संवाद : वर्तमानपत्र आणि अभ्यास

पाठ्यपुस्तकातील औपचारिकते पलीकडे जाऊन नित्य व्यवहारातून, दैनंदिन जीवनातील अनेक विषयांचा परामर्श वर्तमानपत्रातून घेतलेला असतो.
Newspaper
NewspaperSakal
Summary

पाठ्यपुस्तकातील औपचारिकते पलीकडे जाऊन नित्य व्यवहारातून, दैनंदिन जीवनातील अनेक विषयांचा परामर्श वर्तमानपत्रातून घेतलेला असतो.

अनेक घरातून अभ्यास करताना वर्तमानपत्र दूर ठेवले जाते. अभ्यासाची वेळ आहे पेपर कुठं वाचत बसला आहेस! असे ओरडून मुलांना अभ्यासाच्या रोजच्या स्वस्त साधनापासून वंचितच ठेवले जाते. खरंतर सहज उपलब्ध असणारे असे पाठ्यपुस्तकाबरोबर वापरता येणारे, स्वस्त आणि रोजचे बदलते असे अध्ययन साहित्य म्हणून वर्तमानपत्राकडे पहायला हवे. अभ्यास करायचा म्हणजे वर्तमानपत्र अनेक उद्दिष्टांनी, अंगाने वाचणे.

पाठ्यपुस्तकातील औपचारिकते पलीकडे जाऊन नित्य व्यवहारातून, दैनंदिन जीवनातील अनेक विषयांचा परामर्श वर्तमानपत्रातून घेतलेला असतो. पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायाशी समांतर आणि पूरक अनेक बाबींचा समावेश त्यात असतो. वर्तमानपत्राच्या रूपाने केवढेतरी जिवंत साहित्य आपल्यासमोर रोज उपलब्ध होत असते. परंतु त्याचा हवा तसा वापर आपण करत नसतो. जाणीवपूर्वक वाचनातून आणि वापरातून वर्तमानपत्रातील अनेक विषयांचा अभ्यास होऊ शकतो. त्यामुळेच रोजचे बदलत जाणारे ताजे पाठ्यपुस्तक म्हणून वर्तमानपत्राकडे पहायला हवे.

वर्तमानपत्र म्हणजे वर्तमानातील घटना असे म्हटले जात असले तरी प्रत्येक वर्तमानपत्रात भूतकाळ आणि भविष्यकाळ असते. घडणाऱ्या घटनांचे ऐतिहासिक स्वरुपातील संग्राह्य दस्तऐवज म्हणून पहायला हवे. वर्तमानपत्राचे संदर्भ म्हणून असणारे मूल्य हे समजून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने वर्तमानपत्र कधीच शिळे होत नसते. त्यातील माहितीचा उपयोग आपण केव्हाही करू शकतो. तो एक खजिना असतो, ज्यात उद्याचे होणारे परिणाम डोकावत असतात.

सामान्यज्ञानात भर घालणारे एक साहित्य किंवा स्रोत म्हणूनच त्याच्याकडे पहायला हवे. वर्गातील अभ्यास आणि प्रत्यक्ष जीवनातील घटना यांची सांगड वर्तमानपत्रातून घातली जाते. भाषा विषयाची तयारी सहजपणे होऊ शकते. भाषा विषयातून येणाऱ्या शालेय स्तरावरील प्रश्नांचा विचार केला तर वर्तमानपत्र नक्कीच एक सोपे मार्गदर्शक म्हणून उपयुक्त होऊ शकेल. उदाहरणार्थ जाहिरातीचे लेखन, जाहिरात आकलन यावरच्या कृती समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष वर्तमानपत्रातील जाहिराती चाळून तयारी करता येईल. बातमी तयार करण्याचा अनुभव रोजच्या वर्तमानपत्राशिवाय दुसरा कोठून मिळणार. शब्दकोडी सोडवून शब्दांवरील प्रभुत्व वाढवता येते.

लेख, सुविचार आणि मुलाखती या सारख्या सदरातून कथा लेखन, पत्र लेखन, संवाद लेखन या सारख्या लेखन प्रकाराची सहज तयारी करता येते. यातूनच भाषाशैली सुधारण्यास मदतच होईल. मत मतांतरे, वाचकांची पत्रे या सारख्या सदरातून व्यक्तिगत मत तयार करणे शक्य होणार आहे. त्यातूनच कल्पना विस्तारासारखा प्रश्नही हाताळता येणार आहे.

गणिताची कोडी, सुडोकु या सारखी सदरे गणिताचा अभ्यास आनंददायी करण्यास मदतच होईल. त्याच बरोबरीने रोजच्या वर्तमानपत्रातून असंख्य प्रकारची सांख्यिकी, ग्राफ उपलब्ध होत असतात त्याचा सुद्धा वापर जीवनातील जिवंत उदाहरणे म्हणून वापर करता येईल. व्यवहारातील उदाहरणे मिळाल्याने विद्यार्थी अभ्यासात जास्त लक्ष घालू लागतील. तेव्हा अभ्यास करा म्हणजे वर्तमानपत्राचे डोळस वाचन करा, संवाद करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com