स्वतःला झोकून देण्याची गरज

बीड हे माझं मूळ गाव. आई-बाबा दोघेही सरकारी अधिकारी. प्राथमिक शिक्षण बीडला झाल्यावर नाशिकच्या भोसला मिल्ट्री हायस्कूल, नाशिक येथे मी शिक्षण घेतलं.
स्वतःला झोकून देण्याची गरज
स्वतःला झोकून देण्याची गरजSAkal

- चिन्मय पंडित

बीड हे माझं मूळ गाव. आई-बाबा दोघेही सरकारी अधिकारी. प्राथमिक शिक्षण बीडला झाल्यावर नाशिकच्या भोसला मिल्ट्री हायस्कूल, नाशिक येथे मी शिक्षण घेतलं. त्यानंतर पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून बारावी झालो. मला लहानपणापासूनच ‘युनिफॉर्म सर्व्हिस’ जसे की, नौदल, लष्करात जाण्याची इच्छा होती.

मात्र, वैद्यकीय कारणांमुळे ती संधी गेली. बारावीनंतर पुण्याच्या व्ही. आय. टी. महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात माझ्या वाचनात ‘नवा विजयपथ’ हे अविनाश धर्माधिकारी यांचं पुस्तक आलं. त्यामुळे माझ्यात आयएएस, आयपीएस होण्याची इच्छा निर्माण झाली.

याच काळात महाविद्यालयाच्या प्लेसमेंटमधून मला महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपनीत नोकरीही लागली. २००९ मध्ये जागतिक बाजारपेठेत मंदी असतानाही अशी एखादी चांगली नोकरी लागणं हे फार महत्त्वाचं ठरलं होते. मात्र, असं असूनही माझं मन त्यात रमलं नाही. जेमतेम एक वर्ष काम करून मी नोकरी सोडली.

स्पर्धा परीक्षेची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानंतर पुढचं एक वर्ष बाकी सगळं सोडून फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०११ हे पूर्ण वर्ष फक्त अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली.

२०१२ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली आणि २०१३ मध्ये निकाल लागला. मी यशस्वी झालो. अगदी पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं आणि आयपीएस झालो. मी केवळ यूपीएससीचीच तयारी करत होतो. बाकी कुठेही मी लक्ष दिलं नाही. आपलं ध्येय ठरवून अभ्यास करत राहिलो.

स्पर्धा परीक्षेचा आणि त्यातही विशेषतः यूपीएससीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, स्वतःला पूर्णतः झोकून देण्याची गरज आहे. स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणत्या वेळी केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो? कसा अभ्यास करणं आवडतं? हे ओळखा. त्यानुसार वेळापत्रक तयार करा.

माझं मिनिट टू मिनिट वेळापत्रक ठरलेलं असायचं आणि मी ते तंतोतत पाळण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळे वेळ वाया गेला नाही. आजच्या दिवसात, या आठवड्यात, या महिन्यात आपल्याला काय करायचं आहे? हे ठरवा. ‘रिअल टाइम’ म्हणजे ‘यूपीएससी’च्या वेळेत बसून तीन तास पेपर सोडवण्याचा सराव मी केला. त्याचा निश्‍चित फायदा झाला.

यूपीएससी ही केवळ तुमच्या ज्ञानाची नाही, तर तुमच्या मानसिकतेची आणि व्यक्तिमत्त्वाचीदेखील परीक्षा आहे, हे ध्यानात ठेवा. आपली मानसिकता, विचारसरणी एखाद्या अधिकाऱ्यासारखी तयार करा. आत्मविश्‍वास ठेवा. मग यश तुमचंच आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com