
JEE Mains Result 2023 : अवघ्या पाच दिवसांत जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे : देशभरात घेण्यात आलेल्या पहिल्या सत्रातील जेईई परीक्षेचा निकाल अवघ्या पाच दिवसांत लावण्याचा नवा विक्रम करण्यात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) यश आले आहे. बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या या परीक्षेत २० विद्यार्थी १०० पर्सेंटाईल (१०० एनटीए स्कोअर) मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
एनटीएमार्फत बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमासाठी २४, २५, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी दरम्यान जेईई मेन परीक्षा झाली आणि या परीक्षेचा निकाल अवघ्या पाच दिवसांत जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल आठ लाख ६० हजार ६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील आठ लाख २३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. देश-विदेशातील २८७ शहरांमधील ५७४ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली.
दरम्यान, एनटीएतर्फे बी.आर्च आणि बी. प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी २८ जानेवारीला जेईई मेन परीक्षा झाली आणि त्यासाठी ४६ हजार ४६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु बी. आर्च आणि बी. प्लॅनिंगचा स्कोअर येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
परीक्षा दिलेले विद्यार्थी :
बी.ई/बी.टेक अभ्यासक्रम
तपशील : विद्यार्थी संख्या
विद्यार्थिंनी : २,४३,९२८
विद्यार्थी : ५,८०,०३७
तृतीयपंथी विद्यार्थी : ०३
एकूण : ८,२३,९६७
‘जेईई मेन २०२३’ परीक्षेचे वैशिष्ट्ये
- मराठी, बंगाली, गुजरातीसह तेरा भाषांमध्ये ही परीक्षा झाली
- देशाबाहेरील १७ शहरांमध्ये झाली परीक्षा
- प्रत्येक शिफ्टला ३५ हजार कॅमेऱ्याच्या नियंत्रणात विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
- २९ हजार जॅमर्स (प्रत्येक शिफ्टमध्ये) बसविण्यात आलेले