

आज आपण विज्ञानाशी निगडित एका पुस्तकाशी मैत्री करणार आहोत. खरे तर सध्या सुट्टी सुरू असल्याने अभ्यासाचा विषयही नको वाटतो, पण हे पुस्तक अभ्यासाचे ओझे लादणारे किंवा विज्ञानाची भीती दाखवणारे मुळीच नाही. उलट सुट्टीमध्ये जसे आपण नवीन मित्र बनवतो.
तसेच हे पुस्तक आपल्याला विज्ञानाशी मैत्री करायला शिकवेल, कारण विज्ञानाची भीती दूर सारून ते आपलेसे करणाऱ्या १०० शास्त्रज्ञांनी त्यांच्या शास्त्रज्ञ होण्याची रंजक कथा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितली आहे. हे पुस्तक म्हणजे ‘वन हंड्रेड रीजन्स टू बी अ सायंटिस्ट’ या मूळच्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीत अनुवादित रूप ‘आम्ही शास्त्रज्ञ असे झालो!’. डॉ. पंडित विद्यासागर यांनी हा अनुवाद केला आहे.
एखाद्या व्यक्तीला शास्त्रज्ञ होण्यासाठी आयुष्यात कशातून प्रेरणा मिळते? हे या पुस्तकातून उलगडले गेले आहे. विशेष म्हणजे, या प्रत्येक व्यक्तीचा शास्त्रज्ञ होण्याचा प्रवास मोठा रंजक आहे, काहींचा अगदी गमतीशीरदेखील. मात्र, या सर्वांमध्ये समान धागा म्हणजे या सर्वांनी विज्ञानाला आपलेसे केले, परीक्षेतील गुण, पदव्या, गलेलठ्ठ पगाराची नोकरी या सर्वांच्या पलीकडे विचार करत विज्ञानाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून समाजाला पिढ्यान् पिढ्या उपयुक्त ठरणारे संशोधन केले.
हा सर्व प्रवास वाचत असताना विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. केवळ विज्ञानच नव्हे, तर आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही विषयात मनापासून काम केले असता यश मिळते आणि काहीतरी उत्कट केल्याचे समाधानही लाभते याची जाणीव पुस्तक वाचताना पानापानांवर होते. या पुस्तकात स्वतःबद्दल सांगणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी तब्बल २६ शास्त्रज्ञ हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत.
त्याचप्रमाणे घर संसार सांभाळून संशोधन करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचाही यात समावेश आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, सांख्यिकी यांसारख्या अनेक विषयांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची जीवनगाथा वाचून आपण अक्षरशः अवाक् होतो.
या पुस्तकात बहुतांशी शास्त्रज्ञ हे विज्ञानाशी निगडित विषयांवर संशोधन करणारेच आहेत, परंतु काही अर्थशास्त्रज्ञांचाही या पुस्तकात समावेश केला आहे. डॉ. जयंत नारळीकर, एम. जी. के. मेनन, डॉ. सी. एन. आर. राव यांसह काही भारतीय शास्त्रज्ञांनीदेखील त्यांची जीवनकहाणी आपल्याला सांगितली असल्यामुळे या पुस्तकाबद्दल अधिक आपलेपणा निर्माण होतो.
हे पुस्तक विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनीदेखील आवर्जून वाचायला हवे. बहुतांश शास्त्रज्ञांनी त्यांना संबंधित विषयाची गोडी लागण्यामध्ये त्यांच्या शिक्षकांचे योगदान सर्वाधिक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या शिक्षकांनी त्यांचा विषय अशा पद्धतीने शिकवावा की, विद्यार्थ्यांना त्याची गोडी लागेल आणि यासाठीची प्रेरणा हे पुस्तक देते.
(संकलन : रोहित वाळिंबे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.