ऑफ बिट : म्युच्युअल फंड : करिअरसाठी नवे क्षेत्र

बारावीनंतर कोणत्याही शाखेचे पदवीचे शिक्षण घेताघेता देशातील वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीचा भाग होण्याची संधी म्युच्युअल फंड सल्लागार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन साधता येते.
Mutual Fund
Mutual FundSakal
Summary

बारावीनंतर कोणत्याही शाखेचे पदवीचे शिक्षण घेताघेता देशातील वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीचा भाग होण्याची संधी म्युच्युअल फंड सल्लागार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन साधता येते.

बारावीनंतर कोणत्याही शाखेचे पदवीचे शिक्षण घेताघेता देशातील वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीचा भाग होण्याची संधी म्युच्युअल फंड सल्लागार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन साधता येते. गेल्या काही वर्षात आपल्या देशात म्युच्युअल फंड हा व्यवसाय अतिशय वेगाने वाढत आहे. अँफी (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया) या संस्थेने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ३१ मे २०२२ रोजी तब्बल ३७ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली संपत्ती भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायात आहे. गेल्या दहा वर्षात या बाजारमूल्यात पाचपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. या व्यवसायाचे नियंत्रण सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ही भांडवली बाजारातील सर्वोच्च संस्था करते. गेल्या काही वर्षात पारंपरिक गुंतवणुकीवरील परतावा कमी होत चालल्याने सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकर्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, शेअर बाजारातील खाचाखोचा माहीत नसल्याने असा गुंतवणूकदार तुलनेने सुरक्षित असलेला म्युच्युअल फंडाचा मार्ग निवडतो. सध्या आपल्या देशात म्युच्युअल फंडांची एकूण तेरा कोटींपेक्षा अधिक खाती (फोलिओ) आहेत आणि एकूण ४४ म्युच्युअल फंड कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता या व्यवसायाच्या वाढीला अजूनही खूप मोठा वाव आहे.

शैक्षणिक पात्रता

‘सेबी’ या संस्थेच्या नियमांनुसार म्युच्युअल फंडांची विक्री करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी किंवा त्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी म्युच्युअल फंडाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट (एनआयएसएम) ही संस्था परीक्षा घेते. म्युच्युअल फंडांचे कामकाज कसे चालते, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे काय आहेत, त्यातील जोखीम काय आहे, गुंतवणुकीतील फायद्यावर प्राप्तीकर कसा आकारला जातो याशिवाय म्युच्युअल फंड सल्लागाराची भूमिका काय असावी आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश या परीक्षेच्या अभ्यासक्रमात असतो.

वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला कोणत्याही शिक्षण शाखेचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेतली जाते आणि प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी असते. ती शंभर गुणांची असते आणि त्यात शंभर प्रश्न असतात. या परीक्षेसाठी ‘निगेटिव्ह मार्क्स’ची पद्धत वापरली जात नाही. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असतो. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी पन्नास गुण मिळणे आवश्यक असते. सध्याचे परीक्षाशुल्क केवळ १५०० रुपये असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात मेलआयडीवर पाठवली जातात. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. या परीक्षांचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी मोठ्या शहरात क्लासेस आहेत शिवाय NISM च्या वेबसाइटवर सराव परीक्षा देखील उपलब्ध आहे.

परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला AMFI Registration Number मिळतो. हा ARN क्रमांकाचे दर तीन वर्षानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. हे नूतनीकरण करण्यासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’ पूर्ण करणे आवश्यक असते. याविषयी अधिक माहितीसाठी https://www.nism.ac.in/mutual-fund-distributors/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा अवश्य द्यावी. ती उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करता येऊ शकतो, वित्तीय कंपन्यात नोकरीची संधी मिळू शकते तसेच गुंतवणूक सल्लागारांच्या ऑफिसमध्ये पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरी मिळू शकते.

एमबीए (फायनान्स), सीए , सीएमए, सीएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा अवश्य द्यावी. भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. भविष्यातील या उज्ज्वल करिअरच्या दिशेने ही परीक्षा हे पहिले पाऊल ठरू शकते.

(लेखक इंदिरा ग्लोबल बिझनेस स्कूल या एमबीए संस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com