संवाद : भाषेचे सौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

language beauty

भाषा - एक शास्त्र, एक विद्या, एक कला, एक सशक्त माध्यम, आणि व्यवसायाचं एक साधन.

संवाद : भाषेचे सौंदर्य

भाषा - एक शास्त्र, एक विद्या, एक कला, एक सशक्त माध्यम, आणि व्यवसायाचं एक साधन. बहुतेक वेळा भाषा शिकणं हे फक्त ‘विद्यार्जन’, म्हणजे त्या भाषेचं व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी वगैरे शिकण्यापुरतं मर्यादित राहतं. म्हणजे तसं कुठं अडत नाही. ती भाषा चांगली येत असते. मला कविवर्य मंगेश पाडगावकरांचं एक वाक्य आठवतं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘इतर कुठल्याही कलाकारापेक्षा भाषेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कवी, लेखक, वक्ता यांचं काम अधिक अवघड असतं.’ आधी नीट अर्थ कळला नाही, मात्र त्यांनी तो उलगडून सांगितल्यावर मात्र एकदम पटला. ते म्हणाले, ‘इतर कलाकारांच्या कलेचं जे माध्यम असतं, उदाहरणार्थ संगीत, नृत्य, शिल्प, तिथपासूनच सामान्य माणसाचं कुतूहल आणि कौतुक सुरू होतं. म्हणजे एखादा गायक भले बेसूर गात असला, तरी समोर बसलेल्या बऱ्याच श्रोत्यांना तेवढंही येत नसतं, त्यामुळं ते प्रभावित होतात.

मात्र, लेखक, कवी, वक्ता, यांचं माध्यम मात्र असते भाषा, जी समोर बसलेल्यांना मुळीच नवीन नाही. ते सगळेजण उठल्यापासून झोपेपर्यंत अव्याहतपणे भाषेचा वापर करत असतात. म्हणूनच, सगळ्यांना जी भाषा ‘अतिपरिचित’ असल्यामुळं क्वचित तिची अवज्ञाही केली जाते, त्याच भाषेतून, शब्दांतून कलाकाराला अशी काही कलाकृती घडवायची असते, की ज्यामुळं श्रोते, प्रेक्षक आकर्षित होतील.’ पटलं ना तुम्हालाही? म्हणूनच बहुधा ‘वक्ता दशसहस्रेषु’ असं म्हटलं जात असावं.

भाषा : विद्या आणि एक कला!

म्हणजेच भाषा ही फक्त विद्या म्हणून शिकून चालणार नाही, तर कला म्हणूनही तिची साधना केली, तर ती कितीतरी अधिक आनंददायी होऊ शकेल. ‘कट्यार काळजात घुसली’ मधील कविराज म्हणतात त्याप्रमाणे ‘विद्या ही द्यायची असते, सुपारीसारखी, आणि कला ही उचलायची असते, तपकिरीसारखी.’ आपलं म्हणणं आपण मोजक्या, नेमक्या आणि नेटक्या शब्दांत, स्पष्टपणे तरीही रंजकतेनं मांडू शकतो तेव्हा आपलं साधं बोलणं किंवा लिहिणं हे ‘संभाषणकला’ किंवा ‘लेखनकला’ या संज्ञेला पात्र ठरतं, असं मला वाटतं. म्हणूनच कोणतीही भाषा शिकताना, किंवा अगदी आपल्याला चांगली येत असलेली (?) मातृभाषा बोलताना किंवा लिहिताना, तिचे नियम, व्याकरण तर शिकायला पाहिजेच, मात्र त्यापुढं जाऊन, हळुवारपणे त्या भाषेची मनधरणी करून तिच्या अंतरंगाचा वेध घेतला पाहिजे. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू राहते, राहावी.

त्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य, काव्य वाचणं, नाटक सिनेमे बघणं, आपण लिहीत राहणं, मुख्य म्हणजे त्या भाषेवर नितांत प्रेम करणं, हे फार महत्त्वाचं आहे. मग कुठं ती भाषासुंदरी हळू हळू प्रसन्न होत जाते. हा सगळा असतो एक निखळ आनंदाचा प्रवास. नंतर आपल्याला कळायला लागतं की नेमके, नेटके शब्द कसे निवडायचे, त्यांच्या विविध अर्थछटा कशा ओळखायच्या, ते कसे उच्चारायचे, आणि भाषेशी कसं खेळायचं. तेव्हाच आपण लेखक, वक्ता, कवी, म्हणून पाडगावकरांना अभिप्रेत असलेली उच्च कलाकृती निर्माण करू शकू, किंवा किमान एक रसिक म्हणून तरी नक्कीच त्या कलेचा, भाषासौंदर्याचा आस्वाद घेत आपलं आयुष्य अधिक समृद्ध करू शकू.

(लेखिका निवेदिका आणि भाषा प्रशिक्षक आहेत.)

manjiridhamankar@gmail.com