संवाद : सरावाला द्या अग्रक्रम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study Practice

अभ्यासातील सातत्य आणि सराव हा आश्चर्यकारक असे परिणाम देत असतो. त्यामुळेच त्यातील नियमितता जास्त आवश्यक. सराव असा असावा की, त्याची सवय बनून जावी.

संवाद : सरावाला द्या अग्रक्रम!

सराव म्हणजे अभ्यास पूर्णत्वाला नेण्याची प्रक्रिया. अभ्यासातील परमोच्च क्षण म्हणजे सरावाचा परिपाक. एखादी गोष्ट परत परत केल्याने ती आपल्या अंगवळणी पडते, आपण त्याला रुळून जातो. हे स्वतःला अभ्यासाच्या शैलीमध्ये रुळवून घेणं, ते मनाने स्वीकारणे आणि कृतीत उतरवणं जमायला हवं. सकाळी उठल्यावर आपल्याला सर्व आन्हिके पार पाडण्याची सवय झालेली असते. तो आपल्या शरीराचा एक नित्यक्रम होऊन गेलेला असतो. त्या शिवाय आपल्याला चैन पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे अभ्यासाच्या सरावाचे. त्यात आवर्जून आणि जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक परत परत परिश्रम केले तर यश सहज साध्य होईल.

अभ्यासातील सातत्य आणि सराव हा आश्चर्यकारक असे परिणाम देत असतो. त्यामुळेच त्यातील नियमितता जास्त आवश्यक. सराव असा असावा की, त्याची सवय बनून जावी. आपण काही वेगळे करतो आहोत असे वाटूच नये. एखादा सार्वजनिक कार्यक्रम सादर करण्यापूर्वी गायक रोजच्या रियाजाला महत्त्व देत असतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी एकच उदाहरण, उत्तर परत परत लिहिण्याच्या मागे लागायला हवे. केवळ एकदाच लिहून भागणार नाही. शस्त्राला ज्याप्रमाणे रोज धार करत राहिले पाहिजे तरच त्याच्याकडून अपेक्षित कार्य प्रभावीपणे घडणार. सरावाची मदत तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास होत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास वारंवार करत राहिले पाहिजे. म्हणजे त्याला बोथटपणा येणार नाही, विसरला जाणार नाही. प्रत्येक सराव काहीतरी शिकवून जाणारा असावा.

आपण ज्या विषयाचा अभ्यास करत आहोत, त्यातील आपली कौशल्ये, नियम, फॉर्म्युले, महत्त्वाचे मुद्दे वारंवार आठवणे, वापर करणे आवश्यक असते. धारदार करत रहाणे, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करत ज्ञान वाढवत रहाणे, अद्ययावत ठेवणे हे केवळ सरावामुळे शक्य आहे. आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आपण आज जे काम करीत आहोत ते अजून कसे चांगले होईल यासाठी सततच्या सरावाशिवाय दुसरा कोणताही शॉर्टकट नाही. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो, गुणवत्तापूर्ण बनवतो. असा अर्थपूर्णरित्या केलेला सराव हा फायदेशीर ठरू शकतो. सराव कशाचा करायचा त्या भागाची निवड करायला हवी. सराव हेतुपुरस्सर केलेला असावा. सरावाचा विषय निवडताना आव्हानात्मक आहे, ते प्रथम निवडावे. जे जमते आहे त्यातील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. सरावातून आपली स्वतःशीच असणारी स्पर्धा जाणीवपूर्वक करावी. मागच्या वेळेस लक्षात आलेल्या चुका टाळून जास्त चांगला प्रतिसाद कसा देता येईल याचा विचार हवा. सराव वेळ लावून करायची सवय विकसित करा. जेणे करून परीक्षेत वेळेचे नियोजन शक्य होईल.

सरावाचे नियोजन करत असताना केवळ एकाच अभ्यास कौशल्याचा विचार न करता, विविधतेचा वापर करावा. म्हणजे तुम्ही अभ्यासातला एखाद्या मुद्याविषयी वाचत असाल, तर लिहायला घ्या, किंवा मित्राला वाचायला लावून तुम्ही ऐकत रहा. त्या घटकाविषयी उत्तरे सोडवा, उदाहरणे द्या, स्वतःचे प्रश्न तयार करून उत्तरे द्या. असे अनेक प्रकार जे तुम्हाला तुमची माहिती व ज्ञान वापरायला भाग पाडेल. अशी विविधता तुम्हाला अभ्यासात कंटाळा आणणार नाही आणि वेगळेपणाने विषय पक्का व्हायला मदत होईल. सरावाला आपला मित्र बनवा आणि त्याला अग्रक्रम द्या.