दहावी, बारावी परीक्षेस सामोरे जाताना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC and HSC Exam

दहावी, बारावी परीक्षेस सामोरे जाताना

डिसेंबर महिन्यांत शाळा-महाविद्यालयांत क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण या सर्वांची रेलचेल असते. हे पूर्ण झाले की वेध लागतात ते इयत्ता दहावी, बारावी सराव परीक्षा आणि बोर्डाच्या वार्षिक परीक्षेचे. कोविडच्या आपत्तीनंतर पहिल्यांदाच पूर्वीच्या नियमांनुसार होणाऱ्या या परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १९ सप्टेंबर २०२२च्या पत्रानुसार दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्याबाबत सूचना, आक्षेप कळवण्याचे आवाहनही केले होते. ३० डिसेंबर २०२२ रोजी राज्य मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या वेळापत्रकास अंतिम रूप दिले. ते प्रसिद्धही केले आहे. वेळापत्रकाची छपाई होऊन ते शाळेमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रात प्रसिद्ध केले जाते आणि तेच वेळापत्रक विश्वासार्ह मानावे. वेळापत्रकासाठी विशिष्ट रंगाचा संकेत देखील ठरवलेला आहे. इयत्ता बारावीचे नियमित वेळापत्रक काळ्या रंगात, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक लाल रंगात असेल; आणि इयत्ता दहावीचे सर्वांसाठी एकच वेळापत्रक निळ्या रंगात असेल.

शासनाच्या १६ ऑक्टोबर २०१८च्या निर्णयानुसार २२ प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी प्रति तास २० मिनिटे जादा वेळ वाढवून दिला जातो. (उदाहरणार्थ तीन तासाच्या पेपरसाठी ६० मिनिटे जादा वेळ). यासाठी आवश्यक प्रस्ताव योग्य त्या दिव्यांगांनी प्रमाणपत्रासोबत विभागीय मंडळाकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक असते. गेल्या तीन वर्षांत आपण कोविड-१९च्या विशिष्ट कालावधीत परीक्षेला सामोरे गेलेले आहोत. मार्च २०२०च्या अगदी शेवटच्या टप्प्यात कोविडला प्रारंभ झाला होता. बारावीचे पेपर नियमित पूर्ण झाले होते, तर दहावीचा इतिहासाचा पेपर कोविड विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत घ्यावा लागला. दुर्दैवाने भूगोलाचा पेपर टाळेबंदीमुळे रद्द करावा लागला. २०२१ची परीक्षा नियमित पद्धतीने न होता इयत्ता दहावीसाठी नववीचे ५०% आणि दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे ५०% टक्के गुण विचारात घेऊन निकाल तयार करण्यात आला. बारावीसाठी दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे ४०% गुण विचारात घेऊन निकाल तयार करण्यात आला.

मार्च २०२२ची परीक्षा होत असताना विद्यार्थ्यांची लेखन कौशल्य गती कमी झाल्याने लेखनासाठी वेळ वाढवून देणे, अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करणे आणि शाळा तिथे केंद्र योजनेंतर्गत किमान १५ विद्यार्थी प्रविष्ट होणाऱ्या सर्वच शाळांना परीक्षा केंद्र देण्यात आले आणि परीक्षा यशस्वी झाल्या. यावर्षी मात्र कोविडकालीन सवलती रद्द करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच १) यावर्षी होणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा पूर्ण शंभर टक्के अभ्यासक्रमावर असेल. २) लेखनासाठी कोणताही अतिरिक्त वेळ वाढवून दिला जाणार नाही. ३) पूर्वी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर या परीक्षा होतील. याचाच अर्थ शाळा तिथे केंद्र ही योजना नसेल. या बरोबरच परीक्षा केंद्रावर परीक्षेअगोदर ३० मिनिटे उपस्थित राहण्याचे बंधन असेल. परीक्षेचे सकाळ सत्रासाठी ११ वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी १०.३० वा. तर दुपारचे सत्र तीन वाजताच्या पेपरसाठी २.३० वाजल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही.

बारावीच्या परीक्षेचे नियोजन

इयत्ता बारावीचे सर्वसाधारण, द्विलक्षी आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा यांचे नियोजन पुढील प्रमाणे असेल. १ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिक श्रेणी विषय तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन या कालावधीत पूर्ण होतील. २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा होईल. अंतर्गत मूल्यमापनास नियोजित वेळी उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आऊट ऑफ टर्न २३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा द्यावी लागेल. सामान्य ज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल, २४, २५ आणि २७ मार्च या कालावधीत सामान्य ज्ञान तर २३, २४, २५ मार्च या कालावधीत माहिती तंत्रज्ञानाची परीक्षा होईल. यासाठी ११.०० ते १.३० आणि ३.०० ते ५.३० अशा दोन बॅच तयार केल्या आहेत.

दहावीच्या परीक्षेचे नियोजन

इयत्ता दहावीची विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषय परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, तंत्र विषय पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांची शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांची परीक्षा दहा फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत होईल. दोन मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होईल.

अंतर्गत मूल्यमापनास अनुपस्थित विद्यार्थ्यांची आऊट ऑफ टर्न परीक्षा २७ ते २९ मार्च या कालावधीत होईल; तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होईल.

काय काळजी घ्याल ?

विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहताना प्रवेश पत्र, तसेच लेखन साहित्य सोबत ठेवणे गरजेचे आहे. उत्तर पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या सर्व सूचना काटेकोर वाचून त्याचे पालन करणे आवश्यक आहे. कॉपी व अन्य गैरप्रकार याबाबत मंडळ नियमावलीनुसार अत्यंत कडक शिक्षा आहेत, याचीही जाणीव ठेवावी. नियोजित वेळेवर दररोज पुरेसे अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. काही ठिकाणी बैठक व्यवस्थेत रोजच्या रोज बदल असू शकतो. त्याची काळजीपूर्वक माहिती घेणे आणि त्यानुसार आपल्या वर्गाजवळ उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. परीक्षा कालावधीत अनावश्यक जागरण टाळून तसेच आहारविषयक योग्य ती काळजी, पुरेशी विश्रांती घेऊन आपले आरोग्य जपावे. परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. आपली गुणवत्ता लेखनातून सिद्ध करणे, लिहिलेली उत्तरपत्रिका काळजीपूर्वक वाचणे आणि आवश्यक पुरेशी उत्तरे लिहिले आहेत का याची खात्री करणे गरजेचे आहे.

(लेखक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता आहेत.)