नोकरी बाजारपेठ : फूड इंडस्ट्रीला हवा शिक्षित शेतकरी indranil chitale writes Food industry needs educated farmers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Industry

नोकरी बाजारपेठ : फूड इंडस्ट्रीला हवा शिक्षित शेतकरी

- इंद्रनील चितळे

जगभरात आता अधिकाधिक मूल्यवर्धित, सकस आणि आरोग्यदायी खाण्याकडे कल वाढला आहे. खाणं आवडीचं हवं त्याचबरोबर ते अधिक पोषणमूल्य असणारे आणि संभाव्य आजारांपासून संरक्षण करणारे, त्यांना प्रतिबंध करणारे असावे असा आग्रह वाढला आहे. खाण्याच्या या बदलत्या सवयींमुळे भारतातील फूड इंडस्ट्रीला वाढण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. पुढचा काळ हा उत्तम शेती आणि शेतीपूरक प्रक्रिया उद्योग यांचा असल्यामुळे या क्षेत्रात व्यवसाय आणि नोकरी याला मोठा वाव असेल.

सध्याचा काळ बदललेला आहे, यात तुम्हाला केवळ एका विषयात, क्षेत्रात तज्ज्ञ असून चालत नाही तर चार-पाच विषयातील ज्ञान, अभ्यास असावा लागतो. त्यादृष्टीने शिक्षणाच्या शाखाही आता बहुआयामी होत आहेत. त्यामुळे शिक्षण घेतानाच विविध विषयांचे अध्ययन होईल, वेगवेगळी कौशल्य असतील असेच अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. फूड इंडस्ट्रीचाच विचार केल्यास पुरवठा साखळीला महत्त्व आहे. या साखळीत शेती आधारित उत्पादन आणि डेअरी किंवा दुग्धोत्पादन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत.

श्वेतक्रांतीनंतर आपल्याकडील दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. यात अजूनही वाढ करण्याची संधी आहे. जनावरांच्या जेनेटिक्स आणि डीएनएवर काम केल्यास जनावरांचे आरोग्यही सुधारेल आणि दुधाचे उत्पादनही वाढेल. त्यामुळे पुरवठा साखळी सुधारण्याची संधी आहे. त्यामुळे शेती संदर्भातील शिक्षण घेणे, संशोधन करणे आवश्यक आहे, असे मला वाटते. या शिक्षणाचा वापर शेतीचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी करू शकतो. कारण आपले दर एकरी उत्पादन खूपच कमी आहे.

याउलट अमेरिकेत आपल्यापेक्षा कमी क्षेत्रात, कमी मनुष्यबळात पाच पट अधिक शेती उत्पन्न काढले जाते. भारतात १७ टक्के जीडीपी शेतीवर अवलंबून आहे, जर या १७ टक्के वाट्यातच वाढ केली तर आपण भारताला जगाचे शेत किंवा फूड मार्केट प्लेस बनविण्याचे स्वप्न पाहत आहोत ते साध्य करता येईल. त्यासाठी चांगले शिकलेले शेतकरी हवे आहेत, जे आपली उत्पादकता वाढवतील. अशा शेतकऱ्यांची संख्या वाढविणारी शिक्षणपद्धती आपल्याला स्वीकारायला हवी.

डिजिटल मार्केटिंगमुळे आता शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी मध्यस्थांची गरज भासत नाही. आपला माल डिजिटल मार्केटिंगद्वारे जगभरात कोठेही विकता येतो. हा एक पुरवठा साखळीचा भाग झाला. ही साखळी चांगली झाली की कोणतेही मूल्यवर्धित अन्न (व्हॅल्यू अॅडेड फूड) बनवायचे कारखाने आहेत त्यांना चांगल्या दर्जाचा पुरवठा होईल. त्यातून चांगल्या दर्जाचे पदार्थ बनतील. अशा दर्जेदार फूडसाठी जगभराची बाजारपेठ खुली आहे.

जागतिक मानांकनानुसार आपण फूड तयार करू शकतो आणि ते करण्यासाठी फूड टेक्नॉलॉजीमधील बी. टेक., एम. टेक हे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून या इंडस्ट्रीला हवे असणारे सर्वंकष शिक्षण मिळते. शिवाय तुम्हाला शेती कळते, मायक्रोबायॉलॉजी कळते, फूड केमिस्ट्री, फूड बायॉलॉजी कळते शिवाय इंजिनिअरिंगचे बेसिक शास्त्रही समजते‌. ज्याचा उपयोग पुढे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे यापुढील काळात करिअर, व्यवसाय, नोकरी म्हणून या क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यातील संधी पुढील भागात पाहणार आहोत.

(लेखक ‘चितळे बंधू’ उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.)

टॅग्स :Farmereducationjob