
बारावीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुढे कोणत्या क्षेत्रात जायचा याचा संभ्रम दिसून येतो. कायदेविषयक क्षेत्रही करिअरसाठी उत्तम आहे.
दखल : कायदेविषयक क्षेत्रातील संधी
- ॲड. जान्हवी भोसले
बारावीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुढे कोणत्या क्षेत्रात जायचा याचा संभ्रम दिसून येतो. कायदेविषयक क्षेत्रही करिअरसाठी उत्तम आहे. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये कायदा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी राज्यातील १८ शहरांमध्ये ‘विधी प्रवेशपरीक्षा’ घेतली जाते. एम.एच.सीईटी-२०२३साठी अर्ज करण्याच्या तारखा प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आहेत.
एलएलबीची पदवी घेतल्यानंतर दिवाणी किंवा फौजदारी स्वरूपाची स्वत-ची प्रॅक्टिस करू शकता. लॉ फर्ममध्ये चांगल्या पगाराची नोकरी करू शकता. नवीन पदवीधरांसाठी न्यायव्यवस्था हा एक नोकरीचा पर्याय आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कायदेशीर सल्लागार पदावर नियुक्त होऊ शकता. शैक्षणिक, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात संधी आहे.
परीक्षेचे स्वरूप
परीक्षेत १५० वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि दोन तासांचा वेळ असतो. परीक्षेमध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रवेश परीक्षेला प्रामुख्याने कायदा, कायदेशीर योग्यता आणि समस्या सोडविण्याची क्षमता, चालू घडामोडींचे सामान्य ज्ञान, विश्लेषणात्मक तर्क, इंग्रजी आणि गणित हे विषय आहेत.
परिक्षेचा अभ्यासक्रम
कायदेविषयक अभिवृत्ती (३० गुण). सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (४० गुण). तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे (३० गुण.) इंग्रजी (५० गुण.) एकूण १५० गुण. पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम सीईटीचे विषय सारखेच आहेत. मात्र सामान्य गणित हा जास्तीचा विषय आहे.
परीक्षेसाठी पात्रता
1) एकात्मिक कायदा अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी मान्यता प्राप्त बोर्डातून १०+२ किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावी.
2) तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून पदवी धारण केलेली असावी.
3) प्रवेश परीक्षेला पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी किमान ४५ टक्के आणि राखीव वर्गासाठी किमान ४० टक्के गुण प्राप्त केलेले असावेत
4) कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादेचे कोणतेही निकष नाही.
निवड प्रक्रिया
कायद्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
उत्तीर्ण उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीने समुपदेशन केले जाते.
समुपदेशन प्रक्रियेमध्ये प्रवेश फॉर्म भरणे, कागदपत्र पडताळणी, पर्याय भरणे, जागा रिझल्ट आरक्षित करणे इतर बाबींचा समावेश होतो
उमेदवारांची गुणवत्ता यादी उमेदवारांची निवड केलेली महाविद्यालय आणि महाविद्यालयातील जागांची उपलब्धता या आधारे उमेदवारांची निवड केली जाते
आवश्यक कागदपत्रे
दहावी आणि बारावी गुणपत्रिका तसेच उत्तीर्ण प्रमाणपत्र
पदवी प्रमाणपत्र (तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी)
ट्रान्स्फर सर्टिफिकेट
प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र
प्रवेश परीक्षेचे रँक कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो आणि वैध आयडी पुरावा
प्रवेश परीक्षा शुल्क
महासीईटी- कायदा २०२३ नोंदणी शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८०० रुपये आणि महाराष्ट्रातील एसी आणि एसटी उमेदवारांसाठी ४०० रुपये आहे. ते ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. विद्यार्थांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरताना काळजी घ्यावी. फॉर्म भरून झाल्यावर तपासून "save" बटन दाबावे. एकदा सेव्ह केलेला फॉर्म पुन्हा बदलता येत नाही. यामध्ये गडबड झाल्यास उमेदवारांचे एक वर्ष वाया जाऊ शकते.