esakal | School Reopen | आजपासून राज्यभरात शाळेची घंटा वाजणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Schools reopen students parents school teacher corona positive

School Reopen | आजपासून राज्यभरात शाळेची घंटा वाजणार...

sakal_logo
By
नामदेव कुंभार

शाळा सुरू करताना प्रत्येक शाळेमध्ये ‘शिक्षणोत्सव’ साजरा करण्यात यावा. यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करावे, जेणेकरून शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती होऊ शकेल. शिक्षणोत्सव साजरा करताना शाळांमधील शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती असायला हवी, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे, तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सोमवारपासून (ता. ४) सुरू करण्यात येत आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जाहीर केल्या असून, त्याचे पालन करावे. तसेच, शाळेमध्ये १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या बैठका घेण्यात याव्यात. शिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरपीटीसीआर चाचणी सक्तीची करण्यात येऊ नये, असे सोळंकी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया साइट्स‌वर शाळा भेटीचे फोटो, व्हिडिओ अपलोड करावेत, त्यासाठी ‘#शिक्षणोत्सव’ हा हॅशटॅग वापरावा असेही आदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री साधणार संवाद

‘माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत.

कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणातून धडे गिरवित आहेत. त्यामुळे, शाळांचे निकालही आधीच्या वर्गातील निकालाद्वारे लावण्यात आले. दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नववी आणि अकरावीच्या गुणांवर आधारित देण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र, यंदा जानेवारीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता ऑगस्ट महिन्यापासून कोरोना हळूहळू आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार राज्य सरकारने गावपातळीवर सर्वे करून शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या सूचना काय?

विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांची हवी संमती

शाळा दोन सत्रांत भराव्यात

एका बाकावर एकच विद्यार्थी बसण्याची हवी व्यवस्था

मास्क अनिवार्य हवे

वर्गखोल्या, शाळेचा परिसर सातत्याने निर्जंतुकीकरण करावा

पालकांनी हे करावे

पाल्यासोबत अतिरिक्त मास्क, सॅनिटायझर द्यावे

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास पाल्याला घरीच ठेवावे

जेवणाचा स्वतंत्र डबा व सोबत पाणी द्यावे

दप्तराचे ओझे कमी ठेवावे

शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा

शाळांनी हे करावे

वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शाळेचा परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावा

शाळेत ‘हेल्थ क्लिनिक’ सुरू करावे किंवा शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न करावी

वर्गात अतिरिक्त मास्क, प्राथमिक आरोग्य सुविधा असाव्यात

विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आदर्श पद्धत शिकवावी

शिक्षकांनी हे करावे

पहिले एक-दोन आठवडे थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी

स्टाफ रूम आणि वर्गात मास्क, अंतर ठेवणे आदींचे पालन करावे

कोरोनाच्या नियमांची विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घ्यावी

विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवरही लक्ष

loading image
go to top