

अभ्यासासाठी मूल्यमापन की मूल्यमापनासाठी अभ्यास? नक्की काय ते ठरवा. आपण अभ्यास करतो आणि परीक्षा देतो.
- डॉ. उमेश दे. प्रधान
अभ्यासासाठी मूल्यमापन की मूल्यमापनासाठी अभ्यास? नक्की काय ते ठरवा. आपण अभ्यास करतो आणि परीक्षा देतो. परंतु हे सर्व आपण कोणासाठी करत असतो? आपल्या शिक्षकांसाठी, शाळेसाठी की आई-वडिलांसाठी. त्यांना बरे वाटावे म्हणून आपले प्रयत्न सुरू असतात का? खरंतर हे सर्व आपण करत असतो आपल्या स्वतःसाठी.
दुसऱ्याशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःची तुलना स्वतःशी करून अगोदरपेक्षा जास्त चांगले सादरीकरण किंवा कामगिरी पुढच्या वेळेस कशी होईल याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला काय येते आहे आणि किती येते आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणूनच खरंतर आपली प्रगती जाणून देण्यासाठी बाह्य परीक्षकाची गरज नाही. आपणच आहोत आपले परीक्षक. जाणून घेऊया स्वयंमूल्यमापन तंत्राने अभ्यास कसा करावा याविषयी.
स्वयंमूल्यमापनाचा हेतू
स्वयं म्हणजे स्वतःचे आणि मूल्यमापन म्हणजे परीक्षा. स्वतःचीच स्वतः घेतलेली परीक्षा. स्वतःची प्रगती साधण्यासाठी स्वतःमधील दोष, उणिवा यांची जाणीव करून घेऊन प्रगतीच्या अनुषंगाने नियोजन करणे स्वयंमूल्यमापनातून शक्य होते. अभ्यासाबाबत दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या संपादणूक पातळीची तुलना स्वतःशीच करता येते. अभ्यासाची दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. स्वतःसाठीचे प्रत्याभरण यात अपेक्षित असते. काय येत नाही, कोठे जास्त प्रयत्न करणे हे नक्की करता येते. ठराविक टप्यांमधून, अविरतपणे, संपादणुकीत पद्धतशीरपणे करावयाचे प्रयत्न म्हणजे स्वयंमूल्यमापन.
स्वयंमूल्यमापनाचे महत्त्व
स्वतःची उद्दिष्टे ठरवून व स्वतःची एखाद्या संकल्पनेबाबत असणारी संपादणूक पातळी तपासण्यासाठी घेतलेली कसोटी. स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी याचे नियोजन केले पाहिजे. कोणत्याही परीक्षेसाठी नाही, तर स्वतःला जाणून घेण्यासाठी त्याचे परिणाम लक्षात घ्यायचे असतात. यात किती गुण मिळाले हे महत्त्वाचे नसते तर काय योग्य आले, बरोबर आले, काय चुकले हे पाहता येते. व्यक्तिगत प्रगती साधण्यासाठी या कसोटीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. स्वयंमूल्यमापनातून अभ्यासाविषयी आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मनिर्भरता वाढण्यास मदत होते.
मूल्यमापन कसे कराल?
स्वतःचे परीक्षण करण्यासाठी या तंत्राचा वापर आपण करायला हवा. आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारा, उत्तरांचा शोध घ्या. दिलेले उत्तर तपासून घ्या. काय बरोबर आले आहे, काय चुका झाल्या आहेत ते नीट समजून घ्या. आपल्याला काय येत होते, आता काही प्रगती झाली आहे की नाही हे तपासा. केवळ गुणांवर समाधानी राहू नका. गुण हे संपादणुकीचे खरे द्योतक नाहीत. एखादा प्रश्न घेऊन परीक्षेप्रमाणे ठराविक वेळ लावून प्रश्न सोडवा. इतर कशाचीही मदत घेऊ नका.
काय काळजी घ्यावी?
सर्वकाही स्वतःसाठी करून स्वतःचा शोध घ्यायचा असल्याने स्वतःची कोणत्याही बाबतीत फसवणूक करून चालणार नाही. गैरमार्गाचा वापर करणे टाळा. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. स्वतःबद्दल प्रामाणिक रहाणे महत्त्वाचे. स्वतःच्या प्रगतीचा विचार डोक्यात ठेऊन अभ्यास, प्रयत्न केल्यास तुमचे यश नक्कीच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.