esakal | अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीस होणार सुरूवात; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीस होणार सुरूवात; वाचा सविस्तर

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता अकरावीच्या (FYJC) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १ ऑगस्टपासून संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येईल. तर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. (FYJC Admission Online registration will begin)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर होणार आहेत. हे प्रवेश सीईटी परीक्षेची कार्यवाही झाल्यानंतरच होतील. दरम्यान उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्टपासून करता येणार आहे.

तर महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून ऑनलाइनद्वारे भरलेली माहिती प्रमाणित करण्याची प्रक्रिया २ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे, लॉगिन आयडी मिळविणे, पासवर्ड तयार करणे, अर्ज भाग एक भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे, अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी केंद्र निवडणे आणि अर्ज प्रमाणित करण्याची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत संकेतस्थळावर देण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

loading image
go to top