करिअर घडविताना : राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा पद्धती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Defense Academy

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमांच्या भूदल, नौदल आणि हवाई दल शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षातून दोनदा संघ लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाते.

करिअर घडविताना : राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा पद्धती

- के. रवींद्र

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमांच्या भूदल, नौदल आणि हवाई दल शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्षातून दोनदा संघ लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाते.

या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये लेखी परीक्षा आणि एसएसबी मुलाखत यांचा समावेश होतो. लेखी परीक्षेत गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (GAT) असे दोन पेपर असतात. गणिताच्या पेपरमध्ये ३०० गुण असतात तर सामान्य क्षमता चाचणीच्या पेपरमध्ये ६०० गुण असतात. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लेखी परीक्षेसाठी एकूण ९०० गुण आहेत. गणिताचे प्रश्न इयत्ता बारावीच्या स्तरावरील विषयांवरून विचारले जातात. सामान्य क्षमता चाचणीच्या पेपरमध्ये इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान या विषयांचे प्रश्न असतात. सत्र-१ची परीक्षा १६ एप्रिल २०२३ रोजी घेतली जाईल.

पात्रता निकष

  • पुरुष व महिला उमेदवार बारावी प्रमाणपत्रासह या परीक्षेसाठी पात्र आहेत.

  • ऑगस्ट २०२१ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महिलांनासुद्धा राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी (NDA आणि NA) परीक्षेत सामील होण्यासाठी अंतरिम आदेश दिले आहेत.

  • राष्ट्रीयत्व : भारतीय किंवा नेपाळ (विशेष परिस्थितीमध्ये)

  • वयोमर्यादा : राष्ट्रीय संरक्षण अकादमी-१ परीक्षेसाठी २ जुलै २००३ पूर्वीचा जन्म नसावा. ०१ जुलै २००६ नंतर जन्मलेले उमेदवार पात्र आहेत.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी-२ परीक्षेसाठी २ जानेवारी २००४ आणि १ जानेवारी २००७ दरम्यान जन्म घेतलेले उमेदवार पात्र आहेत.

उमेदवाराने मॅट्रिक प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला किंवा भारतीय विद्यापीठाद्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही समकक्ष प्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार जन्मतारीख लिहिणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र

1) पात्रता प्रमाणपत्र

2) ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इ.)

3) जन्म दाखला

4) पासपोर्ट फोटो

5) राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी श्रेणी प्रमाणपत्र

6) रहिवासी प्रमाणपत्र

1) लेखी परीक्षेचा पॅटर्न - ऑफलाइन (पेन पेपर आधारित) इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये

2) प्रश्न स्वरूप - एकूण २७० प्रश्न - १२० गणित आणि १५० सामान्य क्षमता चाचणीमध्ये सर्व प्रश्नांना प्रत्येकी २.५ गुण असतील.

3) पेपर-२ विभागामध्ये विभागणी एकूण ९०० गुण अनुक्रमे ३०० गणित व ६०० सामान्य क्षमता चाचणी वस्तुनिष्ठ गुण,

4) निगेटिव्ह मार्किंग - गणितामध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.८३, तर सामान्य क्षमता चाचणीत १.३३ गुण कापले जाईल.

5) एकूण वेळ - ५ तास

(अडीच तास प्रत्येक विभाग)

NDA SSB मुलाखत

९०० गुणांकरिता मुलाखत ५ दिवस चालते.

1) स्टेज-I मध्ये स्क्रीनिंग चाचणी त्यात मौखिक आणि गैर-मौखिक चाचण्या.

2) स्टेज-II मानसशास्त्रीय, गट चाचणी अधिकारी चाचणी, वैयक्तिक मुलाखत व चर्चासत्र

एकूण जागा...

1) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये ३७० जागा आहेत, त्याअंतर्गत लष्करासाठी २०८, नौदलासाठी ४२ आणि हवाई दलासाठी १२० जागा आहेत, तर नौदल अकादमी २५ जागा आहेत.

2) अभ्यासक्रम व तयारीसाठी - एनडीए परीक्षेत विचारले जाणारे बहुतेक प्रश्न १०+२ स्तरांवरून येतात, विशेषतः गणितातील. सामान्य क्षमता चाचणी विभागाच्या तयारीसाठी उमेदवारांनी दररोज वर्तमानपत्र वाचावे.

टॅग्स :exameducationNDA