Engineering Courses : अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळताना...!

अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशात तसेच जागतिक स्तरावर आगामी काळात या संधी वाढतच जाणार आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी शाखा किंवा महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थी व पालकांची खऱ्या अर्थाने कसोटी लागते.
Engineering Courses
Engineering Coursessakal

अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशात तसेच जागतिक स्तरावर आगामी काळात या संधी वाढतच जाणार आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी शाखा किंवा महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थी व पालकांची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. सद्यःपरिस्थितीत महाराष्ट्रामध्ये ११०० हून अधिक तर पुण्यामध्ये १५०हून अधिक अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्या अंतर्गत सुमारे १०० हून अधिक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यात कोअर ब्रॅंचेस, सॉफ्ट ब्रॅंचेस आणि स्पेशलाइज्ड ब्रॅंचेस असे त्यांचे तीन गट पडतात. या तिन्ही गटांतील अभ्यासक्रमांना देश तसेच जागतिक पातळीवर कायमच विविध संधी उपलब्ध असतात.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९९९ मध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. अभियांत्रिकीच्या बहुतेक शाखा महाविद्यालयात आहेत. संगणक शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डेटा सायन्स या क्षेत्रात काळानुरूप सातत्याने घडत असणारे बदल, त्यातील उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी आणि त्यासाठी गरजेचा प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता, या सर्व बाबी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘एआयसीटीई’कडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून तीन नवीन अभ्यासक्रम म्हणजेच शाखा, सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यात ‘ए आय-मशिन लर्निंग’, ‘ए आय-डेटा सायन्स’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स-कॉम्प्युटर इंजिनीअरिंग’चा समावेश आहे. आज आपल्या महाविद्यालयांत हे तीनही कोर्सेस सुरु आहेत आणि प्रत्येक कोर्ससाठी ६० एवढी विद्यार्थी क्षमता आहे. त्यामुळे याबद्दल थोडे जाणून घेऊया.

जग पाचव्या औद्योगिक क्रांतीतून (इंडस्ट्री ५.०) जात असताना, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा शब्द आज सर्वसामान्य माणूस अगदी सहजपणे वापरताना दिसतो. याच पद्धतीने विचार केला आणि आजूबाजूची परिस्थिती न्याहाळली, तर लक्षात येते की, २०२० च्या कठीण काळात सुद्धा आपलं जगणं सुसह्य करण्यात सॉफ्टवेअर, डेटा सायन्स आणि इलेट्रॉनिक्स यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी घरी राहून त्यांची सर्व कामे सुरळीतपणे पार पाडली. आमच्या व इतर सर्व महाविद्यालयांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ ही प्रणाली स्वीकारली आणि यशस्वीपणे अंगीकारली. या संक्रमणकाळात असलेल्या वर्तमानाचे भविष्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) व डेटा सायन्स आहे, असे आज आपण खात्रीने सांगू शकतो.

मनुष्याने बुद्धीचा वापर करून यंत्रे बनवली. हळूहळू ती यंत्रे विचार करू लागली आणि आता त्या यंत्रांना स्वत:चा मेंदू देखील असू शकतो, ज्याने ते स्वतः निर्णय देखील घेऊ शकतात, यालाच मशिन लर्निंग म्हटले जाऊ लागले. दररोज इंटरनेट नावाच्या महाजाळात तयार होणाऱ्या डेटाचा उपयोग ‘एआय’साठी फायद्याचा ठरतो आहे. आपण स्वत:चेच आत्मनिरीक्षण केल्यास समजते की, सोशल मीडिया हा आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण नियमितपणे या माध्यमांद्वारे काही ना काही बघतो, वाचतो, शेअर करतो, प्रत्येक सेकंदाला जगभरात असंख्य ई-मेल्सची देवाणघेवाण होते. हा संपूर्ण ‘डेटा’ तयार होतो व साठवला जातो. अभ्यासातून हे निदर्शनास आले आहे की, तयार होणारा हा डेटा दर १.२ वर्षांनी दुपटीने वाढत जातो.

डेटा सायन्स या शाखेमध्ये त्या डेटाचा विविध पद्धतींनी कसा अभ्यास करावा, हे शिकवले जाते. त्याच्या निष्कर्षांवरून भविष्यात काय होऊ शकते?, याचे अनुमान प्रेडिक्शन प्लॅनिंगसाठी काढले जाऊ शकतात. वर नमूद केलेल्या शाखांमध्ये विद्यार्थी विविध क्षेत्रांत एआय, मशिन लर्निंग, डेटा सायन्सचा अभ्यास करतीलच याव्यतिरिक्त आरोग्य, वित्त, कृषी, शिक्षण, उद्योग निर्माण अशा अनेकविध क्षेत्रांत स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. इलेट्रॉनिक्स ॲंड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही एक संयुक्तिक शाखा असून, यात इलेट्रॉनिक्स व कॉम्प्युटर या शाखांचे महत्त्वाचे विषय समाविष्ट केले आहेत. संगणकाची उत्तरे शोधण्याची ताकत, आवाज ओळखण्याची कला, माणूस ओळखण्याची क्षमता इ. काही महत्त्वाची उदाहरणे सांगता येतील. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कोअर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले असेल, त्यांनादेखील या संलग्न विद्याशाखांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चालणारी एखादी कार बाजारात आणायची असेल तरी ती डिझाईन करताना तिची मूलभूत रचना फारशी बदलत नाही.

त्यामुळे मॅकेनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग व तत्सम इतर विद्याशाखांमधील ज्ञानाचा सुयोग्य वापर करावाच लागतो. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मॅकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग या देखील महत्त्वाच्या शाखा आहेत.

- प्रा. डॉ. कल्याणी जोशी

प्राचार्या, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com