
करिअर अपडेट : साहसी पर्यटन
- डॉ. वंदना जोशी
भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. भारतातील नद्या, पर्वत, समुद्रकिनारे, डोंगराळ प्रदेश, वाळवंट, किल्ले, अरण्ये असे अनेक घटक हे साहसी पर्यटनाचे पायाभूत घटक आहेत. यामध्ये पर्यटक पाण्यात जाऊन पाण्याखालील प्राणी व समुद्री जीवांचा अनुभव घेऊ शकतात, अवघड अशा पर्वत चढण्याचा किंवा विमानातून उडी घेऊन हवेत उडण्याचा अनुभव घेऊ शकतात.
साहसी पर्यटन हा एक पर्यटनाचा प्रकार सध्या मुख्यत्वे तरुण वर्गामध्ये फार प्रचलीत आहे. साहसी पर्यटन म्हणजे दुर्गम भागात जाऊन प्रवास करणे व तिथे पर्यटकाने अनपेक्षित गोष्टीची अपेक्षा ठेवणे होय. यासाठी पर्यटकाला त्याच्या कम्फर्टझोनमधून बाहेर यावे लागते.
भारतामध्ये पर्यटकाचा साहसी पर्यटनाकडे ओढा वाढताना दिसून येत आहे. साहसी पर्यटन मुख्यत्वे गिर्यारोहण, रॅप्लिंग, रॉक क्लायंबिंग, स्किइंग, ट्रेकिंग, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपींग, स्कुबा डायव्हिंग इत्यादी प्रकारांत विभागले गेले आहे.
भारताचा साहसी पर्यटनाचा जागतिक पातळीवर ९५ वा क्रमांक आहे, व त्यामध्ये सर्वांत जास्त ५०.८ टक्के पर्यटक हे जमिनीवरील (land based) साहसी पर्यटक आहेत. सन २०१९ मध्ये ३,००,११,४११ भारतीय पर्यटक व ४,५८,२७८ परदेशी पर्यटकांनी साहसी पर्यटनाचा अनुभव घेतला आहे. भारतातील या पर्यटनाला कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण सध्या १,२७५ साहसी पर्यटकांमागे १ साहसी टूर ऑपरेटर असे समीकरण आहे.
करिअरसाठी आवश्यक कौशल्ये
उत्साह, आत्मविश्वास व धैर्य हे गुण. यासोबत संभाषणकौशल्य, नम्रता व टाइम मॅनेजमेंट.
पर्यटन परिसराची इत्थंभूत माहिती- ज्यामध्ये निसर्गसंबंधित इतिहास, ताज्या घटना घडामोडी, सांस्कृतिक वारसा आदींचा समावेश.
उत्तम फिटनेस, निर्णयक्षमता व क्रायसिस मॅनेजमेंट.
सस्टेनॅबिलिटी- ज्यामध्ये निसर्गाचे व तेथील संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करता येते.
काही महत्त्वाच्या संस्था
गिर्यारोहण हा साहसी पर्यटनामधील मुख्य प्रकार असून त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. अनेक संस्था गिर्यारोहणाचे शॉर्ट टर्म अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण देत आहेत. मात्र, त्याहीसाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम किंवा पर्यटनाशी संबंधित इतर अभ्यासक्रम आधी केला असल्यास उत्तम.
नेहरू इन्स्टिट्यूट अँड माऊंटेनिअरिंग, उत्तर काशी (उत्तराखंड)
अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स, मनाली (हिमाचल प्रदेश)
जवाहरलाल इन्स्टिटूट ऑफ माऊंटेनिअरिंग अँड विंटर स्पोर्ट्स, पहलगाम (जम्मू-काश्मीर)
हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)
हिमालयन ॲडव्हेंचर इन्स्टिट्यूट, मसुरी (उत्तराखंड)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स, दिरांग (अरुणाचल प्रदेश)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट फॉर वॉटर स्पोर्ट्स, गोवा
गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग, पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने)
या व्यतिरिक्त अनेक खासगी संस्था भारतामध्ये विविध ठिकाणी पर्यटनाचे छोटे अभ्यासक्रम राबवित आहेत.
साहसी पर्यटनामधील रोजगाराच्या संधी
नैसर्गिक आव्हानांना एक्स्प्लोअर करण्यासाठी आवश्यक असलेले मुख्य असे मनुष्यबळ :
ॲडव्हेंचर टूर आपरेटर, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रेनर, वाइल्ड लाईफ व ॲडव्हेंचर फोटोग्राफर, टीम बिल्डिंग प्रोग्रॅमर, वॉटर व एरोस्पोर्ट्स स्पेशालिस्ट, निसर्ग अभ्यासक इत्यादी.
Web Title: Dr Vandana Joshi Writes Career Update Adventure Tourism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..