esakal | ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

 ITI Courses

‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतंर्गत यंदा दोन लाख ८८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी येत्या शनिवारी (ता.४) जाहीर होणार आहे.

प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी शुक्रवार (ता.३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविता येणार आहेत. तसेच प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करायचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश करून तसा बदल करणे शक्य होणार आहे. यानंतर प्रवेश अर्जात बदल करण्यासाठी कोणत्याही प्रकारे मुभा देण्यात येणार नाही, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

पर्याय सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना पाठविले जातायेत ‘एसएमएस’

यंदा आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन लाख ५८ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज शुल्क भरले आहे. तर दोन लाख ४१ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी पर्याय (विकल्प) सादर केले आहेत. प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आणि पर्याय सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत असल्याने आतापर्यंत पर्याय न भरलेल्या विद्यार्थ्यांना ‘एसएमएस’द्वारे पर्याय अर्ज भरण्यासाठी पुन:श्च कळविण्यात येत आहे. तसेच पर्याय अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • विद्यार्थ्यांने एकच अर्ज भरावा, एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या विद्यार्थ्याचे सर्व अर्ज रद्द होतील

  • एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाल्यास, किंवा चुकीने प्रवेश देण्यात आला, तरीही त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल

  • अनिवासी भारतीय आणि इतर राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या फेरीत संधी मिळेल

  • प्रत्येक फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र (ॲलॉटमेंट लेटर) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल

  • प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत.

एकूण नोंदणी : २,८८, ५८८

अर्ज पूर्णपणे भरलेले : २, ६४, ५१७

प्रवेश अर्ज शुल्क भरलेले : २,५८,५६९

पर्याय सादर केलेले अर्ज : २,४१,६७८

अर्जात दुरुस्ती केलेले : १३, ५५३

loading image
go to top