वास्तुकलेतील शाखा-उपशाखा आणि पदव्युत्तर शिक्षण

वास्तुकलेचा विद्यार्थी पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणातून विशेष प्रावीण्य स्वतःच्या आवडीनुसार विशिष्ट अशा शाखेमध्ये मिळवू शकतो.
Engineer Degree education engineer Post-Graduate Studies in Architecture
Engineer Degree education engineer Post-Graduate Studies in Architecturesakal
Summary

वास्तुकलेचा विद्यार्थी पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणातून विशेष प्रावीण्य स्वतःच्या आवडीनुसार विशिष्ट अशा शाखेमध्ये मिळवू शकतो.

- ऋषिकेश हुली

वास्तुकलेतील महत्त्वाच्या शाखा-उपशाखांबद्दल, कामाच्या स्वरूपाबद्दल व पदव्युत्तर शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुकलेचा आवाका हा फक्त एखादी नवीन इमारत डिझाईन करण्यापुरता मर्यादित नाही. वास्तुकलेचा विद्यार्थी पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणातून विशेष प्रावीण्य स्वतःच्या आवडीनुसार विशिष्ट अशा शाखेमध्ये मिळवू शकतो.

अर्बन डिझाइन

अर्बन डिझायनर्स विविध प्रकारची गुंतागुंत समजून, गरज असल्यास जागेचा इतिहास अभ्यासून, आजच्या आणि भविष्यातील शहरी आणि नागरी गरजा आणि प्रश्नांचा विचार करून डिझाईन करण्यास सक्षम असतात.‌ अर्बन डिझायनरच्या कामातूनच जगभरातल्या अनेक शहरांना त्यांची अशी विशिष्ट ओळख प्राप्त झाली‌.

लँडस्केप आर्किटेक्चर

लँडस्केप आर्किटेक्ट्सचं काम प्रामुख्याने इमारतींच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या जागा गरज, कार्य समजून पर्यावरणीय दृष्टिकोनातून डिझाईन करणे आहे. याच बरोबर लँडस्केप आर्किटेक्ट्स सार्वजनिक बागा, मोकळ्या जागा, रस्त्यालगतच्या मोकळ्या जागा, पाण्याचे स्रोत व त्याच्या आसपासचा परिसर इत्यादींचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून डिझाईन करून शहर आणि गावांच्या विकासात पर्यावरणीय समतोल राखला जाईल या प्रकारच्या कामांसाठी सल्लागार म्हणून काम करतात.‌

कंजर्व्हेशन आर्किटेक्चर

कंजर्व्हेशन आर्किटेक्ट्स ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा इमारती (वाडे, हवेल्या, किल्ले, सार्वजनिक इमारती, लेण्या आदी), पायाभूत सोयी सुविधा (पूल, स्नानगृहे, नदी/तलावावरील घाट, धार्मिक स्थळे, इ.) यांचा सखोल अभ्यास करत असताना त्याचे मूळ बांधकाम तंत्रज्ञान, साहित्य, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, इत्यादी समजून त्याचे वारसा म्हणून संवर्धन व दस्तऐवजीकरण यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या संवर्धन कामात अनेकदा वास्तूविशारदांना इतिहास अभ्यासकांची आणि पुरातत्त्वशास्त्राची मदत घ्यावी लागते.

टाऊन प्लॅनिंग

पूर्णतः नवीन शहर, गावांचे नियोजन, विद्यमान शहराचा, गावाचा नवा परिसर, विद्यमान शहरातील जुन्या भागांचे बदलत्या गरजेप्रमाणे नियोजनाच्या विकास आराखड्यांच्या कामाची जबाबदारी टाऊन प्लॅनर्स (नगर रचनाकार)कडे असते. टाऊन प्लॅनिंग, अर्बन प्लॅनिंग, कंट्री अँड रिजनल प्लॅनिंग, हाउसिंग प्लॅनिंग,

ट्रान्स्पोर्ट प्लॅनिंग, इ. सारख्या उपशाखा आहेत. भारतातील काही मोजक्या संस्थांमध्ये यांसारख्या उपशाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. प्लॅनिंगच्या काही ठराविक कोर्सेससाठी वास्तुविशारदांच्या बरोबरीने सिव्हिल इंजिनिअर, भूगोल अभ्यासक, इत्यादींचे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात.

कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट

कन्स्ट्रक्शन मॅनेजरचे (बांधकाम व्यवस्थापक) काम‌ संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे व्यवस्थापन आहे. यामध्ये वास्तु विशारदाने केलेल्या डिझाईन-ड्रॉइंग्स, प्रमाण आणि बांधकाम तपशील, कामगारांची संख्या, प्रकल्पाचे बजेट आणि टाइम लाईन, इत्यादींसारख्या अनेक गोष्टी बारकाईने अभ्यासून प्रकल्प अंमलबजावणी डिझाईन-ड्रॉइंग प्रमाणे, वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी असते.

एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर/प्लॅनिंग

बांधकाम क्षेत्राचा जगभरातल्या एकूण कार्बन उत्सर्जनामध्ये खूप मोठा सहभाग आहे. एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले वास्तुविशारद हे एखाद्या प्रकल्पाची कार्बन फुटप्रिंट त्याच्या डिझाईन आणि बांधकाम साहित्याच्या योग्य वापरातून कशा पद्धतीने कमीत कमी ठेवता येऊ शकते आणि त्यातून निसर्गाची हानी टाळण्यासाठी त्या प्रकल्पाच्या मुख्य वास्तुविशारदाला मार्गदर्शन करतात.

वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणाबद्दल निर्णय घेताना, शाखा-उपशाखा निवडताना स्वतःची आवड-निवड, कुवत, शिक्षणाचा खर्च यांसारख्या गोष्टींचा सर्वांगीण विचार करावा आणि शक्यतो आपल्या आवडणाऱ्या शाखेमध्ये काही वर्ष नोकरीचा, कामाचा अनुभव घेऊन मगच पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com