
खरंतर एक शिक्षक बरंच काही करू शकतो. प्रत्येक शाळांमधून करिअरविषयी समुपदेशन करण्यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती केलेली असते.
संवाद : शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
खरंतर एक शिक्षक बरंच काही करू शकतो. प्रत्येक शाळांमधून करिअरविषयी समुपदेशन करण्यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती केलेली असते. त्याचे कामच विद्यार्थ्यांची जाणीव जागृती करून देणं हे असतं. भवितव्य हा विषय घेऊन अनेक उपक्रम शाळा राबवत असतात. आता नववर्षात करिअर, शाखा निवड हा विषय शाळा प्रभावीपणे राबवू शकतात, त्याविषयी वर्षभर काय करता येईल याचं नियोजनपण करू शकतात. किंबहुना हा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश का घ्यावा यासाठी आकर्षणाचा विषय ठरवू शकतात. त्यामुळेच इतर विषय शिक्षकही हे काम सहजतेने करू शकतात.
विद्यार्थ्यांचे भवितव्य, करिअर निवड, शाखा निवड, यासाठी विषय शिक्षक मुलाची विशेष मदत करू शकतात. विषय अध्यापनाच्या बरोबरच विद्यार्थ्यांचे हित जोपासणे त्यासाठी त्यांना समुपदेशन, मार्गदर्शन करणे हे खरंतर शिक्षकाचं कर्तव्यच आहे. विषयातील आशयाची सांगड ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी घालता यायला पाहिजे. अमुक एक विषय शिकल्यानंतर त्या विषयाच्या आधारे आपण भविष्यात कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेऊ शकतो याची माहिती शिक्षकाने वर्गात देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची आवड निर्माण व्हायला असा संवाद नक्कीच विद्यार्थ्यांना आश्वासित करून जाईल. हा विषय का शिकावा यामागची प्रेरणा यातून उपलब्ध होईल. शालेय विषय हे कोणत्या ना कोणत्या तरी व्यवसाय, धंदा, नोकरी यांच्याशी जोडलेले असतात. त्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं आवश्यक असतं. विषय शिकण्यामागचं कारण यातून सापडेल आणि तसा प्रयत्न मुल करू लागतील.
परिपूर्ण माहितीची आवश्यकता
एकतर शिक्षकाकडे आपल्या विषयातील अध्यापनातून विविध अशा रोजगाराच्या संधी याविषयी आवश्यक माहिती तयार असावी. त्याअनुषंगाने आवश्यक ती कागदपत्रे, विविध संस्थांची प्रोस्पेक्टस, माहितीपत्रक, बारीक-सारिक माहिती संग्रही असतील तर मुलं त्या विषयाच्या अध्ययनाकडे नक्कीच आकर्षित होतील. तो विषय शिकण्यामागची उद्दिष्ट त्यांना स्पष्ट असतील. अध्ययनात ते रस घेऊ लागतील ते वेगळेच. विद्यार्थ्यांना बोलत करणारा मुक्त संवादाचा, शंकासमाधानाचा तास शिक्षक योजू शकतात. शिक्षकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न यासाठी गरजेचे. तुमच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्याला बोलावून त्याचा मुलांशी संवाद घडवून आणता येईल. प्रत्यक्षातील अनुभव हा नेहमीच बोलका असतो. शिक्षक हाच विद्यार्थ्याचा मुख्य प्रेरणा स्रोत असतो. आपल्या पालकांपेक्षा थोडाजास्तच विश्वास त्यांचा शिक्षकांवर असतो. म्हणूनच शिक्षकाची भूमिका महत्त्वाची. त्यांनी अभ्यासपूर्णरितीने विद्यार्थ्यांना सामोरे गेल्यास ते त्यांच्या हिताचं भरपूर काही देऊ शकतात अगदी हक्काने, आग्रहाने.
Web Title: Dr Umesh Pradhan Writes Role Of Teachers Is Important
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..