महाविद्यालयात शिकवायचंय?

मागच्या वेळी आपण माध्यमिक शिक्षक व्हायचे असेल तर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुण लागतील व कोणते शिक्षण घ्यावे लागेल, याबद्दल पाहिले.
महाविद्यालयात शिकवायचंय?
महाविद्यालयात शिकवायचंय?sakal
Updated on

मागच्या वेळी आपण माध्यमिक शिक्षक व्हायचे असेल तर आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचे गुण लागतील व कोणते शिक्षण घ्यावे लागेल, याबद्दल पाहिले. आज आपण महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक बनायचे असेल तर आपल्यामध्ये कोणते गुण लागतील व कोणते शिक्षण घ्यावे लागेल, याबद्दल पाहूया.

सेट-नेट आवश्‍यक

बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पतीपर्यंतच्या शिक्षणाला महाविद्यालयीन अथवा उच्च शिक्षण मानले जाते. यातील काही भाग महाविद्यालयात तर काही भाग विद्यापीठात करता येतो. सर्वसाधारणपणे पदवीपर्यंत शिक्षण महाविद्यालयात तर त्यानंतरचे पदव्युत्तर शिक्षण अथवा विद्यावाचस्पती पदवीचे शिक्षण हे विद्यापीठात उपलब्ध असते. अलीकडच्या काळात काही महाविद्यालयांतदेखील याची सोय उपलब्ध आहे. या स्तरावर शिकवायचे असल्यास पदव्युत्तर पदवी व सेट-नेट या परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असते. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात शिकवता येते, तर नेट परीक्षा उत्तीर्ण असल्यास देशभरातील कोणत्याही महाविद्यालयात शिकवता येते.

मूलभूत संकल्पना

प्राध्यापकाला चांगले अध्यापन करावयाचे असल्यास त्या-त्या विषयातील मूलभूत संकल्पना अतिशय व्यवस्थित समजलेल्या असाव्या लागतात, अन्यथा शिकवणे अवघड जाते. हा वयोगट अतिशय प्रौढ व चोखंदळ असल्याने थापा मारून वेळ मारून नेणे चालत नाही. कोणतीही संकल्पना शिकवताना चूक झाली तर विद्यार्थी लगेच शिक्षकाची चूक काढू शकतात, इतक्या त्यांच्या क्षमता विकसित झालेल्या असतात. इतर वयोगटापेक्षा शिकवण्यासाठी हा वयोगट अवघड असतो. परिस्थिती विचित्र असते, म्हटले तर काही मूलभूत संकल्पना शिकून झालेल्या असतात आणि त्यावर अवलंबून असलेल्या अधिक जटिल शिकायच्या असतात . काही जणांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतानाच ते महाविद्यालयात आलेले असतात आणि काहींची तयारी खूप पुढचीही झालेली असते. त्यामुळे या दोन्ही गटांना समाधानकारकरित्या शिकवणे अतिशय कठीण काम आहे.

कौशल्ये

प्रौढ वयोगटातील या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी जरी प्राध्यापकाची नसली तरी कर्तव्य म्हणून शिक्षकाचे काम करावेच लागते. चंचल वृत्तीच्या युवकांना कामात गुंतवून ठेवणे अवघड काम असते. विषयातील रुची निर्माण होईल व टिकेल यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सध्या त्या विषयात नवीन काय चालू आहे याबद्दलची सजगताही असावी लागते. कोणत्या नवीन तत्त्त्वांची भर पडली आहे? कोणती जुनी तत्वे बाद झाली आहेत? नवीन संशोधन काय केले जात आहे? असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत माहिती असायला हवी. शिवाय वक्तृत्व व संवाद कौशल्यही उत्तम लागते. स्वतःचा संशोधनाचा अनुभवही अध्यापनात उपयुक्त ठरतो. या वयोगटातील विद्यार्थी गोंधळलेल्या मनःस्थितीत असतात. आयुष्याची दिशा नीट सापडलेली असतेच असे नाही. शिक्षकांशी कसे वागावे? प्रौढांशी कसे वागावे? मुले अथवा मुलींशी कसे वागावे? याचे अंदाज चुकल्याने बोलणी खातात. या वयोगटाशी मित्रत्वाच्या नात्याने वागावे लागते. उपदेशात्मक बोलणे या वयोगटातल्या मुलांना रुचत नाही.

आव्हाने

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षकांपुढे वेगळीच आव्हाने उभी आहेत. माहिती पोहोचविणारी अनेक माध्यमे उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्याआधीच माहीत असतात. परंतु, माहीत असणे आणि त्यातील संकल्पना स्पष्ट असणे यात फरक असतो माहीत असणे म्हणजेच समजलेले असणे असे विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे अनेक वेळा शिक्षकांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करतात. वर्गातील शिकण्यापेक्षा वर्गाबाहेरची आकर्षणे त्यांना खुणावत असतात. त्यामुळे तास बुडवण्याकडेही कल असतो. मग वरच्या वर्गात जातील तसे विषय समजण्यात अडचणी निर्माण होतात. याही स्तरावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या संस्थेत काम करता यावरून अतिशय त्रोटक ते अतिशय चांगले असे वेतन या क्षेत्रात मिळते. खासगी संस्थांमध्ये सर्वसाधारणपणे कमी मानधन मिळते, परंतु अनुदानित संस्थामधे मात्र पुरेसे चांगले वेतन आहे. वेतन जरी कमी अधिक मिळाले तरी आपण शिकवलेले विद्यार्थी जेव्हा आयुष्यात मोठे यश संपादन करतात तेव्हा आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. विद्यार्थ्यांना दिशा देण्याचा हा महत्त्वाचा काळ असतो. चांगल्या व प्रामाणिक अध्यापकांप्रती आजही समाजात आदर टिकून आहे. मग बनणार ना प्राध्यापक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.