खेलेगा इंडिया... : सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

spondylitis

सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस ही एक सामान्य, वय-संबंधित स्थिती आहे. ती तुमच्या मानेच्या मणक्यातील सांधे आणि डिस्कवर परिणाम करते.

खेलेगा इंडिया... : सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस

- महेंद्र गोखले

सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस ही एक सामान्य, वय-संबंधित स्थिती आहे. ती तुमच्या मानेच्या मणक्यातील सांधे आणि डिस्कवर परिणाम करते. याला मानेचा ऑस्टियोआर्थराइटिस किंवा मानेचा संधिवात असेही म्हणतात. हे कार्टिलेज आणि हाडांची झीज झाल्यामुळे होते.

मानेतील हाडे आणि संरक्षण करणारी कार्टिलेज यांची झीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस होऊ शकतो.

कोरडी पडलेली स्पाइनल डिस्क

आपल्या पाठीच्या हाडांमध्ये डिस्क किंवा चकती असते ती जाड, गादीसारखी किंवा पॅडसारखी असते त्यामुळे वजन उचलणे, वळणे आणि इतर कोणत्याही कृतींचा धक्का सोसत आपल्याला हानी होत नाही. या डिस्क्समधील जेलसारखा पदार्थ कालांतराने वाळल्यामुळे कोरडी होऊ शकते. यामुळे स्पायनल वर्टिब्रेची (पाठीच्या कण्याची) हाडे पाठीवर एकत्र अधिक घासतात, त्यामुळे वेदना होतात.

हर्निएटेड डिस्क

स्पाइनल डिस्कमध्ये क्रॅक विकसित झाल्यामुळे अंतर्गत कुशनसारखे आवरणाला छिद्र पडते. त्यामुळे पाठीचा कणा आणि नेर्व्सवर दाब पडतो, त्यामुळे हात सुन्न होणे तसेच वरपासून खालपर्यंत हातामध्ये पसरणारी वेदना जाणवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

लिगामेंट कडक होणे

आपल्या मणक्याच्या हाडांना एकमेकांशी जोडणारी एक भक्कम कॉर्ड कालांतराने आणखी कडक होऊ शकते. त्याचा आपल्या मानेच्या हालचालीवर परिणाम होतो आणि मान घट्ट किंवा स्टिफ होऊ शकते.

अतिवापर

काही व्यवसाय किंवा छंदांमध्ये परत परत अशा हालचाली होतात ज्यामध्ये जड उचलणे, चुकीचे पोश्चर असणे, चुकीच्या बसण्याच्या सवयी, आयटी कर्मचारी जे जास्त प्रमाणात कॉम्पुटर वापरतात, ज्यामुळे मणक्यावर अतिरिक्त दबाव पडतो, परिणामी त्याची लवकर झीज होऊ शकते.

सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस या आजाराला मोठा धोका म्हणजे वाढते वय. आपल्या वयानुसार मानेच्या सांध्यातील बदलांमुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस होऊ शकतो. डिस्क हर्निएशन, डिहायड्रेशन(कोरडेपणा) आणि बोन स्पर्स हे सर्व वाढत्या वयाचे परिणाम आहेत.

वाढत्या वयाव्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिस होऊ शकतो. त्यातील काही कारणे खालीलप्रमाणे

 • मानेची दुखापत

 • कामाशी संबंधित अनेक क्रिया किंवा हालचालींमुळे मानेवर पडणारा अतिरिक्त ताण

 • आपली मान दीर्घकाळापर्यंत अवघड स्थितीत ठेवणे किंवा दिवसभर मानेच्या त्याच हालचाली परत परत करणे

 • आनुवंशिक घटक

 • अति धूम्रपान

 • शरीराचे जास्त वजन आणि निष्क्रिय राहणे

सर्व्हायकल स्पॉन्डिलेसिसची लक्षणे

 • खांद्याच्याभोवती वेदना.

 • काहीजण हाताला आणि बोटांमध्ये वेदना झाल्याची तक्रार करतात. अशी वेदना वाढू देखील शकते.

 • स्नायू कमकुवत होणे. स्नायूंच्या कमकुवतपणामुळे हात उचलणे किंवा वस्तू घट्ट पकडणे कठीण जाते.

इतर सामान्य लक्षणे

 • स्टिफ झालेली मान आणखी वेदनादायी होते.

 • डोकेदुखी

 • खांद्याला किंवा हाताला मुंग्या येणे किंवा ते सुन्न होणे आणि असा परिणाम पायांमध्ये देखील जाणवू शकतो.

कमी वारंवार उद्‍भवणाऱ्या लक्षणांमध्ये लक्षात न येणारी काही लक्षणे असतात. ती म्हणजे शरीराचे संतुलन गमावणे आणि मूत्राशय किंवा आतड्यांवरील नियंत्रण गमावणे. शारीरिक थेरपी तुम्हाला मान आणि खांद्याचे स्नायू ताणून मजबूत करण्यास मदत करते. हे मजबूत झाल्यावर शेवटी वेदना कमी करण्यास मदत करते.

काय काळजी घ्यावी

 • ओव्हरहेड पुशिंग एक्सरसाईज टाळा,

 • मान आणि खांदा स्थिर करणारे व्यायाम

 • मान कधीही पूर्ण वर्तुळात फिरवू नका

 • बसण्याचे पोश्चर नीट असल्याची खात्री करा, मान हळूहळू ताणा आणि थोड्या वेळेच्या अंतराने ताणत राहा.

टॅग्स :Mahendra Gokhale