मानसवेध : सकारात्मक विचारसरणीचा फायदा

सकारात्मक विचारसरणीची सवय लावण्यासाठी क्षमतांची जाणीव, स्व-संवाद, साक्षीभाव आणि नकारात्मकतेपासून दूर राहण्याचे मानसवेधक मार्गदर्शन
A positive mindset can support mental well-being, clearer thinking and a healthier approach to life's challenges.

A positive mindset can support mental well-being, clearer thinking and a healthier approach to life's challenges.

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

सकारात्मक विचारसरणी अमलात येण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास मनाला तसं वळण लागायला मदत होईल.

१. आपल्याकडे असलेल्या क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवूयात.

२. आपल्या मनःशांतीचे सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात? मला वाखाणतात की माझ्यावर टीका करतात यावर माझी मनःशाती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे.

३. स्वतःविषयी व इतरांविषयीही सतत चांगला विचार करूया. चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया.

४ ज्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं त्यांचा आदर्श समोर ठेऊया. त्यानं आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल.

५. नकारात्मक संवाद आणि नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर राहूया.

६. स्वतःशी आपला, आपण जागं असताना सतत स्व-संवाद होत असतो. तो सकारात्मक होतोय ह्याकडे जाणीवपूर्वक पाहूया. नकारात्मक विचार मनात आले तर ताबडतोब जाणीवपूर्वक सकारात्मक विचार मनात आणूया. याचा अर्थ स्वतःशी भांडायचं नाही आहे; तर शांतपणे सकारात्मक पर्याय मनात आणून त्याप्रमाणे कृती करायची आहे.

७. लक्षात घेऊया की असहाय्य वाटलंच तरी त्याचा अर्थ सगळं संपलं असं नव्हे. आयुष्यात कुठलीच परिस्थिती कायम रहात नाही. रात्री नंतर दिवस असतोच. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाची तिरीप असतेच. प्रकाश असतोच. म्हणूनच विपरीत परिस्थिती आलीच तर ती बदलेलच यावर ठाम विश्वास ठेऊया.

८. आपण नकारात्मक विचारसरणीचे असू तर स्वतःत बदल घडवणं अत्यावश्यक आहे हे मान्य करूया. असा बदल घडवता येतो हे मान्य करूयात.

९. भूतकाळातल्या कडवट आठवणी व अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया.

१०. स्वतःवर टीका करणं थांबवूया आणि आव्हानांना सामोरं जायचं ठरवूया.

११. कळत किंवा नकळत होणारं नकारात्मक बोलणं थांबवूया. उदा. मला जमणार नाही, मला याआधी कधीच जमलं नाही वगैरे.

१२. प्रत्येक गोष्ट व्यक्तिशः घ्यायला नको. साक्षीभावाने माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करुया. साक्षीभाव म्हणजे औदासिन्य किंवा निष्ठुरपणा नव्हे तर शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याची ती एक कला आहे. ती आत्मसात करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com