वेगळ्या वाटा : फॅशन डिझाईन शिक्षणासाठी नवीन मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fashion design

भारतीय फॅशन इंडस्ट्रीला शाश्वत उद्योग उभारण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. फॅशन उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठी असलेली विविध कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

वेगळ्या वाटा : फॅशन डिझाईन शिक्षणासाठी नवीन मार्ग

- प्रा. मानसी ठाकूर

भारतीय फॅशन इंडस्ट्रीला शाश्वत उद्योग उभारण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. फॅशन उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठी असलेली विविध कौशल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकारने स्किल इंडिया उपक्रमाद्वारे तरुणांना उपजीविकेच्या विकासासाठी प्रशिक्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना आखल्या आहेत. भारत सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि यूसीजी (युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन) च्या मदतीने विविध ट्रेडमधील व्यावसायिक प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकप्रिय कोर्सपैकी एक म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी.व्होक) इन फॅशन टेक्नॉलॉजी अँड अ‍ॅपरेल डिझायनिंग. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून स्थानिक विद्यापीठांशी संलग्न हा कोर्स विविध संस्था चालवत आहेत.

B.Voc (बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्रॅम) चे ठळक मुद्दे -

  • कौशल्यावर आधारित पदवी शिक्षण मिळवून मनुष्यबळ विकसित करण्याचा केंद्रसरकारचा हा एक अतिशय यशस्वी उपक्रम आहे.

  • अभ्यासक्रमाची रचना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार NSQF level लक्षात घेऊन तयार केली आहे.

  • कोर्समध्ये सिंगल एंट्री अँड मल्टिपल एक्झिटचा पर्याय आहे. एखादी व्यक्ती एक वर्षानंतर डिप्लोमासह बाहेर पडू शकते. दोन वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा आणि तीन वर्षे पूर्ण करून पदवी प्राप्त करू शकते.

  • हा कोर्स कौशल्यावर आधारित असल्यामुळे अभ्यासक्रमामध्ये ६० टक्के प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) आणि ४० टक्के थेअरी असे प्रमाण असते.

  • इंडस्ट्री एक्स्पर्ट, व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे अधिकारी यांची व्याख्याने, तसेच, गारमेंट इंडस्ट्री भेटींसह इंटर्नशिपला देखील प्रोत्साहन दिले जाते.

  • पदवी अभ्यासक्रमानंतर कौशल्यावर आधारित स्वत:चा व्यवसाय/उद्योग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवते.

  • कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी B Voc कोर्स साठी पात्र असतो.

  • बी.व्होक पदवीनंतर विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण M Voc करू शकतात.

  • बी.व्होक पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.बी.ए, विविध स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र ठरतात.

भारत सरकार योग्य रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्यावर आधारित अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन, लोकांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत करत आहे. फॅशन उद्योग हे असेच एक क्षेत्र आहे ज्यासाठी विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे (व्यावसायिक अभ्यासक्रम) व्होकेशनल कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कौशल्यपूर्ण आणि ज्ञानपूर्ण बनवलं जातं. याचा फायदा म्हणजे हे विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर अधिक कुशल आणि प्रशिक्षित होतात. पारंपारिक शैक्षणिक अभ्यासक्रमासारखे केवळ सैद्धांतिक शिक्षण यात नसते , तर कामाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टिकल नॉलेज) व्होकेशनल कोर्सेसमध्ये दिलं जातं. बरेचसे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यात अधिक सक्षम असतात.

पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक व रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज आहे. या प्रकारचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिक्षण पद्धतीचा लाभ प्रथम वर्षांपासूनच मिळण्यास सुरुवात होते. अभ्यासक्रमात ६० टक्के भर हा प्रात्यक्षिकांवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढते व आत्मनिर्भयतेकडे पहिले पाऊल टाकण्यास मदत होते. स्वतःच्या हिमतीवर काम करण्यास ते प्रवृत्त होऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

बॅचलर ऑफ व्होकेशन (B.Voc) फॅशन टेक्नॉलॉजी अँड अ‍ॅपरेल डिझायनिंग अभ्यासक्रमामध्ये विविध पॅटर्न्स, स्टीचिंग, एम्ब्रॉयडरी, फॅशन इलस्ट्रेशन, कॉम्पुटर एडेड डिझायनिंग, कम्युनिकेशन, स्टायलिंग, मार्केटिंग, क्वालिटी चेकिंग, पॅकेजिंग, ॲडव्हर्टायझिंग अशा विविध विषयांचा अंतर्भाव आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी त्यांच्या इंटर्नशिपचा एकभाग म्हणून विविध संस्थांसोबत काम करतात. हा या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. हे सर्व विषय शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन व्यवसाय निर्माण व त्याची वाढ करण्यास चांगलीच मदत होते. प्रॅक्टिकल शिक्षणावर आधारित विषय असल्याने विद्यार्थी शिक्षणाचा आनंद घेतात. अशा विद्यार्थ्यांना फॅशनशी संबंधित विविध संस्थांमध्ये नोकऱ्या मिळवण्याची किंवा गारमेंट उद्योगात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होते. बी. व्होक. (B. Voc) फॅशन टेक्नॉलॉजी आणि अ‍ॅपेरल डिझायनिंग कोर्सने विद्यार्थ्यांना उपजीविका विकास कौशल्य देण्याचा नवीन मार्ग खुला केला आहे.

(लेखिका मॉडर्न महाविद्यालय प्राध्यापिका आहेत)

Web Title: Manasi Thakur Writes Fashion Design Education New Route

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..