‘अ’ ऑनलाइनचा : दूरस्थ अध्यापन पद्धती

विद्यार्थी आणि शिक्षक हे जोडले जाणार मोबाइलच्या माध्यमातून. म्हणजे म्हणाल, तर दूर नाहीतर जवळच. अशा वेळेस आपण दोन पद्धतीने हे शिकवण्याचे तास आयोजित करू शकतो.
Online Education
Online EducationSakal

विद्यार्थी आणि शिक्षक हे जोडले जाणार मोबाइलच्या माध्यमातून. म्हणजे म्हणाल, तर दूर नाहीतर जवळच. अशा वेळेस आपण दोन पद्धतीने हे शिकवण्याचे तास आयोजित करू शकतो. एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक हे एका प्लॅटफॉर्मद्वारे एकत्रित येतात आणि मग दोघांच्यात संवाद साधत मुले शिकतात. हे झाले प्रत्यक्ष शिकणे-शिकवणे (synchronous). दुसरा प्रकार म्हणजे, शिक्षक आपल्याला शिकवायचे आहे ते एखादे दृकश्राव्य माध्यम वापरून प्रदर्शित करतात, विद्यार्थी त्यांच्या सोयीने केव्हाही, कुठेही ते पाहून, ऐकून शिकू शकतात. येथे विद्यार्थी प्रत्यक्षात ऐकताना समोर नसतात (asynchronous). अर्थात, वर्गात शिकवल्याप्रमाणे अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही पहिली पद्धतीच निवडणार. हे मोबाइलवरचे शिकवणे यशस्वी, आनंददायी, समाधानाचे आणि शिक्षण घडवणारे असे करायचे असल्यास जरा काळजी घ्यायला हवी. थोडे नियोजन, आयोजन... बस्स, मग कदाचित तुम्हाला शाळेत जावेसेच वाटणार नाही!

आता तुमच्याकडे आणि मुलांकडे एक समाईक मीटिंगचे ॲप हवे. झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टिम्स असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करा आणि व्हा तयार शिकवायला. प्रत्येक ॲपमध्ये अनेक सुविधा असतात. त्यांचा उपयोग कसा व केव्हा करायचा हे जाणून घ्या. तुम्ही विद्यार्थ्यांना दिसणार, तुम्हाला विद्यार्थी दिसणार (हो, फक्त त्यांना मारता येणार नाही फोनवरून!), तुम्हाला एकमेकांचे बोलणे ऐकू येणार. तुम्ही मुलांनी काय अभ्यास केला आहे, ते पाहू शकता, त्यांना त्यांच्या चुका सांगून दुरुस्त्याही सांगू शकता. तुम्ही व्हाइट बोर्डपण वापरू शकणार, अगदी वर्गातल्या सारखा. झालंच तर आकृतीपण काढून दाखवू शकता, एखादे चित्र, एखादा व्हिडिओही दाखवू शकता, एखादे गाणे ऐकवू शकता. साद-प्रतिसाद सुरू राहील. आता एवढे सगळे तुम्ही घर बसल्या करू शकणार आहात, तर तुमच शिकवण रंगतदार होणारच ना! हो, पण हे सगळे परिणामकारक करायचे तर मग थोडी मेहनत, तयारी, ती पण एकदाच करायची. तो अनुभव आपण विविध वर्गातून, गटातून परत परत देऊ शकता. तुम्ही म्हणाल, हे आम्हाला माहितीच आहे. नवीन ते काय?

असे करा नियोजन

  • प्रत्येक तासाच्या सुरुवातीला आवश्यक अशा कृतींची योजना तुम्हाला करून ठेवावी लागेल. म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी, प्रेरणा देणारी अशी कृती.

  • विद्यार्थ्यांना का शिकायचेय, अर्थात उद्दिष्ट स्पष्ट व्हावे म्हणजे ते शिकायला बसतील.

  • प्रत्यक्ष अशा अनुभवांचे नियोजन करा, जे कृतींवर आधारित असतील. तुम्ही सांगा विद्यार्थी करतील. त्यांना वाचायला सांगा, प्रश्न विचारा, एखादे वाचून दाखवून त्यावर प्रश्न विचारा, पीपीटीच्या साहाय्याने एखादे कोडे दाखवून सोडवायला लावा. एखादा उपक्रम करायला लावा. विद्यार्थ्यांना आवश्यक असे चेतक, प्रेरक बदलत करीत राहावे, म्हणजे आता पुढं काय ही उत्सुकता त्यांना शिकण्यात गुंतवून ठेवेल.

  • पुस्तकाच्या साहाय्याने काही कृतींचे आयोजन करा. तुमच्या शिकवण्यात विविधता नसेल, विद्यार्थ्यांना समावेश करून घेतले जात नसेल, केवळ विद्यार्थ्यांना ऐकतच ठेवलंत, ॲपमधील विविध सुविधांचा वापर करत नसल्यास विद्यार्थी आपल्या शिकवण्यात/शिकण्यात रस कसा घेणार? या शिकवण्यासाठी लागणारी चित्रे, कोडी, ऑडिओ, व्हिडिओ, विचारायचे प्रश्न, कृती सर्व तयार ठेवावे लागतील.

आपले शिकवणे हे जास्त आनंददायी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार चालू ठेवा. प्रश्न असणारच, आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू या.

- डॉ. उमेश दे. प्रधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com