
पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयांतील शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. पदवीचे (युजी) प्रवेश वेळेत होतील, पण दरवर्षी १५ जुलैपर्यंत होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबले आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरीही पदवीचे निकालच घोषित झाले नसून, पुढील शैक्षणिक वर्षाचेही वेळापत्रक कोलमडण्याची दाट शक्यता आहे. कोरोनामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन्ही शैक्षणिक सत्रांचे वेळापत्रक कोलमडले होते. आता २०२२-२३ दरम्यानचे शैक्षणिक सत्र पूर्ववत करण्याचे आव्हान विद्यापीठ प्रशासनासमोर होते. मात्र, सत्र परीक्षाच ऑगस्टपर्यंत लांबल्या आहे.
त्यामुळे परीक्षा पूर्ण होऊन निकाल लागण्यासाठी अजून दीड महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलग चौथ्या वर्षीही पीजीचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबरोबरच नवीन संधींनाही मुकावे लागत आहे. पुढील शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे विद्यापीठ प्रशासनासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे.
पदवी प्रवेश सुरू
आठ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे बी.ए., बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम वर्ष प्रवेशाला यापूर्वीच सुरवात झाली आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पदवी प्रवेश शैक्षणिक वेळापत्रकानुसार होतील. मात्र, पदव्युत्तरचे प्रवेश कॉलेज आणि विभागांतही रखडतील. पण महाविद्यालयांचेही शैक्षणिक सत्र आता एक महिना पुढे जाईल.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये - ७०५
एकूण अभ्यासक्रम - २८४
परीक्षार्थी - ६ लाखांपेक्षा जास्त
विद्यापीठाच्या जवळजवळ ६० टक्के परीक्षा पूर्ण झाल्या असून, संबंधित अभ्यासक्रमाची परीक्षा संपल्यानंतर कमीत कमी वेळेत आम्ही निकाल घोषित करत आहोत. अभियांत्रिकीचा निकाल आठवड्याभरातच लागणार आहे. शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
परदेशातील पदव्युत्तर पदव्यांच्या शिकवण्यांना सुरवात झाली आहे. मात्र, आपल्याकडे अजूनही विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या पदवी परीक्षा चालू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी मुकले आहे. मी विधी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असून, आमच्या बार कौन्सिलच्या परीक्षांनाही लांबलेल्या परीक्षांचा फटका बसणार आहे.
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हॅंड
Web Title: Education News Academic Schedule Of Pune University Collapsed Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..