संधी नोकरीच्या : गरज ट्रेनिंग प्लेसमेंट सेलची 

डॉ. शीतलकुमार रवंदळे 
Thursday, 23 April 2020

Job Opportunities -need for training placement cell विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांना प्लेसमेंटसाठी तयार करायला हवे.

महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी व पालक महाविद्यालयातील प्लेसमेंटची टक्केवारी हा घटक पाहतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांना प्लेसमेंटसाठी तयार करायला हवे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चांगले प्लेसमेंट होण्यासाठी महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या गरजा अशा : 

प्लेसमेंट सेलसाठी लागणारे मनुष्यबळ : 

१) पूर्णवेळ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरची (TPO) आवश्यकता असते. काही महाविद्यालये एखाद्या शिक्षकाला शिकविण्याबरोबर प्लेसमेंटची अतिरिक्त जबाबदारी देतात. संबंधित शिक्षक दोन्ही कामांना पूर्ण न्याय देऊ शकत नाही. एआयसीटीइच्या नियमानुसार रोस्टरमध्ये प्रत्येक महाविद्यालयाने नियोजन करायला पाहिजे. विद्यापीठाने महाविद्यालयातील मनुष्यबळ भरतीची परवानगी देताना देखील ते तपासावे. 

२) महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरसाठी विद्यापीठाकडून मान्यता आवश्यक आहे. 

३) कोणत्याही शाखेसाठी विद्यार्थी व शिक्षक हे प्रमाण ठरलेले असते. त्याचप्रमाणे विद्यार्थी व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर हे प्रमाणदेखील हवे. साधारण ३०० विद्यार्थ्यांमागे १ असे प्रमाण असावे. ३०० पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असल्यास एक प्रमुख ऑफिसर व त्याला मदत करण्यासाठी प्रत्येक ३०० विद्यार्थ्यांमागे आणखी एक ऑफिसर असावा. 

४) अभियांत्रिकी, डिप्लोमा, एमसीए., एमबीए यांसारख्या प्रत्येक कोर्ससाठी वेगळा ऑफिसर व वेगळा प्लेसमेंट सेल असावा. 

५) डेटाबेस मॅनेजमेंट करणारा कर्मचारी, प्लेसमेंटसाठीचे स्वतंत्र संगणक देखभाल करणारा कर्मचारी व इतर कामांसाठी इतर विभागांप्रमाणे स्वतंत्र शिपाई असावा. 

६) प्रत्येक विभागातर्फे समन्वयासाठी एक शिक्षक समन्वयक व प्रत्येक वर्गातून ३ विद्यार्थी प्रतिनिधी असावेत. 

प्लेसमेंट सेलसाठीच्या पायाभूत सुविधा : 
१) प्लेसमेंट विभागासाठी स्वतंत्र कार्यालय असावे. 
२) प्रत्येकी ३०० विद्यार्थ्यांमागे सुमारे ६० ते ९० संगणक स्वतंत्रपणे प्लेसमेंट विभागासाठी असावेत. प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी, ॲप्टिट्युड, प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी, ॲप्टिट्युडच्या ऑनलाइन परीक्षा, कंपनीचे रोजगार मेळावे घेण्यासाठी यांची गरज असते. 
३) महाविद्यालयाच्या तपासणीसाठी विद्यापीठाच्या जाणाऱ्या समितीने प्रत्येक महाविद्यालयात या सुविधा तसेच मनुष्यबळ आहे की नाही, हे तपासावे. 
४) या समितीत ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरची नियुक्ती करावी. तो सर्व सुविधा व मनुष्यबळाची खातरजमा करू शकेल. 
५) मुलाखती घेण्यासाठी ४ ते ५ स्वतंत्र केबिन्स, २ मोठे रूम्स गट चर्चेसाठी व ३०० ते ५०० संख्येसाठी सभागृह असावे. 

प्लेसमेंट सेलच्या आर्थिक गरजा : 
१) उद्योगांच्या गरजेप्रमाणे प्रथम वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण. 
२) विविध कंपन्यांचे रोजगार मेळावे आयोजित करण्यासाठीचा खर्च. 
३) ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या उपक्रमांसाठी खर्च. 
४) जॉब फेअर व उद्योग चर्चासत्र आयोजित करण्यासाठी तरतूद. 

ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या इतर गरजा : 
१) संगणक, यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स व इतर शाखांप्रमाणे ट्रेनिंग प्लेसमेंटसाठी स्वतंत्र बोर्ड ऑफ स्टडिज असावे. 
२) कंपनीच्या प्रतिनिधींना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था असावी. 
३) अभ्यासक्रम ठरविणाऱ्या समितीत ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसरचा समावेश हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Opportunities - the need for training placement cell