
तरुणांना जॉबची सुवर्णसंधी! फेअरपोर्टलचे कार्यालय आता पुण्यात
नाशिक : कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांत प्रवासावर निर्बंध होते, परंतु, आता प्रवासावरील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील (North America) अग्रगण्य अशा फेअरपोर्टलने भारतात विस्तारासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुडगावनंतर फेअरपोर्टलचे देशातील दुसरे कार्यालय पुण्यात सुरू झाल्याची माहिती फेअरपोर्टल इंडियाचे (Fareportal India) उपाध्यक्ष (People and Culture) रजत भाटिया यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.
शंभरहून अधिक तरुणांना नोकरीची संधी
रजत भाटिया म्हणाले, की पुण्यात तंत्रज्ञान क्षेत्र मोठे आहे, ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या तरुणांची प्रतिभा देखील चांगली असल्याने मुंबईऐवजी पुण्यात कार्यालय स्थापन केले. कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना शहरी, ग्रामीण भागातील तरुणांसाठी सोपी ठरत आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्ये असलेली जागतिक स्पर्धा सध्या मोठी होत आहे.
हेही वाचा: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज
जगभरातील प्रवासी निर्बंध कमी केल्यामुळे ट्रॅव्हल्स इंड्रस्ट्रीत बूम येणार आहे. त्यामुळे फेअरपोर्टल पुढील काळासाठी नियोजन करत आहे. जगभरातील अग्रगण्य एअरलाइन्स, हॉटेल्स आदी कंपन्यांची फेअरपोर्टलसोबत भागीदारी आहे. फेअरपोर्टलच्या माध्यमातून पर्यटकांच्या गरजा पूर्ण होतील, अशी आशा आहे. शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर करून गुडगाव आणि पुण्यातील कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात फेअरपोर्टलचे नेटवर्क कार्यान्वित असणार आहे.
फेअरपोर्टलसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून, कंपनीने दोन महिन्यात शंभरहून अधिक तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’चा (Omicron) होणारा परिणाम पूर्वीच्या व्हेरियंटइतका गंभीर नसल्याने ट्रॅव्हल इंडस्ट्रीला पहिल्या दोन लाटांइतके नुकसान होणार नाही. त्यामुळे पुढील योजना राबविण्यासाठी आत्मविश्वास मिळाला असल्याचे श्री. भाटिया यांनी नमूद केले.
हेही वाचा: संधी करिअरच्या... : सामाजिक क्षेत्रात जायचंय?
केंद्रस्थानी भारत
फेअरपोर्टल जागतिक प्रवास तंत्रज्ञान लीडर आणि उत्तर अमेरिकेतील फ्लाइट्स ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTA) भारतातील नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडानंतर फेअरपोर्टलच्या केंद्रस्थानी भारत असून, नागरिकांना २४ तास सेवेसाठी उपलब्ध असणे, ही आमची सर्वाधिक जमेची बाजू असल्याचे श्री. भाटिया यांनी नमूद केले.
Web Title: Fareportals Office Is Now In Pune Job Opportunities For Youth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..