विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी बायफोकलचे विषय कोणते? त्याचे फायदे काय? जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

आता विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी बायफोकलचे विषय कोणते, त्याचे फायदे कोणते याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या या लेखातून...

अकरावीमध्ये प्रवेश घेताय आणि बायफोकल विषय देखील घ्यायचा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. या वर्षी बायफोकलचे प्रवेश हे शून्य फेरीत होणार नाहीत. त्यामुळे आधी अकरावीचा प्रवेश निश्चित करावा लागेल. आता विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी बायफोकलचे विषय कोणते, त्याचे फायदे कोणते याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या या लेखातून...

द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम हे सायन्स किंवा कॉमर्स शाखेकडे दोन लक्ष ठेवून सुरू केलेले असल्याने 'द्विलक्षी' अथवा 'बायफोकल' या नावाने ओळखले जातात. राज्य सरकारने मागील दोन वर्षापासून अकरावी सायन्स कडील विद्यार्थ्यांना 'बायफोकल' अभ्यासक्रमांक कडील प्रत्येक महाविद्यालयासाठी विषयानुसार स्वतंत्र कोड देऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधूनच प्रवेश करण्याचे धोरण अवलंबले आहे. मागील वर्षा प्रमाणे बायफोकल विषयांसाठी प्रवेश प्रक्रिया शून्य फेरीत होणार नाहीत.  नियमित फेऱ्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे दोनशे गुणांचे बायफोकल विषय पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत पसंतीच्या महाविद्यालयातील  सायन्स किंवा कॉमर्स  शाखेमध्ये सुद्धा प्रवेश संधी मिळणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध बायफोकल विषय संबंधित प्रवेश संख्या, अनुदानित/विना अनुदानित, लागणारी प्रवेश फी, स्वतंत्र कोड अशी संपूर्ण माहिती वेबसाईटवर लवकरच ऑनलाइन माहिती पुस्तकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी बायफोकल विषयांची ही माहिती नीट वाचून अथवा संबंधित महाविद्यालयातील शिक्षक अथवा विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि पसंतीच्या महाविद्यालयानुसार कोड पाहून पहिल्या, दुसऱ्या, किंवा तिसऱ्या फेरीत देऊन मेरीटप्रमाणे प्रवेश मिळणार आहे. या संधीचा फायदा घेऊन या प्रक्रियेतून प्रवेश पूर्ण करून आपला अभ्यासक्रम सुरू करावा. 

या विद्यार्थ्यांना बारावीनंतर इंजिनिअरिंग अथवा आय. आय. टी अशा उच्च शिक्षणाकडे जाण्याचे ध्येय आहे, त्यांना 200 गुणांचा बायफोकल विषयांचा फायदा होणार आहे. यात शंभर गुणांचा प्रात्यक्षिक विषय असल्याने स्कोअरिंग करणे इतर भाषा विषयांपेक्षा सोपे जाते. तसेच इंजीनियरिंग प्रवेशासाठी पीसीएममध्ये 50 टक्के गुणांची आवश्यकता असते, जर हे गुण 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असतील, तर केमिस्ट्री या विषयाच्या गुणांऐवजी बायफोकल विषयाचे गुण उपयोगी पडतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या जागा पहिल्या फेरीमध्ये शिल्लक राहतील, त्या जागा पुढील फेऱ्यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. मेरीटप्रमाणे बायफोकल प्रवेश प्रक्रियेत सर्व प्रवेश आरक्षणाच्या नियमानुसार होतात, त्यात 25 टक्के जागा दहावीत टेक्निकल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना राखीव असतात.

महाराष्ट्र शासनाने कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार 1978 पासून अकरावी व बारावी या स्तरांवर द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील विषय विशेषतः सायन्स व कॉमर्स शाखेकडे 200 गुणांचे म्हणजे एकूण गुणांच्या 33 टक्के व्याप्ती ठेवून सुरू ठेवले आहेत.  हे अभ्यासक्रम सध्याच्या स्किल डेव्हलपमेंट प्रमाणे आहेत.

