
संवाद : अर्थशास्त्रातील करिअर संधी
- डॉ. विकास सुकाळे
सर्वसामान्यपणे अर्थशास्त्र केवळ पैशासंबंधी आहे, असा अर्थ घेतला जातो, मात्र हे तितकेसे खरे नाही. अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती मोठी आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, विकासाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र, गणितीय अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, इत्यादीच्या माध्यमातून जगामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात शिकवला जातो. या अनुषंगाने अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरच्या संधी व्यापक आहेत.
रोजगार कोठे मिळेल?
शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होता येते.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्राचा भाग महत्त्वाचा आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर अर्थशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना ‘आयएस’मध्ये (इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस) सेवा करता येते.
अर्थशास्त्रामध्ये सांख्यिकी हा विषय महत्त्वाचा आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरकारचे सांख्यिकी कार्यालय आहे तसेच शासनाच्या प्रत्येक विभागात सांख्यिकीय कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले जाते. सांख्यिकी विषय घेऊन शिक्षण पूर्ण केले आहे, अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सांख्यिकीय कार्यालयांमध्ये रोजगार मिळू शकतो.
अर्थशास्त्र हा संशोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे. संशोधनामध्ये माहितीचे निर्वाचन, माहितीचे वेगवेगळ्या आलेखाच्या साहाय्याने सादरीकरण हा सर्व भाग अर्थशास्त्रामध्ये येतो. म्हणून संशोधन क्षेत्रातही विद्यार्थ्याला अनेक संधी आहेत.
वेगवेगळ्या बँकांमध्ये अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना ऑफिसर म्हणून संधी आहेत. ‘आरबीआय’मध्ये यंगस्कॉलर परीक्षा देऊन उच्च पदावर सेवा करता येते. ‘आरबीआय’मध्ये द्वितीय श्रेणीतील वेगवेगळ्या नोकरी उपलब्ध आहेत. या संधी अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांना मिळू शकतात.
सरकारच्या वित्त विभागात करआकारणी, करवसुली हा भाग येतो. यामध्ये अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांची नितांत गरज आहे. विविध परीक्षा देऊन अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.
भारतामध्ये शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीचे नियोजन, उत्पादन पद्धती, आधुनिक दृष्टिकोन, अर्थव्यवस्था, मालाची किंमत इत्यादी दृष्टिकोनातून हा विषय महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने कृषी क्षेत्रात रोजगार मिळू शकतो.
अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध होते. उदा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, युनो या सर्व क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची गरज आहे.
सेबी, इंडियन बँक असोसिएशन, नॅशनल हाउसिंग बोर्ड, आयात-निर्यात बँक, लघु उद्योग विकास बँक, सहकारी बँक, व्यापारी बँका या सर्व ठिकाणी अर्थशास्त्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.
जगात वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. व्यवस्थापन करण्यासाठी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. पर्यावरण व्यवस्थापन, उत्पादन पद्धती, वित्तीय संबंध या सर्व क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळू शकते.
अर्थशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्था
१) टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई
२) दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली
३) दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली
४) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
५) मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, चैन्नई
६) गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे
७) मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठ, मुंबई
८) इंडियन इन्स्टिट्यूट, कोलकता
९) इंदिरा गांधी डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट, गोरेगाव, मुंबई
१०) कृषी संशोधन व विकास संस्था, बंगळूर
११) बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
Web Title: Dr Vikas Sukale Writes Career Opportunity In Economics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..