
एमपीएससीच्या ट्वीटनंतर विद्यार्थी बॅकफूटवर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) धमकी वजा सूचनेच्या ‘ट्वीट’ने आंदोलक विद्यार्थी बॅकफुटवर आले आहे. कारवाईच्या भीतीने सोमवारी (ता.२५) पुण्यात होणारे आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील नव्या बदलांसंबंधी विद्यार्थ्यांचे काही आक्षेप होते. वर्णनात्मक परीक्षापद्धतीचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मात्र त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अवाढव्य असून, त्याच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी द्यावा, २०२३ ऐवजी २०२५ पासून अभ्यासक्रम राबवावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी सोमवारी दुपारी शास्त्री रस्त्यावरील इंदुलाल कॉम्प्लेक्स जवळ विद्यार्थी जमणार होते.
मात्र शनिवारीच (ता.२३) एमपीएससीने ट्वीट करत विद्यार्थ्यांवर कारवाईचा इशारा दिला. एमपीएससी म्हणते, ‘‘राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमा संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल.’’ करिअरची चिंता, एमपीएससीकडून कारवाईची भीती आणि पोलिसांच्या परवानगी अभावी विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. यासंबंधी आयोगाच्या अध्यक्षांना विचारले असता, त्यांनी कोणतीही टिप्पणी न करण्याची भूमिका घेतली.
नव्या बदलांचे आम्ही स्वागतच केले आहे. फक्त अभ्यासक्रम थोडा उशीराने राबवावा, जेणेकरून तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी होती. पण आता सर्वच दरवाजे बंद झाले आहे.
- राजेंद्र पवार, विद्यार्थी (नाव बदलले)
सुमारे आठ हजार विद्यार्थी आंदोलनासाठी तयार झाले होते. मात्र, एमपीएससीच्या ट्वीटनंतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलन केल्यास कारवाईची भीती असून, आमचा न्याय मागणीचा आवाज दडपण्यात आला आहे.
- किशोर जाधव, विद्यार्थी (नाव बदलले)
Web Title: Education News Students Get Back From Protest After Mpsc Tweet Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..