संशोधक होण्यासाठी...

संशोधन करणे म्हणजे ज्ञानात भर घालण्यासाठी केलेला पद्धतशीर अभ्यास होय. संशोधक संशोधन करून यापूर्वी माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध लावतो. इतर कुणाच्याच लक्षात न आलेल्या गोष्टी लक्षात आणून देतो. यामध्ये आधीच सापडलेल्या गोष्टीचे निराळ्या पद्धतीने केलेले समर्थनही असू शकते.
संशोधक होण्यासाठी...
संशोधक होण्यासाठी...sakal

वेध भविष्याचा

डॉ. मिलिंद नाईक,प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी

संशोधन करणे म्हणजे ज्ञानात भर घालण्यासाठी केलेला पद्धतशीर अभ्यास होय. संशोधक संशोधन करून यापूर्वी माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध लावतो. इतर कुणाच्याच लक्षात न आलेल्या गोष्टी लक्षात आणून देतो. यामध्ये आधीच सापडलेल्या गोष्टीचे निराळ्या पद्धतीने केलेले समर्थनही असू शकते.

संशोधक बनण्यासाठी खरे तर कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शिक्षणाची गरज नसते. ग्रामीण भागातील कमी शिकलेली किंवा न शिकलेली व्यक्तीसुद्धा नवीन शोध लावू शकते, पण सवेतन दीर्घ काळ एखाद्या संस्थेत काम करायाचे असल्यास किमान विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त असणे गरजेचे असते. तसे असेल तर देशभरातल्या अनेक संशोधन संस्थांमध्ये नोकरी करून संशोधन करता येते. विषयानुसार वेगवेगळ्या संशोधन संस्था असतात. विज्ञानविषयक संशोधनासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय शिक्षण आणि संशोधन संस्था, आघारकर संशोधन संस्था तर सामाजिक शास्त्रांसाठी डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, गोखले संस्था आदी पुण्यात आहेत.

लक्षणे

चांगले संशोधक स्वाभाविकपणे चिकित्सक असतात. त्यांच्यातील कुतुहल कायम जागरूक असते. त्यांना नवीन कल्पना शोधण्यात, प्रश्न विचारण्यात आणि नवीन गोष्टी शोधण्यात आनंद मिळतो. चांगले संशोधक उपलब्ध माहितीवर गंभीरपणे विचार करतात. ते गृहितकांवर प्रश्न विचारतात, पुराव्याचे मूल्यांकन करतात आणि तार्किक निष्कर्ष काढतात. चांगले संशोधक तपशीलाकडे, बारकाव्यांकडे लक्ष देतात. महत्त्वाच्या माहितीकडे दुर्लक्ष न केल्याची खात्री करून ते काळजीपूर्वक नवीन माहिती गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करतात. संशोधन करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यात बौद्धिक कसरत असतेच आणि अत्यंत चिकाटी लागते. खूप काम करूनही हातात काहीच लागले नाही असे होऊ शकते. मात्र, चांगले संशोधक सहजासहजी हार मानत नाहीत. गोष्टी कठीण असतानाही ते प्रयत्न करत राहतात. थॉमस अल्वा एडिसन ज्यांनी बल्बच्या फिलॅमेंटचा शोध लावला. त्यांनी हजारो वेळा प्रयोग केला. विद्युतप्रवाह सुरू केला असता अनेक वेळा फिलॅमेंट जळून जात असे. मात्र, बऱ्याच प्रयोगानंतर टिकाऊ फिलॅमेंट सापडली. पण त्यांचा दृष्टिकोन बघा! एखादी फिलॅमेंट जळून गेल्यानंतर ते म्हणत असत की, ही फिलॅमेंट चालणार नाही हे यातून मला लक्षात आले! इतकी जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन संशोधकात असावा लागतो. संशोधनामध्ये अनेकदा अनपेक्षित आव्हाने येतात. त्याने खचून न जाता चांगले संशोधक परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात. आवश्यक असेल, तेव्हा ते मार्ग बदलू शकतात आणि समस्यांवर सर्जनशील उपाय शोधू शकतात.

कौशल्ये

चांगले संशोधक नैतिकतेने वागतात. ते संशोधन सहकाऱ्यांशी आदराने वागतात, गोपनीयता राखतात आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. अन्यथा संशोधनातील खोटारडेपणा लाखो लोकांच्या जिवाशी खेळ ठरतो. चांगले संशोधक प्रभावीपणे संवाद साधण्यास सक्षम असावे लागतात. त्यांच्याकडे त्यांचे निष्कर्ष इतरांना समजतील अशाप्रकारे सादर करता येणे, स्पष्टपणे आणि दीर्घ अथवा संक्षिप्तपणे लिहिता येण्याचे कौशल्य असावे लागते आणि इतरांचे अभिप्रायही काळजीपूर्वक ऐकण्याचे कौशल्य ही असावे लागते. संशोधकांनी मनमोकळे असावे लागते. भिन्न दृष्टिकोन विचारात घेण्यास आणि नवीन कल्पनाचा शोध घेण्यासही तयार असावे लागते. जरी सुरुवातीला त्यांच्याशी सहमती नसली तरीही कान देऊन ऐकण्याची सवय असावी लागते. चांगले संशोधक इतरांसोबत चांगले काम करू शकतात. अलीकडच्या काळात संशोधन करणे हे एकट्या-दुकट्याचे काम राहिलेले नाही. अनेक विषयतज्ज्ञांसह तांत्रिक सहकाऱ्यांबरोबरही एकत्र काम करावे लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, चांगले संशोधक त्यांच्या कामाबद्दल उत्साही असतात. ते संशोधन प्रक्रियेबद्दल आणि त्यांच्या क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्यासाठी अत्यंत प्रेरित असतात.

संधी

काही प्रकारच्‍या संशोधकांना जसे की, रसायनशास्त्रज्ञांना संशोधनासाठी प्रयोगशाळेत बसून तासंतास काम करावे लागते तर, काही प्रकारच्या संशोधकांना जसे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन उन्हातान्हात कष्ट करावे लागतात. दोन्ही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. मात्र, चांगल्या संशोधकाला उत्तम वेतन मिळते. वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळते.

संशोधक बनायचे असेल तर एखाद्या विषयातील सखोल ज्ञानच नाही, तर वर उल्लेखलेली कौशल्ये आणि वृत्तीही असावी लागते. तरच संशोधक म्हणून यशस्वी होण्याची शक्यता असते. मग तपासून पाहा तुमच्याकडे असे गुण आहेत का? मग व्हायचंय ना संशोधक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com