ग्यानबाची ओवीबद्ध राज्यघटना

मित्र-मैत्रिणींनो, आज आपण एका अद्भुत पुस्तकाची माहिती घेणार आहोत. या अद्भुत पुस्तकाचे नाव आहे ‘ग्यानबाची राज्यघटना’.
gyanbachi rajyaghatana book
gyanbachi rajyaghatana booksakal

मित्र-मैत्रिणींनो, आज आपण एका अद्भुत पुस्तकाची माहिती घेणार आहोत. या अद्भुत पुस्तकाचे नाव आहे ‘ग्यानबाची राज्यघटना’. पेशाने वकील असणाऱ्या सौरभ देशपांडे यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. भारताची राज्यघटना हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. या राज्यघटनेमुळेच आपण सर्व जण विविधतेने नटलेल्या या देशात गुण्यागोविंदाने आणि निर्भयपणे राहत आहोत.

त्यामुळे आपल्या सर्वांच्याच मनात राज्यघटनेबद्दल कमालीचा आदर आहे; परंतु, आपल्यापैकी फार थोड्या जणांनी संपूर्ण राज्यघटना वाचली असेल. या राज्यघटनेचे चक्क ओवीबद्ध रूपांतर म्हणजे हे पुस्तक आहे. देशाची राज्यघटना ही अगदी सर्वसामान्य माणसालादेखील सुलभपणे समजायला हवी अशी इच्छा बॅरिस्टर नाथ पै यांनी व्यक्त केली होती.

ती इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प करत लेखकाने ही ओवीबद्ध राज्यघटना लिहायला घेतली. सुमारे दोन हजार ८४२ ओव्यांच्या माध्यमातून राज्यघटनेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा मराठी भाषेमधील बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा.

या पुस्तकामध्ये घटनेच्या प्रस्तावनेपासून परिशिष्टापर्यंत सर्व भाग लेखकाने मराठी भाषेत ओवीबद्ध केला आहे. विशेष म्हणजे, ओवी हा काव्यप्रकार जुना असला तरीदेखील, लेखकाने पुस्तकाची भाषा क्लिष्ट होऊ दिलेली नाही. याउलट अगदी आजच्या पिढीला समजेल अशा शब्दांची योजना करण्यात आल्यामुळे, पुस्तक ओवीबद्ध असले तरी ते सामान्य माणसालाही सहज समजू शकणारे आहे.

उलट कायदेशीर भाषेत असणाऱ्या अनेक अवघड संकल्पना ओवीच्या स्वरूपात सोप्या करून सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अजिबात कंटाळवाणे होत नाही. राज्यघटना सोप्या भाषेत समजून घेण्यास हे पुस्तक आपल्याला वाटाड्याप्रमाणे मदत करते.

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनादेखील या पुस्तकात ओवीच्या स्वरूपात आदरांजली वाहिलेली आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या काही प्रकरणांमध्ये वेळोवेळी झालेल्या घटनादुरुस्तीबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे घटनेतील अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर परिशिष्टदेखील देण्यात आले आहे. लेखकाने राज्यघटनेच्या प्रास्ताविकाचे केलेले ओवीरूपांतर सर्वांनी पाठ करण्यासारखे आहे.

लोकशाहीचे राज्य आपले | आपल्याच इच्छेने पाहिजे चालले |

त्यासाठी जाणून घ्या आपले | संविधान प्रथम ||

असा आग्रह लेखकाने भारतीयांना केलेला आहे. या पुस्तकाचा आणखीन एक लाभ म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना राज्यघटनेतील अनेक कलमे लक्षात ठेवावी लागतात. कोणतीही गोष्ट काव्य स्वरूपात असेल तर ती लक्षात ठेवण्यास अत्यंत सोयीची होते. त्यामुळेच राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ओवीबद्ध राज्यघटनेचा विशेष लाभ होणार आहे.

(संकलन - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com