esakal | ‘अ’ ऑनलाइनचा : पाठांतराची आवश्यकता | Study
sakal

बोलून बातमी शोधा

Study
‘अ’ ऑनलाइनचा : पाठांतराची आवश्यकता

‘अ’ ऑनलाइनचा : पाठांतराची आवश्यकता

sakal_logo
By
डॉ. उमेश देवदत्त प्रधान

आपण स्मरणात ठेवतो म्हणजे नक्की काय करतो? मानसशास्त्रात स्मरणशक्तीच्या तीन टप्प्यांचे वर्णन केले आहे. पहिला टप्पा म्हणजे माहितीचे आकलन, दुसरा टप्पा म्हणजे माहितीची साठवणूक आणि तिसरा टप्पा म्हणजे आठवून पहाणे.

अभ्यासाची एक प्राथमिक आणि महत्त्वाची पद्धती म्हणजे पाठांतर. आता पाठांतर म्हणजे नेमके काय? शब्दकोष आपल्याला सांगतो की पाठांतर करणे म्हणजे ‘एखादी माहिती मुखोद्गगत करणे किंवा असणे.’ यालाच प्रतिशब्द म्हणून आपल्याला कंठस्थ करणे, स्मरणात ठेवणे, लक्षात रहाणे असे शब्द प्रयोग करावे लागतील. त्याच्या विरूद्ध म्हणजे सपाट, विस्मरण. वाचलेली माहिती परत आपल्याला आठवत नाही असे वर्णन करावे लागेल.

सर्व अभ्यास हा जे शिकाल ते लक्षात ठेवण्यासाठी आणि अपेक्षित क्षणी अर्थात परीक्षेच्या काळात आठवून लिहिण्यासाठी असतो. त्यामुळेच अभ्यासात असे विस्मरण आपल्याला धोकादायक वाटते. भारतामध्ये मौखिक परंपरा अतिशय प्रगल्भ होती. कालांतराने लेखन आणि नंतर पर्यायाने वाचन या कौशल्यांचा विकास झाला. पुर्वीच्या काळी द्विपाठी, त्रिपाठी अशी परंपरा असणारी घराणी असत. आता मात्र आपल्याला अनेक वेळा अभ्यासूनमगच आठवून पहाण्याची अपेक्षा करावी लागते. अनेक वेळा ऐकून, वाचून आपल्या लक्षात राहिल याची आपल्याला खात्री नसते.

पहिल्या टप्प्यात आपण एखादी माहिती पहातो, वाचतो किंवा ऐकतो. प्राप्त झालेली माहितीचा आपण अर्थ लावायचा प्रयत्न करतो. यालाच आपण आकलन करणे असे म्हणतो. शब्द, चित्र, आवाज या सगळ्यांशी असणारे सहसंबंध आपण तपासून पाहतो. त्यातून आपल्या अगोदरच प्राप्त झालेल्या माहितीशी आपण त्या संबोधांचा संबंध जोडून पाहतो. समजून घेणं ही प्रक्रिया या टप्प्यावर घडत असते.

दुसऱ्‍या टप्प्यात ती माहिती आपण आपल्या मेंदूत साठवतो आणि आपली अपेक्षा अशी असते की ती माहिती आपल्याला पाहिजे त्या वेळेस आठवली पाहिजे. माहितीची साठवणूक करण्यासाठी आपला मेंदू अनेक प्रकारच्या प्रक्रिया करत. अशी माहिती साठवणारी बँक म्हणूनच मेंदू कार्यरत असतो. प्रत्येक माहिती ही तिथे साठवली जाते.

जशीच्या तशी माहिती आठवता येणे म्हणजेच ती माहिती पाठ झाली ही प्रक्रिया घडते स्मरणात ठेवण्याच्या तिसऱ्या ‍या टप्प्यात. परत एकदा प्राप्त केलेली माहिती लक्षात येणं या टप्प्यात घडत असतं. आठवून पाहणं, स्मरणात येणं या टप्प्यावर घडत.

प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत या तीनही टप्प्याच्या बाबतीत सारखेपणा नसतो. या सर्वच टप्प्यांच्या बाबतीत परिणाम करणारे असे अनेक घटक असतात. परंतु अभ्यासाच्या दृष्टीने मात्र या तीनही टप्प्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच प्रत्येक टप्प्याचा विचार अभ्यास चांगला व्हावा यासाठी आपल्याला करायला हवा. आकलन, साठवणूक आणि आठवण यांचा विचार करताना विविध तंत्रांचा उपयोग केल्यास हे साध्य करता येऊ शकत.

पाठांतर कसे करावे? घोकंपट्टी करत राहणं ही एक अभ्यासाची पद्धतच आहे. एखादी व्याख्या, नियम, कवितेतील ओळ सतत मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणत राहिल्याने ते पाठ होऊन जाते. काही वेळेस पाठांतर करायची बाब ही परत परत लिहून काढल्याने पण लक्षात राहते. जेवढ्यावेळा आपण आवर्तन करू तितकी ती बाब लक्षात रहायला मदत होते. पाठांतरात आपल्या स्मरणात काय राहिले आहे हे तपासून पाहणे आवश्यक असते. त्यामुळे काही वेळाने आपण काय पाठ केले ते समजून घेणे गरजेचे असते. यांत्रिकपणे केलेले पाठांतर काय कामाचे? असे पाठांतर चुकीचे ठरते. समजून उमजून केलेले पाठांतर नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

पाठांतर आणि उपयोजन याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. जे जे आपल्याला लक्षात रहावे असे वाटते ते ते वापरून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ स्पेलिंग लक्षात ठेवताना ते वाक्यात वापरून पहावे. गणितातील फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी तो सतत वापरून पहावा. समजून घेऊन विविध प्रसंगी केलेल्या वापराने हे शक्य होते. पाठांतराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ती एक अभ्यासाची मूलभूत पद्धती म्हणून नक्कीच महत्त्वाची.

loading image
go to top