शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण

महाराष्ट्र राज्य शासन प्रत्येक वर्षीच्या मे व जून महिन्यामध्ये परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारते.
Education through scholarships
Education through scholarshipssakal

- ॲड. प्रवीण निकम

नुकताच आपण ‘महाराष्ट्र दिन’ जोमाने साजरा केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तरच्या काही काळाचा विचार केला तर लक्षात येईल की, महाराष्ट्र ही तीच भूमी आहे जिच्या सानिध्यात अनेक सामाजिक, राजकीय व‌ शैक्षणिक गोष्टींचा भक्कम वारसा आहे.

या सगळ्यात परदेशी शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य काही मागे नाही. संपूर्ण देशातील अगदी बोटावर मोजण्याइतकी राज्ये आहेत, जी आपल्या राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करते.

महाराष्ट्र राज्य शासन प्रत्येक वर्षीच्या मे व जून महिन्यामध्ये परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारते. यापैकी एक योजना राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेत आपल्यालाही सहभागी होता येईल.

या संदर्भातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंकवर जाऊन डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे येथे पाठवू शकता. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. साधारणतः २००३ या शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण या विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू केली गेली.

राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. सुरुवातीला या शिष्यवृत्तीची संख्या कमी होती. परंतु यामध्ये नुकतीच वाढ केली असून, साधारणतः प्रत्येक वर्षी ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षण व पीएचडी अभ्यासक्रमाचा संपूर्ण खर्च म्हणजे विद्यापीठ/कॉलेजची फी, विमान प्रवास आणि राहण्या-खाण्यासाठीचा निर्वाह भत्ता दिला जातो. आपण जगातील नामांकित अशा क्यू.एस. नामांकन यादीप्रमाणे पहिल्या १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यापीठात प्रवेश मिळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्या विद्यापीठाचे विना अटीशिवाय प्रवेश मिळाला असल्याचे पत्र असणे आवश्यक आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या अमेरिकेतील कोलंबिया आणि ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणासाठी प्रवेश अर्जासाठी प्राधान्य देण्यात येते. अनुसूचित प्रवर्गातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वाची ही शिष्यवृत्ती असून, याचा लाभ तळागाळातील विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायला हवा. केंद्र व राज्यशासनाच्या वतीने समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अशा विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्य प्रत्येक प्रवर्गासाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती देते. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीबाबत सखोल माहिती व या विषयीचा प्रचार-प्रसार होणे, अत्यंत गरजेचे आहे.

जेणेकरून बहुजन-वंचित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि आपल्या शिक्षण घेण्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकले जाईल. यापुढील काही लेखांतून राज्य शासनामार्फत प्रत्येक प्रवर्गासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. परदेशी शिक्षण म्हटले की आधी ‘परिस्थिती’ नावाची बाब प्रकर्षाने समोर येते. परंतु परदेशी शिक्षणाची स्वप्न बघणे आणि ती सत्यात साकार होणे यात बराच काळ असला तरी जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर हा ध्यास पूर्ण होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com