्षण करण्याची क्षमता ताकद विकसित केली असल्यास नक्कीच ज्ञानप्राप्तीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. ज्ञानेंद्रियात महत्त्वाचा मार्ग म्हणजे डोळे. ते उघडे ठेवून पाहिलेत, तर अनौपचारिकरीत्या अनेक गोष्टी सहज शिकू शकाल.

- डॉ. उमेश दे. प्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com