
गडचिरोली पोलिस दल, भरतीसाठी इच्छुक तरुण-तरुणींसाठी दिलासादायक बातमी
पोलिस भरतीसंदर्भात मोठी बातमी; गडचीरोलीत 416 पदं भरणार
मुंबई - पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण, तरुणींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील 416 रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. गृहखात्याकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. गडचिरोली पोलिस अधीक्षकांना थेट पोलिस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. यदरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांना पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांची बाब लक्षात आणून दिली होती. त्यांनी हा मुद्दा तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास दिला, आणि लवकर यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ही भरती होणार आहे.
हेही वाचा: महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एक निलंबित
या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली असून शासन आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 150 पोलिस शिपाई, 161 पोलिस शिपाई चालक आणि 105 सशस्त्र पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलिस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त 311 पदे म्हणजे (150 पोलिस शिपाई आणि 161 पोलिस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 13, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली 105 अशी 416 पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक 3 यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलिस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा मोठा फायदा स्थानिक आदीवासी तरुण तरुणींना होणार आहे.
हेही वाचा: पुणे हादरलं! नामांकीत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
Web Title: Gadchiroli District 416 Seat Police Recruitment From Home Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..