संवाद : नकळत होतो अभ्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Study

अभ्यास ही अशी कृती लादली जाऊ शकत नाही. इतरांच्या सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतः काय वाटते ते महत्त्वाचे. म्हणूनच स्वयंप्रेरणा ही अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्रेरक ठरते.

संवाद : नकळत होतो अभ्यास

‘बास झाले खेळणे आता जरा अभ्यासाला बसा’ अशी सक्ती करून अभ्यास कधीच होत नसतो. अभ्यासाला बसलोय म्हणजे तो होणारच याची खात्रीही आपण देऊ शकत नाही. अभ्यास करण्याची ऊर्मी आतून निर्माण व्हायला हवी, मनाला तशी उत्तेजना मिळायला हवी. काहीतरी नवीन समजून घ्यायला तयार असेल, तशी अतः प्रेरणा असल्यास ते आत्मसात केले जाईल. अर्थात त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यकच. म्हणूनच अभ्यासासाठीची सहजता जपणे आपली जबाबदारी आहे.

अभ्यास ही अशी कृती लादली जाऊ शकत नाही. इतरांच्या सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतः काय वाटते ते महत्त्वाचे. म्हणूनच स्वयंप्रेरणा ही अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्रेरक ठरते. अभ्यासाची ऊर्मी निर्माण होण्यासाठी वातावरण निर्मितीपण करणे तितकेच जरुरीचे असते. अन्यथा अभ्यासापासून पळून जाण्याची सवय लागल्यास मन अभ्यासासाठी तयार होणार नाही. ‘अभ्यास’ म्हणून तो करायला सहसा आपले मन तयार नसते. तो करण्यामागची आवश्यकता, गरज, महत्त्व समजल्यास कदाचित तो करायला मन तयार होऊ शकते. नाहीतर अभ्यासापासून पळण्याचीच वृत्ती सगळ्यांमध्ये असते. आवड असेल तर होईल सवड असे म्हटले जाते. वेळ नाही ही तक्रार नेहमी केली जाते परंतु तो काढावाच लागतो.

इच्छा असेल, मनाला बरं वाटत असल्यास वाचलेले समजून घ्यायला आणि लक्षात रहायला मदत होते. मन मोकळे, हलके, ताणतणाव मुक्त हवे. तरच अभ्यास मेंदूत शिरू शकतो. नाहीतर अभ्यासाच्या नावाने केवळ वेळ जातो आणि डोक्यात काहीच शिरत नाही. अर्थात अशा वेळेस मनावर सकारात्मक ताण देण्याची गरज असते. अशा दबावाशिवाय मेंदू शिकायला तयार होईलच असे नाही. म्हणूनच कुणीतरी सांगतय, मागे लागलंय म्हणून अभ्यास होत नसतो. आपल्याला स्वतःला तसे वाटायला हवे.

आपले मन सतत नवनवीन गोष्टी अनुभवत असते. यातूनच समृद्धता वाढत असते. म्हणूनच खरे शिक्षण हे अविरत चालणारे असते असे म्हणतात. रस्त्यावरून चालताना दिसणाऱ्या जाहिरातीवरून आपण आपली शब्दसंपत्ती, शब्दउपयोग हे सगळ पहात असतो शिकत असतो. शाळेत गेले म्हणजेच शिक्षण होते असे नाही. अनौपचारिकरीत्या अनेक शब्द, शब्दप्रयोग, गणित, विज्ञानातले नियम आपण आपल्या दैनंदिन अनुभवातून मिळवत असतो. सहजपणे आत्मसात करत असतो. न कळत होणाऱ्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून जास्तीत जास्त अनुभव समृद्ध होणे गरजेचे आहे. शाळेत दिले गेलेले तात्त्विक विचार, ज्ञान हे पडताळून पाहण्याचा, त्याचे उपयोजन करण्याचा गृहपाठ तर व्हायलाच पाहिजे.

सिनेमातील गाणी आपण पाठ करत बसत नाही. नकळत ती आपल्या तोंडात बसलेली असतात. कोणताही विषय न कळतपणे आपण आत्मसात करत असतो. टि.व्ही. पहात असताना आपण अभ्यास करत नसतो. परंतु मन मात्र अनेक गोष्टी टिपत असत, पहात असत, त्यावर विश्वास ठेवत असत. म्हणूनच परीक्षेच्या काळात टि. व्ही. पहाणे बंद, वर्तमानपत्र वाचणे बंद असे करून चालणार नाही. खरा अभ्यास सतत सुरूच असतो. केवळ योग्य वेळी त्याचा वापर करण्याचे कौशल्य मात्र प्राप्त करणे आवश्यक आहे.

टॅग्स :educationDr Umesh Pradhan