
माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात नवीन नोकरी मिळविण्यासाठी करावी लागणारी वेटिंग अद्यापही कायम आहे.
Itians : नव्या नोकरीसाठी आयटीयन्स वेटिंगवर
पुणे - माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात नवीन नोकरी मिळविण्यासाठी करावी लागणारी वेटिंग अद्यापही कायम आहे. ऑफर लेटर मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जॉइन होण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त काळ वाट पहावी लागली, असे एका आयटीयन्सच्या संघटनेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.

फ्रेशर किंवा अनुभवी आयटीयन्सला नवीन नोकरीच्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी किती दिवस वेटिंगवर थांबावे लागले हे समजून घेण्यासाठी नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटकडून नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. त्यात एक हजार १०० हून अधिक आयटीयन्सने सहभाग नोंदविला होता. नवीन नोकरीच्या ठिकाणी जॉइन होण्यासाठी तुम्हाला किती महिन्यांचा कालावधी लागला, असा प्रश्न विचारला होता. त्यात ५० टक्के आयटीयन्सने १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागल्याचे नमूद केले आहे. तर २३ टक्के आयटीयन्सने १२ महिने वाट पाहिल्याचे नमूद केले आहे. तर नऊ आणि सहा महिने थांबल्याचे प्रमाण अनुक्रमे २१ आणि पाच टक्के आहे. या सर्वांत फ्रेशरचे प्रमाण सर्वाधिक आहे.
छोट्या कंपनीची ऑफर स्वीकारायची का?
बड्या कंपनीची ऑफर असल्याने नोकरी स्वीकारली, असे आयटीयन्सचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. चांगल्या कंपनीसाठी थांबलेल्या आयटीयन्सला नवीन कंपनी वेळेत जॉइन करून घेत नाही. त्यामुळे यादरम्यान त्यांना जर छोट्या कंपनीकडून किंवा एखाद्या स्टार्टअपकडून ऑफर आली तर ती स्वीकारायची की नाही, या द्विधा मनःस्थितीत आयटीयन्स अडकत आहेत.
कंपन्या जास्त कर्मचाऱ्यांना ऑफर लेटर देऊन ठेवतात आणि गरज पडेल तेव्हा कामावर बोलावतात. त्यामुळे अनेकांना नोकरीसाठी ताटकळत बसावे लागते. त्यामुळे ऑफर लेटर दिल्यानंतरही किती दिवसांत जॉइन करून घ्यायचे याबाबत कायद्यात ठोस तरतुदी हव्यात. त्याचा अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट
देशातील बड्या कंपनीचे ऑफर लेटर मिळून सात महिने झाले. मात्र, अद्याप कामावर रुजू करून घेतलेले नाही. ही पहिलीच नोकरी आहे, तसेच बड्या कंपनीने ऑफर दिल्याने मी थांबलो आहे. परंतु, किती दिवस थांबायचे?
- ऑफर लेटर मिळालेला आयटीयन