सायन्स शाखेकडे विशेषतः अभियांत्रिकीकडे अथवा आय.आय. टी. कडे कल असलेले विद्यार्थ्यांना या द्विलक्षी विषयांचा विशेष फायदा होतो. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 'बायफोकल'मधील विषय* 

सायन्स शाखा : इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, स्कूटर मोटर सायकल सर्व्हिसिंग, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स

कॉमर्स शाखा : बँकिंग, मार्केटिंग व सेल्समनशिप, ऑफिस मॅनेजमेंट

या विषयांची प्रवेश संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर महाविद्यालयानुसार प्रवेश संख्या व इतर माहिती पाहणे आवश्यक आहे. यावर्षी ही संपूर्ण माहिती ऑनलाइन माहिती पुस्तिकेद्वारे वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अकरावी सायन्समध्ये एकूण सहा विषय प्रामुख्याने घ्यावे लागतात. बायफोकलमधील एक विषय 200 गुणांचा असल्याने नेहमीच्या दोन विषयाऐवजी एक द्विलक्षी विषय घेता येतो. उदा. द्वितीय भाषा (100 गुण) व जीवशास्त्राऐवजी (100  गुण) द्विलक्षी विषया कडील (200 गुणांचा) इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, एसएमएस यांपैकी एक विषय घेता येतो. अकरावीमध्ये प्रवेश घेताना खालीलप्रमाणे सहा विषय विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील उपलब्धतेनुसार घेता येतील. इंग्रजी, द्वितीय भाषा अथवा द्विलक्षी पेपर 1 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजीऐवजी द्विलक्षी पेपर 2.

सहा विषयांचा पॅटर्न बायफोकलमधील विषय घेऊन बारावी सायन्स पूर्ण केल्यास अनेक फायदे होतात. बारावी किंवा सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षासाठी थेट प्रवेश. यासाठी पात्र बायफोकल विषयांची यादी पाहणे आवश्यक आहे. कोणत्याही इंजीनियरिंग शाखेसाठी पात्र. उदा. बायफोकल इलेक्ट्रॉनिक्स  घेतलेल्या विद्यार्थ्यास कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल इत्यादी विषयांकडे प्रवेश घेता येतो.आर्किटेक्चर पदवीसाठी प्रवेशास एकूण गुणांचा (ॲग्रीगेट) समावेश असल्याने द्विलक्षी चा फायदा होतो. बीएस्सी अथवा बीएस्सी कम्प्युटर सायन्स प्रवेशास पात्र होते.

बीसीए अभ्यासक्रमास पात्र. आयआयटीसाठी बारावीच्या एकूण गुणांची अहर्ता (75%) मिळविण्यासाठी उपयोग होतो. फार्मसी पदविका/पदवी साठी प्रवेशास पात्र. बीटेक कृषी पदवीसाठी प्रवेशास पात्र. बोर्ड परीक्षेमध्ये पीसीएम पात्रता गुण कमी पडल्यास केमिस्ट्रीच्या जागी बायफोकल चे मार्क गृहीत धरल्याने प्रवेशास अडचण येत नाही. द्वितीय भाषा आणि जीवशास्त्र या विषयास पर्याय उपयुक्त ठरतो

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, आयआयटी, शेतकी इत्यादी क्षेत्रात करिअर करायचे ध्येय आहे, ते विद्यार्थी बायफोकलचे विषय प्राधान्याने निवडतात, ज्यामुळे अभियांत्रिकी प्राथमिक तयारी दोन स्तरांवरच पायासह भक्कम होते. द्विलक्षीचे विषय हे व्यवसायभिमुख असल्याने फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या बरोबरीने विशेष आवडीने प्रशिक्षण घेतात. जे विद्यार्थी सुरुवातीपासूनच म्हणजे, आठवीपासूनच उच्च तंत्र अथवा आयआयटीकडे जाण्याचे ठरवतात. त्यांना या विषयांचा विशेष उपयोग होत असल्याने द्विलक्षी विषयांना इयत्ता अकरावी व बारावी सायन्सकडे प्रचंड मागणी आहे. याबरोबरच द्विलक्षी विषयांचा 'सीईटी' 'जेईई' 'नाटा' यांसारख्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयोग होतो.

- रीना भुतडा (करियर मार्गदर्शक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know here benefits of bifocals for science and commerce