All The Best! आजपासून बारावीच्या परीक्षा; कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC-Exam

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून (ता.४) सुरू होत आहे..

All The Best! आजपासून बारावीच्या परीक्षा; कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा (HSC Written Exam) आज शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार २७८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून तब्बल १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्रावर (Examination Center) विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजले (थर्मल स्कॅनिंग) (Thermal Scanning) जाणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपरच्या नियोजित वेळेपूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर हजर राहावे लागणार आहे.

राज्यात बारावीची परीक्षा दोन हजार ९९६ मुख्य केंद्र, तर सहा हजार ६३९ उपकेंद्र मिळून नऊ हजार ६३५ ठिकाणी होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजले (थर्मल स्कॅनिंग) जाईल. त्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षागृहात प्रवेश मिळेल. तर परीक्षेच्या १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येतील, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता ३ मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह स्वीकारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवला आहे.

हेही वाचा: परीक्षेला जातायं... असा घ्या आहार!

प्रचलित पद्धतीप्रमाणे ‘माहिती तंत्रज्ञान’ आणि ‘सामान्य ज्ञान’ विषयाची परीक्षा ऑनलाइन होईल. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेसाठी एक लाख ४७ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी, तर सामान्यज्ञान विषयाच्या परीक्षेसाठी एक हजार ९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा साधारणपणे जुलै-ऑगस्टमध्ये होणार असल्याचेही राज्य मंडळाने सांगितले.

शाखानिहाय बारावीचे विद्यार्थी -

शाखा : नोंदणी झालेले विद्यार्थी

विज्ञान : ६,३२,९९४

कला : ४,३७,३३६

वाणिज्य : ३,६४,३६२

व्यावसायिक अभ्यासक्रम : ५०,२०२

टेक्निकल सायन्स (आयटीआय) : ९३२

एकूण विद्यार्थी : १४,८५,८२६

परीक्षेसाठी केलेल्या उपाययोजना :

- ७५ टक्के अभ्यासक्रमावर होणार लेखी परीक्षा

- लेखी परीक्षेसाठी ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनीटे जादा वेळ

- तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ

- एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट असेल

- प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिट पर्यवेक्षक दोन परीक्षार्थींची स्वाक्षरी घेऊन उघडणार

- उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची छपाई असेल

हेही वाचा: १० वी पास आहात? परीक्षेशिवाय India Post मध्ये मिळवा नोकरी, लवकर करा अर्ज

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर होणार परीक्षा

नियोजित कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प अशा परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची संबंधित परीक्षा लेखी परीक्षेनंतर ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होईल.

गैरप्रकार टाळण्यासाठी ‘भरारी पथके’

संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या असतील. विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याची विनंती मंडळाने केली आहे. मंडळ सदस्य व शासकीय अधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देतील. परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक हे परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्र व उपकेंद्रावर कार्यरत असेल.

राज्यमंडळ स्तरावरील हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक - ०२०-२५७०५२७१, ०२०-२५७०५२७२

Web Title: Hsc Exam Students Examination Center Reach Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..