बहुआयामी, बहुश्रुत व्हा!

अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना हळूहळू मी स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होतो. आपण कलेक्टर व्हायचं असं विशेषत्वाने ठरवलं नसलं, तरी त्या पदाविषयी, प्रशासकीय कामाविषयी खूप कुतूहल, आदर, कौतुक होतं.
Manoj Mahajan
Manoj Mahajansakal

- मनोज महाजन, आयएएस, जिल्हाधिकारी-रायगड (ओडिशा)

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका छोट्या गावात माझा जन्म झाला. वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. दहावीपर्यंतचं शिक्षण पाचोऱ्याला झाल्यावर मी जळगावला मूळजी जेठा महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालो. बारावीला जिल्ह्यात तिसरा आलो. चांगले गुण असल्याने पुण्याच्या ‘सीओईपी’ महाविद्यालयात अभियांत्रिकीला प्रवेश घेतला.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना हळूहळू मी स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होतो. आपण कलेक्टर व्हायचं असं विशेषत्वाने ठरवलं नसलं, तरी त्या पदाविषयी, प्रशासकीय कामाविषयी खूप कुतूहल, आदर, कौतुक होतं.

लहानपणी गावाहून जळगावला येताना बसमधून कलेक्टरचा बंगला (निवासस्थान) लागायचं. त्या वेळी तो विस्तीर्ण परिसर, प्रशस्त इमारत, इमारतीवर फडकणारा आपला तिरंगा, पोलिस बंदोबस्त हे सगळं पाहताना खूप छान वाटायचं. एक-दोनदा मला वडील म्हणालेसुद्धा की, तुला आयुष्यात काही व्हायचं असेल, तर कलेक्टर हो. अशा काही आठवणी मनात होत्या. त्यांचं रूपांतर मग निश्‍चयात झालं आणि मी तयारी सुरू केली.

इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना मी जमेल तसं अवांतर वाचन, मित्रांशी चर्चा करणं सुरू केलं. स्वतःचं वाचन वाढवलं. बहुश्रुत होण्याचा प्रयत्न करू लागलो. ‘सीओईपी’तील अनेक विद्यार्थी प्रशासनात जातात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे आमचा समविचारी मित्रांचा ग्रूप तयार झाला आणि आम्ही ‘ग्रूप स्टडी’ करू लागलो.

अभियांत्रिकीची पदवी मिळाल्याबरोबर लगेच त्याच वर्षी म्हणजे २०१५ ला मी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात अपयश आलं. त्यानंतर २०१६ ला ९०३ रँक आला आणि ‘आरपीएफ’मध्ये सहाय्यक आयुक्त या पदासाठी माझी निवड झाली. त्यानंतर मी पुन्हा जोमाने तयारी केली, तरीही यश आलं नाही अवघे १६ गुण कमी पडले. मग जरा वेळ घेऊन पूर्ण तयारीनिशी २०१८ ला पुन्हा परीक्षा दिली आणि माझी निवड आयएएस म्हणून झाली. मी जिल्हाधिकारी झालो.

या संपूर्ण प्रवासात मला जाणवलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे - तुम्ही स्वतःला सतत अपडेट ठेवणं, बहुश्रुत राहणं आणि बहुआयामी होणं आवश्‍यक आहे. त्याच प्रमाणे काय वाचायचं? हे जसं कळणं महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे काय वाचायचं नाही? हे कळणं त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. प्राथमिक म्हणजेच प्रीलिम परीक्षेत तुम्हाला किती अचूकपणे उत्तरे माहीत आहेत, हे बहुपर्यायी प्रश्‍नांद्वारे तपासलं जातं.

त्यानंतर मुख्य परीक्षेत तुम्ही किती सविस्तर, पण अचूक लिहू शकता, हे पाहिलं जातं. त्यानंतर मुलाखतीच्या वेळी तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमचं ज्ञान, प्रामाणिकपणा पाहिला जातो. एखाद्या प्रश्‍नाचं उत्तर माहीत नसेल, तर ‘मला माहीत नाही, मी अभ्यास करतो याबद्दल’ असं स्पष्टपणे सांगण्याचं धैर्य, प्रामाणिकपणा तुमच्यात आहे का? हेही तपासलं जातं.

या सर्व गोष्टी केवळ पुस्तकी अभ्यासातून कळत नाहीत, यासाठी अवांतर वाचन, चिंतन, संवाद, समविचारी गटांशी चर्चा आणि सराव अशा अनेक गोष्टी आवश्‍यक असतात. मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास केल्याने आपल्याला आयोगाची प्रश्‍न विचारण्याची पद्धत समजते. त्यामुळे त्या प्रश्‍नपत्रिका आवर्जून सोडवा. स्वतःशी प्रामाणिक राहून रोजचा अभ्यास रोज करा. त्यात अजिबात सवलत घेऊ नका. प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com