एकदा तरी डोकवा मुलांच्या मनात

byju
byju sakal

‘जैसी विद्या तैसी हाव’, असे संत रामदासांनी म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे, की जशी विद्या असते, तशी इच्छा होते. मुलांना कोणतीही विद्या देताना किती गांभीर्याने विचार करायला पाहिजे, हे नेमकेपणाने सांगणारे हे वचन आहे. चहूबाजूंनी माहितीचा भडिमार होत असताना मुलांना त्यातील कोणत्या गोष्टीत रस आहे, हे जाणून घेणे आणि त्याला योग्य वळण देणे, हे आजच्या काळातील पालकांसमोर असणारे सर्वात मोठे आव्हान आहे.

पाठ्यपुस्तकी अभ्यास, शालेय शिक्षणात होणारा प्रत्यक्ष संवाद आणि बौद्धिक, मानसिक व भावनिक विकासाच्या शक्यतांवर गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे आघात झाले. मुलांच्या शिक्षणासंदर्भात अनेक प्रश्नही तयार झाले आणि म्हणूनच पाठ्यपुस्तकी शिक्षण, समवयस्कांबरोबरचे शिक्षण, त्या निमित्ताने होणारा आकलन विकास या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

मुलांना पाठ्यपुस्तकी शिक्षणाचा कंटाळा येणार नाही आणि ते जे काही शिकत आहेत, त्याच्यात त्यांचा रस टिकून राहील अशा रीतीने शिकविणे, ही यापुढील काळाची गरज आहे. कारण आताच्या मुलांना इंटरनेटच्या निमित्ताने अनेक स्तरांवरील आकर्षणे आहेत.

कोरोना काळात या मुलांच्या एकाग्रतेवर, तसेच एका जागी बसून अभ्यास करण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला असल्याचे नोंदविले जात आहे. अशा वेळी शिक्षणातील रस संपत जाणे किंवा तो कमी कमी होत जाणे, हे धोकादायक असू शकते.

पालक जेव्हा मुलांशी संवाद साधतात, तेव्हाच हळूहळू पालकांच्या हे लक्षात यायला लागते, की मुलांचा कल नक्की कशाकडे आहे. कोणाला गणितात रस असतो, कोणाला विज्ञानात, दिवाळीच्या सुट्टीत केलेल्या एखाद्या विज्ञान शिबिराने एखाद्या मुलाच्या मनातील अंतराळाविषयीची उत्सुकता चाळवते, तर कोणाला झाड कसे वाढते, यात रस निर्माण होतो. मुलांचा कल अचूक ओळखण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे कधीही श्रेयस्करच आहे.

शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या सहज-सोप्या चाचण्यांमधून मुलांचा कल नेमका कशाकडे आहे, हे लक्षात आल्यावर तो कल जोपासला गेला पाहिजे. त्यासाठी मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयाची जास्तीत जास्त माहिती कोठून मिळेल, हे बघितले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यासाठी निरनिराळ्या परीक्षा, तज्ज्ञांच्या भेटीगाठी, इंटरनेटवरच्या उत्तम साईट्स, चॅनल्स यांची माहिती दिली पाहिजे. आवडीच्या विषयाशी संबंधित वेगवगेळ्या परीक्षा आणि अभ्यास गटांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. शैक्षणिक यश आणि शैक्षणिक कल या दोन्ही गोष्टी मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असतात. शैक्षणिक कल जोपासला गेला, तर मुलांचा शिक्षणात रस टिकून राहतो आणि शैक्षणिक यशामुळे आपण काहीतरी कमावले आहे, मिळविले आहे, कष्टाने मिळविले आहे, ही भावना मुलांमध्ये निर्माण होते. त्यातून मुलांचा आत्मविश्वास वाढतो. शैक्षणिक कल जोपासला गेला, की मुलांना आपोआपच वेळेचे नियोजन, कामांचे नियोजन, कामांचे अग्रक्रम अशा अनेक गोष्टी शिकायलाही मदत मिळते.

सर्व प्रकारचे शिक्षण आपल्या मुलांना जीवनकौशल्ये म्हणजेच सॉफ्ट स्किल्सही शिकण्यास मदत करते. शिक्षण ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. शैक्षणिक कल जोपासला गेला, की मुलांमध्ये सतत काही ना काही नवीन शिकण्याची आस निर्माण होते. आपल्याला जे येत नाही ते शिकण्याचा मोकळेपणा त्यांच्यात विकसित होतो. याचा फायदा मुलांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.

शैक्षणिक कल जोपासण्यासाठी नेमके कोणते मार्ग वापरले पाहिजेत?

१) सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अभ्यास ही सवय असते. त्यामुळे लहानपणापासून पालकांनी मुलांना नियमित अभ्यासाची सवय लावणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रोज अन्न लागते, त्याप्रमाणे आपल्या मनाला, मेंदूला नियमित अभ्यास हवाच.

२) अभ्यास आनंदाने झाला, तर त्यातील रस टिकून राहतो.

३) मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त केले पाहिजे. जितके जास्त प्रश्न मुले विचारतील, तितकी त्यांची उत्सुकता वाढेल आणि शिक्षणातील त्यांचा रस टिकून राहील.

४) काही वेळा त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल त्यांना बक्षीस द्यायलाही हरकत नसते. आपल्या सगळ्यांनाच शाबासकी आवडते. मुलांना चांगला अभ्यास केल्यावर शाबासकी द्यावी. म्हणजे त्यांनी अजून अभ्यास करण्याची त्यांची इच्छा शाबूत राहते.

५) अभ्यास का करायचा, कसा करायचा आणि शिक्षण का महत्त्वाचे आहे, या विषयीही त्यांच्याशी बोलत राहिले पाहिजे. त्याचा सकारात्मक परिमाण मुलांवर नक्कीच होतो.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद आवश्यक

एखाद्या विषयासंदर्भात असलेले कुतूहल मुले प्रश्न विचारून व्यक्त करतात. असे प्रश्न त्यांना विचारू द्या. त्यांचा शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद वाढू द्या. प्रश्न विचारणे आणि उत्तरांमधील तार्किक विसंगतींवर बोट ठेवणे, ही महान ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याने सांगितलेली एक शिक्षण पद्धतीच होती. ही पद्धती आजही आदर्श शिक्षण पद्धती मानली जाते.

शिक्षण हे जगातील सर्वात ताकदवान शस्त्र आहे. जग बदलण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. - नेल्सन मंडेला

आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे, यासाठी पालक हल्ली मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक करतात. सध्याच्या काळात विविध क्षेत्रांत प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. पण आपल्या पाल्याचा कल नेमका कशाकडे आहे, त्याच्या क्षमता काय आहेत, हे जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याआधारे मुलांच्या भवितव्याचा विचार नेमकेपणाने करता येऊ शकतो.

- आशिष शर्मा, हेड-अॅकॅडमिक्स, बायजूज ट्युशन सेंटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com