शाळेत अभ्यासासोबत भाकरीही करायला शिकतायत मुलं; समानतेचा अनोखा उपक्रम

कुलाळवाडी जि. प. शाळेत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘माझी भाकरी’ उपक्रम
food making skills along with education Mazhi Bhakari initiative sangli
food making skills along with education Mazhi Bhakari initiative sanglisakal

जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशीच आहे. शिवाय, ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणूनही सांगितले जाते. या तालुक्यातील स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. त्यांच्यासाठी हंगामी शाळा उभारण्यात आल्या. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र, या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना ‘माझी भाकरी’ या उपक्रमाद्वारे स्वावलंबी बनविण्याचे काम येथील कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून होत आहे.

शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून १६ वर्षांपासून मुला-मुलींसाठी भाकरी बनविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. यात ५० गुणांसह आकर्षक बक्षीस दिले जाते. यात भाकरीचा आकार, चव याची गुणवत्ता तपासली जाते. यंदा पाचवीत शिक्षण घेणाऱ्या बिरूदेव तांबे या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला. जत तालुक्याचा पूर्व भाग पाण्यापासून वंचित आहेच. पिण्याच्या पाण्याबरोबर स्थानिक पातळीवर रोजगार मिळण्याची शाश्वतीही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील ५०० ते ६०० कुटुंबे उदरनिर्वाह करण्यासाठी सहा महिने ऊसतोडीसाठी गाव सोडतात. त्यात मुलांच्या शिक्षणाचा विचार मागे पडतो.

त्यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागातर्फे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी हंगामी शाळा उभारली जाते. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनेक गावांत मुलांना आई-वडिलांबरोबर मजुरीसाठी घर सोडावे लागते. मात्र, या मुलांना शिक्षण मिळावे, त्यांनीही धडे गिरवावेत, असे कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेने ठरविले आणि हाती घेतला ‘माझी भाकरी’ हा उपक्रम. या उपक्रमामुळे शिक्षण अर्धवट सोडून स्थलांतरित होणाऱ्या मुलांची संख्या घटते. आई-वडील नसताना स्वतः स्वयंपाक करून शिक्षण घेण्यासाठी मुलांमध्ये उत्साह वाढत आहे. शिवाय, आपली भाकरी शिक्षक पाहतात, अधिकारी व गावकरीही पाहायला येतात. त्यामुळे मुला-मुलींमध्ये समानतेची ऊर्जा निर्माण होत आहे.

आई-वडिलांच्या स्थलांतरानंतर स्वतः भाकरी करून ऊसतोड मजुरांची मुले आत्मविश्वासाने गावीच राहून शिक्षण पूर्ण करीत आहेत. ‘माझी भाकरी’ या उपक्रमाचे प्रोत्साहन मुलांना मिळत असून, मुला-मुलींमध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो आहे.

- भक्तराज गर्जे, शिक्षक, जि. प. शाळा, कुलाळवाडी (ता. जत)

गेल्या १६ वर्षांपासून मुलांची सायकल व भाकरी बनविण्याची स्पर्धा घेत आहे. सात ते आठ वर्षांपासून मुलांना भाकरी बनविता येते. यातून आई व बहिणीसारखी भाकरी करता येते, याचा आनंद वेगळाच आहे. शिवाय, कठीण परिस्थितीत मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासही बळ मिळत आहे.

- अशोक घोदे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कुलाळवाडी

उपक्रमाने पटसंख्येत वाढ

जत पूर्व भागातील बरेच शेतकरी ऊसतोडीसाठी स्थलांतरित व्हायची. त्यामुळे मुलांचा शिक्षणाकडे ओढा कमीच असायचा. सन २०१० मध्ये कुलाळवाडी शाळा दोनमध्ये पटसंख्या ८० होती व प्रत्यक्ष ४० मुलेच शाळेत उपस्थित राहत. २०१६ पासून मुलांसाठी माझी भाकरी व मुलींसाठी सायकल स्पर्धा आयोजित केली. आजअखेर उपक्रम सुरू आहे. आता आठवीपर्यंत वर्गवाढ झाली आहे. नऊपैकी आठ शिक्षक कार्यरत असून, २४० पैकी २२० विद्यार्थी नियमित उपस्थित राहतात. दरवर्षी पटसंख्या वाढतच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com