
NAAC : नॅक - महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी आता मार्गदर्शक कक्ष
पुणे : विद्यापीठांचे विकेंद्रीकरण आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या स्वायत्ततेसाठी नवीन शैक्षणिक धोरणात (एनईपी) राष्ट्रीय मान्यता परिषदेचा (एनएसी) प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाविद्यालयांना मूल्यांकन आणि स्वायत्ततेसंबंधीच्या बदलांची माहिती व्हावी, यासाठी मार्गदर्शक कक्षाची (हॅन्डहोल्डींग ॲण्ड मेंटरींग सेल) निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मान्यता परिषदेच्या निर्मितीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद (नॅक), नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॅंकींग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या संस्थांद्वारे रोडमॅप तयार करण्यास सांगितला आहे.
एनईपीमध्ये दर्जेदार महाविद्यालयांना टप्प्याटप्प्याने स्वायत्तता देण्याचा विचार मांडण्यात आला आहे. दीर्घकाळ चालणारीही प्रक्रिया दुहेरी चालणार असून, यासाठी उच्च शिक्षणसंस्थांना प्राथमिक निकष, दर्जा, स्वयंशासन आणि स्वायत्ततेसाठी काही मानके (बेंचमार्क) गाठावे लागणार आहे. नव्या धोरणात मूल्यांकन आणि मान्यता प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल सुचविले आहेत. या बदलांसंबंधी उच्च शिक्षण संस्था जागरूक व्हाव्यात, यासाठी मार्गदर्शन कक्षाची स्थापना केल्याची माहिती नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली. ते म्हणाले,‘‘प्रस्तावित सुधारणांबद्दल अधिक जागृकता निर्माण करणे, मान्यतांचे महत्त्व पटवून देणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी मूल्यांकनासाठी पुढे यावे.’’ नॅकचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा यांनी विजयादशमीला हँडहोल्डिंग आणि मेंटॉरिंग सेलच्या स्थापनेची घोषणा केली.
कक्षाचे फायदे
- नवीन शैक्षणिक धोरणातील येऊ घातलेले बदल महाविद्यालयांना टिपता येतील
- मूल्यांकनातील बदलांची माहिती आणि समुपदेशन मिळणार
- मूल्यांकन आणि स्वायत्ततेसाठी आवश्यक पूर्ततेची माहिती मिळणार
- दुहेरी आणि दीर्घकालीन प्रक्रिया असल्यामुळे उच्च शिक्षण संस्थांना कक्षाकडून वेळोवेळी आवश्यक मदत पुरवली जाणार
नोंदणीसाठीचे संकेतस्थळ ः http://naac.gov.in/